आई घराबाहेर पडली की सगळे तिला एकच प्रश्न विचारतात, मग मुलांचं काय? मुलांना कुणाकडे सोडलंस? मग ती आई अत्यंत कर्तबगार-यशस्वी असली तरीही तिचं करिअर आणि काम मुलांपेक्षा दुय्यमच ठरवलं जातं. पण असे प्रश्न वडिलांना कुणी विचारतं का? तर नाही! वडील घराबाहेर असतात तेव्हा आता तुझं मुलं कोण सांभाळतं असा प्रश्न त्यांना कुणी विचारत नाही. असे अनुभव महिलांना नेहमी येतात. त्याचा ताणही येतो. अगदी सानिया मिर्झाही त्याला अपवाद नाही. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांना एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच सानिया आणि शोएब वेगळे झाले. नुकत्याच एका मुलाखतीत सानियाने आपल्याला आलेला एक कटू अनुभव सांगितला (Sania mirza thoughts about parenting) .
ती सांगते, सामन्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आली. त्यांनी माझ्यासोबत फोटो काढले. मग ते गृहस्थ म्हणाले, मातृत्व लाभते आहे तुला. पण तुझा मुलगा कुठं आहे? तो हैद्राबादला आहे, मी तिकडेच जाणार आता असं मी त्यांना सांगत होतेच तर त्यांनी लगेच मला सल्ला दिला, म्हणजे तू मुलासोबत राहायला हवे! मग मी त्यांना विचारले तुम्ही इथं आहात तर तुमचं मूल कुठंय? तुम्हीही मुलासोबत असायला हवं ना..’
सानिया म्हणते, हा अनुभव आपल्यापैकी अनेकींना येतो. मूल सांभाळणं ही बाईचीच जबाबदारी मानली जाते. आई झाल्यावर महिला आपल्या मुलाची अत्यंत चांगली काळजी घेतातच. पण मूल घरी ठेवून आई कामाला घराबाहेर पडली की लगेच शिक्के मारले जातात. ती फार ॲम्बिशस आहे. संसारी नाही. गृहकृत्यदक्ष नाही. तिला मुलांपेक्षा काम महत्त्वाचं वाटतं. आणि हेच सारं पुरुष करतात तेव्हा मात्र त्यांना कुणी नावं ठेवत नाहीत. त्यांच्या महत्त्वाकांक्षी असण्याचं कौतुक केलं जातं.
आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर सगळ्याच बायकांना हे ऐकावं लागतं. पण हेच सगळे पुरुष करतात तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षी असण्याचा आदर असतो, दिवसातले १४ तास घराबाहेर काम करणारे पुरुष मात्र चांगले असतात, नवरा आणि वडील म्हणूनही त्यांचं कौतुक होतं.आपला समाज बायकांच्या कष्टांचा आदर करायला कधी शिकणार?