संयोगिता ढमढेरे
लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता खूप कमी असूनही दीड वर्षाहून जास्त काळ मुलांच्या शाळा बंद होत्या. समवयीन मित्र-मैत्रिणींची भेट नाही. शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद नाही. एकत्र डबा खाणं नाही, मस्ती नाही. मनमोकळं बोलणं-खेळणं नाही. यामुळे सर्वच मुलांचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक नुकसान झालं. त्यातही गरीब, ग्रामीण आणि प्राथमिक शाळेतील मुलांचं जास्त नुकसान झालं. लाखो मुलं पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नियमित शाळा सुरु व्हाव्यात, असं आता मुलांनाही वाटतं, ते ही आता ऑनलाईन क्लासेसला कंटाळले आणि ऑनलाइन शाळा ज्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, त्यांचे तर जास्त हाल. त्यांनाही आता खरीखुरी शाळा हवीच आहे. नोव्हेंबर महिन्यात १४ तारखेला आपण बालदिन, २० तारखेला जागतिक बाल हक्क दिन साजरे केले. लहान मुलांच्या हक्कांची याकाळात चर्चा तरी होते. नुकताच जागतिक बाल हक्क दिनी ‘युनिसेफ’च्या मदतीने मुलांनी आपल्या मागण्यांचा जाहीरनामा केंद्र सरकारच्या प्रतिनिधी मंडळाला सादर केला.
‘फिर स्कूल चले हम’ म्हणत मुलांनी आपला आनंद व्यक्त केला. सध्या थोडा काळ का होईना शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला याचा मुलांना खूप आनंद झाला आहे.
राज्यातल्या वंचित वर्गातल्या आणि वस्तीत राहणाऱ्या काही मुलांशी यानिमित्ताने गप्पा मारल्या...
(Image : Google)
१२ ते १५ वयोगटातली ही मुलं.
त्यांच्या जगातले प्रश्नच वेगळे आहेत. आता त्यांना शाळेत जाताना दोन प्रश्न छळतात, आपले जुने सगळे मित्रमैत्रिणी शाळेत भेटतील ना? कारण अनेकांना काही मित्रमैत्रिणी ऑनलाईन शाळेत दिसलेच नाहीत, त्यांची शाळा सुटली. काही गावी गेले ते गेलेच. त्यांना शोधताही येत नाही, याचं त्यांना दु:ख आहे.
काहींना यांचही टेंशन की, शाळा सुरु झाली तर लेखी परीक्षा होणार, आपला तर लिहायचाच सराव गेला. परीक्षेत पेपर कसा लिहिणार?
काही गरीब मुलांचा प्रश्न तर त्यातून वेगळा.
एक जण सांगते, ‘आता तर जुना युनिफॉर्म पण होत नाही, तोच घालून शाळेत जाता येत नाही, पण घरचे नवा युनिफार्म घेतील का?’
मोठ्यांच्या जगाला हे प्रश्न लहान वाटत असले, तरी वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागास जगातल्या या मुलांना शाळा सुरु होताना नव्या जगात जमवून घेण्याचे आणि काहीतरी कायमचं सुटल्याचे प्रश्न गंभीर वाटत आहेत आणि ते गंभीर आहेतही...
***
नेटवर्कची समस्या असल्यामुळे शिक्षण नीट व्हायचंच नाही. माझ्या वर्गातल्या दोन मुलांकडे फोन नाही, त्यांना ऑनलाईन वर्गात बसता आलं नाही. शाळा सुरु झाल्यावर आमच्या दुसऱ्या मित्रांकडून कळलं की, ते आता शाळेत येणार नाहीत. काही मुलं गावाला गेली आहेत. शाळेत परत जाताना पहिल्या दिवशी खूप आनंद झाला. पण त्याचवेळी थोडी भीतीपण वाटत होती.
- सादिया शेख, १२ वर्षे, इयत्ता ७ वी, उत्तन भाईंदर
(Image : Google)
मी अजूनही ऑनलाईन शाळा करतेय. माझी शाळा घरापासून १० किलोमीटरवर आहे. मी रिक्षाने शाळेत जायचे. पण अजून काही दिवस घरून शिकणार आहे. एनसीसीला शाळेत बोलावतात तेव्हा जातो. यापुढे शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असावं. पण परीक्षा फक्त ऑफलाईन असावी. नेटवर्कचा प्रश्न असला तर उत्तरपत्रिका जात नाहीत, तसं व्हायला नको. मला लिहिण्याचा अजूनही प्राॅब्लेम येतोय.
- तृषा कुंभारकर, १५ वर्षे, इयता १० वी, गोंदिया
...
मुलांना लस मिळणार म्हणतात. लस घ्यायला पालकांना भीती वाटते. कारण त्यांना लस घेतल्यावर ताप आला होता. मला पण येईल का? अजून एक म्हणजे, मी घरी राहून स्वयंपाक करायला शिकले. मसालाभात बनवते. स्वत:च्या हाताने स्वयंपाक करता येतो, याचा मला खूप आनंद झाला.
- समीक्षा राणे, १३ वर्ष, इयत्ता ९ वी, रत्नागिरी
...
माझ्या घरात एकच मोबाईल होता. माझी बहीण माझ्याहून मोठी आहे त्यामुळे तिचा अभ्यास महत्त्वाचा होता. नंतर वडिलांनी आणखी एक फोन घेतला. आम्हाला ऑनलाईनच अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक मुलाकडे लॅपटॉप पाहिजे, असं शक्य होणार नाही. आपल्या देशात प्रत्येक मुलाकडे फोनसुद्धा असू शकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे ना...
- अनुराग गुप्ता, १४ वर्षे, इयता १० वी, मुंबई
....
मला अजिबात लिहिण्याचा आत्मविश्वास राहिला नाही. माझ्या मैत्रिणींची अवस्था पण अशीच आहे. आम्हाला लिहिण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत म्हणून आमचे शिक्षक आम्हाला सतत निबंध लिहिण्याचा गृहपाठ देत आहेत. त्यामुळे आम्हाला लिहिण्याची सवय होईल आणि वेगही वाढेल, असं त्यांना वाटतं. परीक्षा कशी देणार, याबद्दल आम्हाला थोडी भीती वाटतेय आणि लिहिता येणार नाही म्हणून चिंताही वाटतेय. आम्हीही लिहिण्याचा सराव करतोय.
- तन्वी रकटे, १५ वर्षे, इयता १० वी, मुंबई
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
mesanyogita@gmail.com