सायली कुलकर्णी (सायकॉलॉजिस्ट, पुणे)
'अवघ्या नऊ महिन्यांची सारा समोर मोबाईल धरल्याशिवाय तोंडातला घास गिळत नाही...' 'नऊ वर्षांचा अनय जवळपास दिवसभर कार्टून नेटवर्क बघत असतो..' तर 'अकरा वर्षांचा पार्थ अखंड व्हिडिओ गेम खेळण्यांमध्ये दंगा असतो..' ही उदाहरणं आता आपल्याला काही नवीन नाहीत.
घरात, हॉटेलमध्ये, बस स्टॉपवर अगदी प्ले ग्राउंडमध्ये सुद्धा मुलांच्या हातात सर्रास मोबाईल दिसून येतो. अतिशयोक्ती नाही पण परवा कौन्सिलिंग साठी आलेल्या अर्णवच्या (वय वर्ष ६) आईने तक्रार सांगितली की, "पण काय करू, मोबाईल पाहिल्या शिवाय त्याला 'शी' होतच नाही."
आता मला सांगा या अशा सवयी मुलांना लागतात तरी कशा ? यामागे बरेचदा पालकांना हवे असणारे 'इन्स्टंट सोल्युशन' कारणीभूत असते. टीव्ही लावला, मोबाईलवर व्हिडिओ लावून दिला की मुलं तात्पुरती शांत होतात, खातात.. मग याचचं रूपांतर पुढे 'न सोडता येणाऱ्या सवयींमध्ये' होतं. मी मुद्दामच इथे इंटरनेटचे व्यसन हा शब्द वापरला नाही. पुढे जाऊन याच हट्टी सवयी पुढे जाऊन 'इंटरनेट ॲडिक्शन' मध्ये रूपांतरित होऊ शकतात. हे जहरी सत्य पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. या लेखात विशेषतः बारा वर्षांपर्यंतची मुले असणाऱ्या पालकांशी आपण बोलू.
गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या संशोधनातून असे पुढे आले आहे की, 'स्क्रीन टाईम जास्त असणाऱ्या मुलांच्या बोधनिक क्षमता जसे की - स्मृती, अवधान एकाग्रता, प्रोसेसिंग स्पीड, भाषा कौशल्ये इ.. वर घातक परिणाम झालेला आहे. तसेच सहा ते बारा वर्षांच्या मुलांमध्ये अतिरिक्त वजन वाढणं, डोळ्यांच्या समस्या, इतर शारीरिक आणि मानसिक समस्या आढळून आल्या आहेत.
(Image : Google)
मग मुलांना डिजिटल डिव्हाइस द्यायचंच नाही का?
गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षण क्षेत्रात जे काही बदल झालेत त्यामुळे ऑनलाइन ॲक्टिव्हिटीज, डिजिटल डिव्हायसेस, इंटरनेटचा वापर या गोष्टी पूर्णपणे टाळणे अशक्य वाटते. मग प्रश्न उरतो तो 'या गोष्टींचा वापर केंव्हा, किती आणि कसा करायचा?'
या प्रश्नाबाबत आत्ताच एक पालक म्हणून स्मार्टली विचार करायला हवा कारण-
डिजिटली स्मार्ट असलेली आपली मुलं खऱ्या आयुष्याच्या प्रश्नांनाही तितक्याच स्मार्ट आणि समर्थपणे सामोरी जाणे महत्त्वाचे आहे.
आभासी आणि वास्तव जग यांच्यात त्यांची गफलत होता कामा नये.
इंटरनेट ॲडिक्शन, सायबर धोके यामुळे त्यांचे आयुष्य उधळून जायला नको.
म्हणूनच आपली मुले अगदी लहान असल्यापासून आपलं 'डिजी सेन्सिबल पालकत्व' तयार होणं गरजेचं आहे.
(Image : Google)
पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय असावी?
तुमची मुले तुम्हाला ऐकून नाही तर बघून शिकतात. त्यामुळे एक पालक म्हणून आधी स्वतः आपण डिजिटल डिव्हायसेसचा अतिरिक्त वापर करत नाही ना? हे तपासा. इंटरनेटचा जबाबदारीने आणि इफेक्टिव्ह वापर करायला शिका आणि आपल्या मुलांनाही शिकवा.
स्मार्ट डिजिटल डिव्हाइसेस नक्की वापरा. पण त्यांच्या वापर माहिती मिळवण्यासाठी, अभ्यासासाठी करण्याकडे कल ठेवा.
मनोरंजन, टाईमपास आणि काम यासाठी होणाऱ्या डिव्हायसेसच्या वापरातला फरक लक्षात घ्या आणि तो मुलांनाही समजावून सांगा.
दोन वर्षांच्या आतील मुलांना तुम्ही इजा करणारी टोकदार वस्तू किंवा सुरी द्याल का? मग त्यांच्या डोळ्यांसाठी आणि मेंदूच्या वाढीसाठी घातक असलेली स्क्रीन मुलांना दाखवत असताना तितकेच सावध रहा.
तज्ञांच्या शिफारसीनुसार, दोन वर्षांच्या आतील मुलांसाठी स्क्रीन टाईम शक्यतो नकोच.
या वयातील मुलांना गाणी गोष्टी दाखवण्यापेक्षा ती ऐकवा.
तज्ञांच्या शिफारसीनुसार, दोन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी एका तासापेक्षा जास्त स्क्रीन टाईम असू नये.
दोन ते चार वर्षांच्या आतील मुलांच्या हातात इंटरनेट असलेले डिव्हाइस देताना स्वतः त्यांच्या सोबत थांबा.
मुलांना बघण्या-ऐकण्या बरोबरीने स्पर्श, चव, वास यांचाही अनुभव घेण्याच्या दृष्टीने उपक्रम आखा.
डिजिटल डिव्हाइसला वाचन, चित्रकला, संगीत, वाद्य वादन, नृत्य, मैदानी खेळ अशा उपक्रमांचा मुलांच्या आवडीनुसार पर्याय द्या.
जेवणाचा वेळ ' डिव्हाइस फ्री' असण्यावर भर द्या.
रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन बघणे टाळा.
इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मुलांशी संवाद साधा. आवश्यकता वाटल्यास तज्ञांची मदत घ्या.
मुलांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन / तात्काळ समाधान मिळवण्यापेक्षा इंटरनल ग्रॅटिफिकेशन/ चिरकाल आणि शाश्वत समाधानाचा आनंद घ्यायला शिकवा.
त्यासाठी ऐकण्या बघण्याच्या पुढे जाऊन कृतीच्या, आनंद अनुभूतीच्या संधी उपलब्ध करून द्या.
'अनप्लग फॅमिली' म्हणून एकमेकांसोबत काही वास्तव क्षणांचा आनंद घ्या.
'डीजी सेन्सिबल' पालकत्वाच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.
(लेखिका पुणेस्थित सायकॉलॉजिस्ट असून सहाय्यक प्राध्यापक आणि शैक्षणिक सल्लागार आहेत. 9552542012 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)