रंजना बाजी
कोरोनाचं प्रमाण वाढणं आणि कमी होणं यावर कुणाचाही ताबा नाही. त्यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी झाला की शाळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर होतात, कोरोना वाढला म्हणून त्या तारखा पुढेही ढकलल्या जातात. काही शाळांनी पालकांशी चर्चा करून ऑफलाइन वर्ग सुरू केले, काही ठिकाणी एकाच वेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोनही पर्याय शाळांनी दिले, तर काही ठिकाणी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच वर्ग चालू आहेत. या सगळ्या सततच्या अनियंत्रित, अनपेक्षित बदलांचा सगळ्यात मोठा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे, ही सगळ्यात गंभीर बाब आहे.
त्यामुळे आता शाळा सुरु होताना पालकांना खूपच सजग राहावं लागणार आहे. आता शाळा सुरू होतील तेव्हा मुलं गोंधळलेली असणार आहेत. जवळजवळ दोन वर्षे मुलं शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे मुलांची एकाच ठिकाणी बसून राहायची सवय गेली आहे. घरातल्या ऑनलाइन वर्गांमुळे मुलांना मध्येच काहीतरी कारण काढून उठणे, शिक्षकांच्या शिकवण्याकडे नीट लक्ष न देणे, वर्गाच्या वेळेत घरभर फिरत असणे या सवयी लागलेल्या आहेत. त्यामुळे मुलांची शाळेतली वागणूक यापूर्वीच्या वागणुकीपेक्षा वेगळी असण्याची शक्यता आहे. अशावेळी मुलांना शाळेचे नियम, तिथं कसं वागलं पाहिजे अशा गोष्टींबद्दल सतत सूचना देण्यापेक्षा मुलांना इतक्या दिवसांनी शाळेत गेल्यावर काय वाटले याबद्दल मुलांशी संवाद साधावा लागेल. त्यांच्या शिक्षकांच्या बरोबर चर्चा करत, लगेच शाळेचे कठोर नियम लागू करण्यापेक्षा मुलांना हळूहळू पूर्व परिस्थितीकडे कसे संवेदनशीलतेने नेता येईल यावर शाळा आणि पालक यांनी एकत्र यायला हवे.
(Image : Google)
पालकांना काय करता येईल?
१. पालकांना काळजी असणार आहे ती मुलांच्या शालेय अभ्यासाची. कोरोना काळात मुलांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली आहे. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या पाहणीमधून दिसते की, अनेक मुलं याआधी शिकलेलं बऱ्यापैकी विसरली आहेत. यातसुद्धा समानता नाही. उदाहरणार्थ, चौथीच्या वर्गात असलेली काही मुलं दुसरीच्या पातळीवर गेली आहेत, काही पहिलीच्या. आपल्या मुलाच्या पातळीची माहिती करून घेऊन त्याप्रमाणे पालकांना काम करावे लागेल.
२. पूर्वीसारखं सगळ्या गोष्टी शिक्षकांवर, शाळेवर सोडून चालणार नाही. या सगळ्यात शिक्षक असणार आहेतच. पण, आपल्या मुलांच्या शैक्षणिक तयारीकडे प्रत्येक पालकाचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक मुलासोबत वेगवेगळ्या पातळीवर काम करणे आवश्यक आहे.
३. आता या मुलांना अभ्यासाकडे पुन्हा कसं वळवायचं हा पालकांसाठी मोठा कळीचा प्रश्न आहे. एके ठिकाणी ठिय्या मारून बसायची मुलांची सवय पूर्ण गेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा पाठ्यपुस्तकांशीसुद्धा फार आणि सततचा संपर्क कमी झाला आहे. मग, मुलांना शिकायला कसं प्रवृत्त करायचं?
४. त्यासाठी काही गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत. पाठ्यपुस्तके ही संदर्भ साधने आहेत. मुलांना त्या त्या वयांमध्ये काय आलं पाहिजे, काय माहीत असलं पाहिजे याची एक साधारण कल्पना देण्यासाठी पाठ्यपुस्तके असतात. कोरोनापूर्व काळात मुलांना शाळेची सवय होती. त्यातून रोज पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन त्यांच्या वर्गात बसण्यातून अभ्यास होत असे आणि विषय समजून घेतले जात असत. मग, आता काय?
५. आपल्याला माहीत आहेच की, मूल सतत काहीतरी करत असते. लॉकडाऊनच्या काळात मुलांनी घरात बरीच कामं केली, नवनवीन गोष्टी केल्या. वेगवेगळे अनुभव घेतले. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचे शिकणेच आहे.
