Join us  

पावसाळ्यात मुलांची तब्येत उत्तम राहावी म्हणून 4 उपाय, पावसात भिजा-मजा करा पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 10:05 AM

पावसाळ्यात मुलं आजारी पडू नये यासाठी खास पालकांनीच लक्ष द्यायला हवं असं सेलिब्रेटी आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) म्हणतात.  मुलांची रोगप्रतिकारशक्ती (increase immunity) वाढवण्यासाठी पालकांना ( tips for parents) त्यांनी सोपे उपाय सांगितले आहेत.

ठळक मुद्देमुलांच्या दिवसाची सुरुवात हेल्दी असायला हवी. मुलांच्या आहारात रोज एक आवळा आवश्यकच. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुलांनी 60 ते 90 मिनिटं खेळायलाच हवं. 

पावसाची मजा घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. त्यात लहान मुलांचा आनंद तर विचारुच नका. पावसात भिजणं, पावसात खेळणं या गोष्टी मुलांना अती प्रिय. पण पावसाळ्याच्या दिवसातच मुलं जास्त आजारी पडतात. सर्दी, खोकला, तपा ॲलर्जी सारख्या समस्या उद्भवतात आणि मुलं मलूल होतात. पावसाळ्यात मुलं आजारी पडू नये यासाठी खास पालकांनीच लक्ष द्यायला हवं असं सेलिब्रेटी आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर                                    (Rujuta Diwekar) म्हणतात. त्यांनी 'सीक्रेट्स ऑफ गुड हेल्थ' या आपल्या ऑडियोबुकमध्ये मुलांची रोगप्रतिकारशक्ती (increase immunity of kids)  वाढवण्यासाठी पालकांना सोपे उपाय सांगितले आहेत.

Image: Google

पावसाळ्यात मुलांची काळजी घेताना..

1. ऋजुता दिवेकर पावसाळ्याच्या कुंद वातावरणात मुलं उत्साही राहाण्यासाठी सर्वात पहिला सल्ला देतात तो मुलांची दिवसाची सुरुवात हेल्दी करण्याचा. यासाठी मुलांना सकाळी एखादं फळ/ भिजवलेले बदाम/ भिजवलेले मनुके आणि केशरच्या एक ते दोन काड्या खाण्यास द्याव्यात असं सांगतात. यामुळे मुलांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. सुकामेवा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. बदामामध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे मुलांच्या शरीरात होणारं पेशींचं नुकसान रोखलं जातं. मुलांना लोह, प्रथिनं यासारखी महत्त्वाची पोषणमुल्यं मिळून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

2. पावसाळ्यात मुलांचं आरोग्य निरोगी राहाण्यासाठी ऋजुता दिवेकर मुलांना रोज एक आवळा खाऊ घालण्याचा सल्ला देतात. आवळ्यामध्ये क जीवनसत्व जास्त असतं.  ते जर मुलांच्या शरीरात गेलं तर मुलांचं संसर्गापासून रक्षण होतं. मुलं नुसता आवळा खाण्यास टाळाटाळ करत असतील तर आवळा कॅण्डी, मोरावळा, आवळ्याचा मुरांबा किंवा आवळ्यचं सरबत या स्वरुपात मुलांना आवळा खाऊ घातला तरी तो फायदेशीर ठरतो. 

Image: Google

3. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांनी पुरेसं खेळायलाही हवं. पावसाळ्यात मुलं बाहेर जाऊन खेळू शकत नसतील तर मुलांना घरात खेळण्यास प्रोत्साहन द्यायला हवं. मुलांनी दिवसभरात 60 ते 90 मिनिटं खेळायला हवं. एवढा वेळ मुलं सलग खेळत नसतील तर त्यांनी टप्पाटप्यानी तरी तेवढा वेळ खेळायला हवं. खेळल्यामुळे मुलांचे हाडं मजबूत होतात. त्यांचं आरोग्य सुदृढ राहातं तसेच मेंदूही चांगलं काम करतो. त्यामुळे पावसात खेळायला बाहेर जाऊ नओ असं सांगताना मुलं घरात नुसती बसून राहाणार नाही याकडेही पालकांचं लक्ष असायला हवं. 

4. पावसाळ्यात सगळ्यांनाच जरा चटपटीत खाण्याची इच्छा होते. मुलांना तर बाहेरचं खायला आवडतंच. पण पावसाळ्यात मुलांचं आरोग्य सांभाळायचं असेल तर मुलांना घरचं ताजा आणि पौष्टिक आहार द्यायला हवा. मुलांना आवडतील असे चटपटीत पण पौष्टिक पदार्थ घरी सहज तयार करता येतात. मुलांनी बाहेरचं खाण्याचा हट्ट धरला तर त्यांना घरातले  चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ द्यायला हवेत. मुलांच्या आहाराची काळजी घेताना घरातले आणि स्थानिक पदार्थ उपलब्ध करुन देण्याचा सल्ला ऋजुता दिवेकर पालकांना देतात. उदा. मुलांनी केचप मागितला तर मुलांना चटणी द्यायला हवी. चटणी चविष्ट तर असतेच पण चटणीतून मुलांना आवश्यक पोषक घटक मिळतात. मुलांनी चिप्स मागितले तर त्यांना काजू द्यायला हवेत. त्यांनी किवी सारख्या परदेशी फळांचा आग्रह धरला तर त्यांना केळे खाऊ घालायला हवे. मुलांनी कोल्ड ड्रिंक्स मागितलं तर त्यांना नारळ पाणी, घरी केलेलं ज्यूस किंवा दूध प्यायला द्यावं . मुलांना घरचे आणि स्थानिक पदार्थ खाऊ घातले तर मुलं निरोगी राहातील आणि पावसाळ्यातल्या वातावरणाचा आनंद मनमुराद घेऊ शकतील. 

टॅग्स :पालकत्वमानसून स्पेशललहान मुलंआरोग्यहेल्थ टिप्स