- माधवी कुलकर्णी
आपल्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही गोष्टींचं नियोजन करत असतो. विशेषतः शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर अर्थार्जन सुरू होते. घर, गृहस्थी, मुले, त्यांचे शिक्षण, त्यांचे करिअर इत्यादी होईपर्यंत चांगले - वाईट अनुभव आलेले असतात. वय वाढत असतं आणि एका टप्प्यावर लखलखीतपणे जाणवतं की, आयुष्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही काही वर्षे लोटली आहेत. आपली साधारणपणे ती साठी-पासष्ठी असते.
काही वेगळे विचार मनात यायला लागतात. थेट मृत्यू अजून लांब आहे, असं वाटत असतं. पण, तो खूप लांब नाहीही हे जाणवत असतं. त्या टप्प्यावर आपले काय काय नियोजन आहे, यावर आपले वृद्धत्व कसे जाईल हे खूप ठरतं, असं मला वाटतं.
हे नियोजन केवळ अर्थविषयक असणे मला अभिप्रेत नाही. तो तर महत्त्वाचा भाग आहेच आणि असायलाही हवा. कारण आपण किती जगणार हे माहीत नसल्यामुळे शक्यतो आर्थिकदृष्ट्या तरी परावलंबी असू नये, ही प्रत्येकाची मनोभूमिका असणे आवश्यक आहे.
मात्र, आपल्या मनाचे व्यवस्थापन हा एक गहन विषय आहे आणि त्याचा विचार आधी केला गेला असेल तर आपण वाढवलेल्या पसाऱ्यातून हळूहळू पाय काढायला लागायचं हे वय आहे हे लक्षात येतं. माणसांतून मन काढणं सोपं नाही आणि ते करूही नये, असं मला वाटतं. फक्त माणसांकडून अपेक्षा कमी करत, त्या नाहीच ठेवायच्या हे जमतंय का ते बघता येईल.
(Image : google)
पसाऱ्यातून पाय मोकळा करता येतो?
१. वस्तूंमध्ये गुंतलेलं मन काढणं मात्र कटाक्षाने करण्याची गोष्ट आहे. घरातल्या प्रत्येक वस्तूशी आपली आठवण तरी जोडलेली असते किंवा तिची उपयुक्तता वादातीत आहे, असं आपलं मत असतं. मी याबाबतीत एक करून पाहिलं, ते म्हणजे अत्यावश्यक वस्तू, आवश्यक वस्तू, आवडणाऱ्या वस्तू आणि उगीचच घरात सवयीने वर्षानुवर्षे राहणाऱ्या वस्तू ज्या उपयोगात नसतात, अशी एक यादी केली. यादीने मनाला स्पष्टता आली. उगीचच असलेल्या वस्तू अर्थातच आधी घराबाहेर गेल्या. अर्थात कोणाला हव्या आहेत का ते विचारून त्या त्या व्यक्तिला आधी दिल्या, बाकी कोणी सेवाभावी संस्था किंवा शेवटी भंगार.
२. एकदा ही प्रक्रिया करायची ठरवली की, पुढे आवडत्या वस्तूही आपण आनंदाने देऊ शकतो. हे सगळे हळूहळू केले की, वस्तूंचा वियोग मनाला जाणवत नाही. मग आपोआप नवीन खरेदीलाही लगाम बसायला सुरुवात होते. अगदीच एखादा कपडा, वस्तू आवडली आणि ती घ्यावीशी वाटली तर त्याचा समकक्ष कपडा किंवा वस्तू घराबाहेर गेली पाहिजे, हे पाहायला लागतं. नाहीतर पुन्हा घर आपले सामानाने भरलेले व्हायला कितीसा वेळ लागणार?
३. मागे एका मुलाखतीत अर्थ नियोजनासंदर्भात मी चार ‘वा’ ऐकले होते. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी ते ‘वा’ दिशादर्शक ठरू शकतात. पहिला ‘वाचवा’, मग ‘वाढवा’, मग ‘वापरा’ आणि शेवटी ‘वाटा’! ते ऐकल्यावर मी मनापासून ‘वा’ म्हटलं! तरुण वयात पैसा वाचवा, तो वाढवा, मध्यावर आल्यावर तो वापरा म्हणजे त्याचा आनंदाने उपभोग घ्या आणि शेवटी वाटा म्हणजे दान करा.
४. माणसे आपल्या कुवतीनुसार काही दान केव्हा ना केव्हा करतच असतात. पण, त्यामध्ये आपल्या उत्तरार्धात आपण त्यात नियमितता आणू शकतो. आपल्या गरजा नाही म्हटले तरी कमी झालेल्या असतात, ज्यांच्या गाठीला चार पैसे असतात, त्यांनी आपल्या हयातीतच होतकरू, गरजू लोकांना, सेवाभावी संस्थांना नियमित देत राहावे. जे पैशाबाबत तेच वस्तूंबाबत धोरण ठेवावे. शेवटच्या आयुष्यातला तो एक आनंदाचा ठेवा होतो.
५. आपण जेव्हा उर्वरित आयुष्यात लागणाऱ्या पैशांचा विचार करतो तेव्हा साधारणपणे आपल्या इतर मालमत्तेचाही विचार केला पाहिजे. इथे मृत्यूपत्राचा किंवा गरजेनुसार गिफ्ट डीडचा विचार आणि त्या दृष्टीने कृती आवश्यक आहे. आपल्याकडे एक काळ असा होता की, मृत्यूचा उच्चार करणे अशुभ मानले जायचे आणि मृत्युपत्र तर फार श्रीमंतांनी करण्याची गोष्ट होती. पण काळ बदलला आहे. मध्यमवर्गाकडेही आता काही जायदाद, दागदागिने, पैसाअडका असतो. त्यांनी मृत्युपत्र अवश्य करावे.
६. मृत्युपत्र कसे करावे, याबाबत आता पुष्कळ माहिती उपलब्ध असते. तरीही वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. यासंदर्भात मला एक मुद्दा मांडायचा आहे. पुढे वारसदारांत काही भांडणे होऊ नयेत म्हणून मृत्युपत्र करायचे असते. आपसात नाती चांगली असतील तर कोणत्याच मुलावर अन्याय होऊ नये आणि ज्याला जे गरजेचे ते मिळावे, या हेतूने आधीही बोलणी करून मृत्युपत्र करता येईल. मात्र, तसा स्नेहभाव कुटुंबांत नसेल तर आपल्याला जे योग्य वाटेल ते करणे आपल्या हातात असते.
७. जगण्याचा पाया विचार आणि विवेकावर असेल आणि नाती सुदृढ असतील, कुटुंबात स्नेहभाव असेल, तर मग ज्येष्ठ नागरिक आवराआवर, मृत्युपत्र वगैरेचा विचारही आपण कदाचित स्थिरचित्ताने शांतपणे करू शकू. नाही का?
(लेखिका दूरदर्शनमधून निवृत्त अधिकारी असून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवतात.)
madhavi.peegee@gmail.com