मोबाइल हा आपल्या प्रत्येकाचाच आणखी एक अवयव असल्याप्रमाणे झाला आहे. मोबाइल नसेल तर अनेकदा आपल्याला काही सुधरत नाही. कारण दर काही वेळाने आपल्याला स्क्रीन पाहण्याची सवय झालेली आहे. ही समस्या फक्त मोठ्यांचीच नाही तर लहान मुलांमध्येही वाढली आहे. मोबाइलचे वाढते वेड मुलांच्या मानसिक शारीरिक आरोग्यासाठी घातक असल्याचे आपण ऐकतो. पण तया घातक परिणामांची आपल्याला कल्पना असतेच असे नाही. मोबाइलवर तासन् तास गाणी-गोष्टी पाहणे, गेम खेळणे, विविध प्रकारचे व्हिडिओ पाहत राहणे याचे एका ठराविक काळानंतर व्यसन लागते आणि मुलांसाठी हे व्यसन धोक्याचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे (Screen addiction in children's know how excessive screen time can cause virtual autism by doctor Arpit Gupta).
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याने नुकतीच बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. अर्पित गुप्ता यांची एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत डॉ. गुप्ता यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केले आहे. सततच्या स्क्रिनमुळे मुलांना कोणकोणत्या समस्या भेडसावतात आणि भविष्यात त्याचे रुप कशाप्रकारे गंभीर होत जाते याविषयी त्यांनी यात सांगितले आहे. पालकांनी या गोष्टीकडे वेळीच लक्ष देण्याची आणि त्यावर योग्य तो मार्ग काढण्याची आवश्यकता असून दुर्लक्ष करणे मुलांच्या एकूण वाढीसाठी घातक ठरु शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. गुप्ता सांगतात मोबाइलच्या अतिवापराने नेमके काय होते..
१. स्क्रीन टाइममुळे मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. त्यांची सामाजिक तसेच संवाद कौशल्य नष्ट होतात.
२. स्क्रीनमुळे मुलांमध्ये डोफामिन या हार्मोनची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. ज्यामुळे मुलांना इतर सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो किंवा त्यात काही रस वाटत नाही.
३. या मुलांच्या हातातून फोन काढून घेतला तर ते खूप जास्त प्रमाणात चिडचिड करतात.
४. सगळ्यात महत्त्वाचा गंभीर परीणाम म्हणजे सतत स्क्रीन पाहणाऱ्या मुलांना व्हर्च्युअल ऑटीझम होतो. हा एक न्यूरो बिहेविअरल डिसऑर्डर म्हणजेच मेंदूशी निगडीत आजार आहे. यामध्ये मुलं केवळ उशीरा बोलतात असं नाही तर सामाजिकदृष्ट्या ही मुलं मागे राहतात. म्हणजेच लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे अशा मुलांना अवघड जाते. या गोष्टींमुळे बरेचदा ही मुलं एकटं राहणं पसंत करतात.