(Image : Google)
६. अभ्यासाच्या भाषेत बोलायचे म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात गणित, भाषा, सगळे सायन्सेस, इतिहास, भूगोल सगळंच आहे. मूल जेव्हा अशा प्रत्यक्ष जगण्यात भाग घेत असतं तेव्हा या सगळ्या गोष्टीसुद्धा आपोआपच अनुभवत असतं. आणि लॉकडाऊनमध्ये मुलांनी हे केलं आहेच. स्वत: अनुभव घेतल्याचा फायदा असा की, मूल त्या गोष्टी पुस्तकातल्या धड्यासारखं विसरत नाही. मग आपलं काम आहे की, या सगळ्या अनुभवांशी मुलांचं शालेय शिक्षण, लिहिणे, वाचणे जोडून घेणे.
७. आमच्या नात्यातली तिसरीत असलेली मुलगी लॉकडाऊनच्या काळात स्वयंपाक करायला शिकली, घर आवरायला शिकली, स्वयंपाक कलात्मकदृष्ट्या मांडायला शिकली. पण, तिची लिहायची, वाचायची सवय तुटली, गणिताचा कंटाळा यायला लागला. ज्या गोष्टींची शालेय अभ्यासात गणना होते त्या सगळ्याच तिला आवडेनाशा झाल्या. अशा वेळी काय करू शकतो?
८. त्या मुलीचं नीट निरीक्षण करून तिला काय करायला आवडतं हे पालकांनी समजून घ्यावे. तिला स्वयंपाक करायला आवडतो तर, तिला एक रेसिपी बुक बनवायला सांगू शकतो. एखादा नवीन पदार्थ करायला शिकली तर, त्याची रेसिपी तिने त्या वहीत लिहायची. स्वत:च पुन्हा वाचून बघायची. काही चुका असतील तर दुरुस्त करून घ्यायच्या. तिला चुकलेलं स्वत:ला कळेल कारण तिने स्वत: तो पदार्थ करून बघितला आहे. अशाप्रकारे दुसऱ्या कुणाची मदत न घेता ती मुलगी लिहिणं, वाचणं दोन्हीचा सराव करू शकेल, शब्दसंग्रह वाढवू शकेल.
९. स्वयंपाकाच्या अनुभवात असलेले गणित, शास्त्र या सगळ्या गोष्टी समजून घेण्यामध्ये पालक त्या मुलीला प्रोत्साहन देऊ शकले तर, पाठ्यपुस्तकांच्याशिवाय ती मुलगी तिच्या वयाच्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी येणं अभिप्रेत आहे त्या सगळ्या आणि त्यापेक्षा जास्तीच्यासुद्धा गोष्टी शिकू शकेल.
१०. सध्याची परिस्थिती अवघड वाटत असली तरी हा एक लहान कालावधी आहे. जग यापेक्षा चांगले असणार आहे, जगणे सुंदरच असते यावर आपण विश्वास ठेवणे आणि हा विश्वास सतत संवादातून मुलांपर्यंत पोहोचवणे हे मोलाचे कामही पालकांना करावे लागेल.
(Image : Google)
कोरोनानंतरचं जग आणि शिक्षण
कोरोनापूर्व जग आणि कोरोनानंतरचे जग यामध्ये बराच फरक असणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात एक लवचीकपणा आणण्याची गरज आहे. स्वत: न चिडता, त्रास करून न घेता, आपले ताण दुसऱ्यांवर न लादता आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, सकारात्मकतेने कसे जगायचे याचे उदाहरण मुलांसमोर ठेवणे हे पालकांसाठी महत्त्वाचे आव्हान आहे. कारण मूल त्यांचंच अनुकरण करीत असतं.
मोठ्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत. सततच्या मोबाईल हाताळणीमुळे मोबाईलची व्यसनापर्यंत गेलेली सवय मोडणे, लॉकडाऊन बॅच या नावाखाली मुलांच्या शिक्षणाची कुचेष्टा करणारे विनोद, किस्से याकडे दुर्लक्ष करणे, आत्मविश्वास जागृत ठेवणे आणि अभ्यासावरचा हललेला फोकस पुन्हा जागेवर आणणे अशा अनेक पातळीवर त्यांना मदत लागणार आहे.
(लेखिका सहज शिक्षण उपक्रमात कार्यरत आहेत.)
dranjana12@gmail.com