आपल्या मुलांवर आपलं जीवापाड प्रेम असतं. त्यांना सगळ्या सोयीसुविधा, हवं नको ते मिाळावं यासाठी आपण पालक म्हणून दिवस रात्र कष्ट करत असतो. मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, त्यांनी हुशार व्हावे आणि मोठे होऊन नाव कमवावे. त्यांना खेळात, कलेत आणि सगळ्याच गोष्टींमध्ये चांगली गती असावी अशी आपली किमान अपेक्षा असते. त्यासाठी आपण त्यांना लहानपणापासून जास्तीत जास्त गोष्टींची माहिती करुन देण्याचा प्रयत्न करतो. पालक म्हणून आपण कुठे कमी पडू नये यासाठी आपण बरेच कष्ट घेत असतो. मात्र तरीही अनेकदा मुलांच्या आणि आपल्या नात्यात एकप्रकारचे अंतर पडल्याचे किंवा दरी निर्माण झाल्याचे आपल्याला जाणवते, यामागे अनेक कारणे असू शकतात. पण मुलांशी आपला बाँड कायम स्ट्राँग असावा यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. मुलं लहान असताना त्यांना पालक म्हणून आपल्याकडून खूप अपेक्षा असतात (Say these 3 lines to your Children's).
ऑफीस, घरातील जबाबदाऱ्या, विविध गोष्टींचे असणारे ताण यामुळे आपण त्यांच्या काही गोष्टींना न्याय देऊ शकत नाही. मात्र अशावेळी काही लहानशा गोष्टी केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. मुलांना आपल्याकडून काही गोष्टींची अपेक्षा असते. ती आपण संवादाच्या माध्यमातून पूर्ण केली तर मुलं कळत-नकळत मनातून खूप खूश होतात. याचा परीणाम आपलं नातं जास्त घट्ट होण्यावर होतो. मुलांवर आपण पालक म्हणून फक्त प्रेम करत नाही तर मुलं आपल्याला मनापासून आवडतात हे त्यांना समजायला हवं. ते अतिशय छान व्यक्ती आहेत हे आपण त्यांना वारंवार सांगितलं तर ते खरंच एक चांगले व्यक्ती म्हणून मोठे होतात हे लक्षात घ्यायला हवं. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बोलून दाखवल्याने मुलांना खूप छान वाटते ते पाहूया...
१. मी खूप भाग्यवान आहे की मी तुझी आई किंवा बाबा आहे.
२. मला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते, ती माझी सगळ्यात आवडीची गोष्ट आहे.
३. तू जसा किंवा जशी आहेस तसा किंवा तशी अतिशय सुंदर, उत्तम आहेस.