कोरोनाची परिस्थिती सध्या तरी आपल्याकडे बरीच निवळलेली आहे. दुसऱ्या लाटेचा बहर ओसरला असून तिसरी लाटही अजून आलेली नाही. शिवाय दर दिवशी नव्याने आढळून येणारी रूग्णसंख्याही खूप कमी झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरांमधली रोजची आकडेवारी पाहिली तर ५० पेक्षा अधिक रूग्णवाढ नाही. अशा परिस्थितीत आता बाजारपेठा, शॉपिंग मॉल, पर्यटनस्थळे असे सर्व काही सुरू झाले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे काही पालकांचे म्हणणे आहे, तर अजूनही बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.
याविषयी अमेरिका येथे America's Centers for Disease Control and Prevention (CDC) या संस्थेनी एक सर्व्हेक्षण केले आहे. अमेरिकेत मार्च महिन्यातच शाळांना सुरूवात झाली आहे. संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार जर शाळांमध्ये योग्य काळजी घेतली गेली तर शाळांमधून कोरोना पसरण्याचा धोका खूप कमी आहे, असे सांगितले आहे. दि न्युयॉर्क टाईम्स यांनीही खरंच शाळा सुरू होण्याने कोरोना रूग्णसंख्या वाढते का, याविषयी एक सर्व्हेक्षण केले आहे. त्यांच्या सर्व्हेक्षणानुसारही कोरोना रूग्णसंख्यावाढीसाठी शाळा जबाबदार नाहीत, असे आढळून आले आहे. मात्र सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर या दोन्ही गोष्टी यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत, असेही या संस्थेच्या अहवालात सांगितले गेले आहे.
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अमेरिकेतील जवळपास निम्म्या शाळा सुरू झाल्या होत्या. मे महिन्यात तर अमेरिकेत ९० टक्के शाळा खुल्या झाल्या होत्या. मे महिन्याच्या मध्यात अमेरिकेत ३३ हजार कोविड रूग्ण आढळून आले होते. हेच प्रमाण मे अखेरीस १७ हजारांपर्यंत खाली आले आहे. भारतातही काही राज्यांमध्ये जून महिन्यापासून शाळांना सुरूवात झाली आहे. मोठ्या वर्गातील मुलांना शाळांमध्ये बाेलविण्यात येत आहे.
भारतातही शाळा सुरू झाल्याने कोविड रूग्णसंख्या खूप वाढली, अशी आकडेवारी नाही. उदाहरणार्थ बिहारमध्ये जुलै महिन्यात ३८५ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती. ही संख्या ऑगस्टमध्ये १७९ एवढी आहे. हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेशातही अशीच परिस्थिती आहे. या राज्यांमध्ये कोरोना जुलै महिन्यात अनुक्रमे ३६३, १६९ आणि ११९ एवढे रूग्ण आढळून आले होते. हे प्रमाण ऑगस्टमध्ये अनुक्रमे १६४, १०६, ६३ एवढे खाली आले आहे. त्यामुळे योग्य काळजी घेतली तर शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे हा अभ्यास सांगतो.
अमेरिका आणि भारतातील शाळांमध्ये फरकअमेरिका आणि भारतातील शाळांमध्ये खूप फरक आहे. तेथील शाळांचे कॅम्पस मोठे आणि विद्यार्थी संख्या मर्यादित असते. आपल्याकडे हे नेमके उलटे आहे. शिवाय तेथील विद्यार्थी आणि पालकही प्रचंड शिस्त पाळणारे आहेत. आपल्याकडच्या लोकांची मानसिकता वेगळी आहे. त्यामुळे अमेरिकेचे शाळेच्या बाबतीतले हे सूत्र आपल्याकडे कितपत यशस्वी ठरेल, याबाबत बहुसंख्य लोकांच्या मनात साशंकता आहे. याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आणि कोरोनाची शिस्त शाळांमध्ये पाळली गेली नाही, तर जी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ती सावरण्यासाठी आपला आरोग्यविभाग सध्या तरी तयार नाही, अशी काळजीही आरोग्य विभागातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.