Join us  

मुलांना शाळेत घातलं, पण शाळेत जाताना ते खूप रडतात? आईबाबा आणि शाळेनं काय करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 5:41 PM

लहानशा मुलांना शाळेत घातले की ते रडतात, आईबाबा-शिक्षकांनी अशावेळी काय करावं?

ठळक मुद्दे शिक्षणाचा आणि आनंदी जगण्याचा पाया मजबूत होईल आणि आनंददायी शैक्षणिक प्रवासाला आरंभ होईल!

सबा खान,(मुख्याध्यापक इस्पॅलिअर स्कूल, नाशिक)

शाळेचा पहिला दिवस खास असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातला मैलाचा दगड. मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात शाळेच्या पहिल्या दिवशी होते. लहानशी मुलं पहिल्यांदाच शाळा नावाचं नवीन जग पाहणार असतात. एकीकडे नव्याचा उत्साह असतो, पण मुलांच्या आयुष्यातला हा फार मोठा बदल असतो. अगदी समजुतीने, प्रेमाने मुलांची ही नवीन फेज हाताळली पाहिजे. शाळेची मुलांच्या मनात अन्झायटी असू शकते, त्याला सेपरेशन एन्झायटी असेही म्हणतात.

सेपरेशन एन्झायटी काय असते?अनेक पालकांच्या मुलांकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी फार अपेक्षा असतात. त्यांना वाटते की आपले मूल अजिबात रडणार नाही. आपले मूल फ्रेण्डली आहे, स्ट्रॉँग आहे, सहज मिळूनमिसळून वागते तर त्याने रडू नये. त्यात काही मुलांना आधीच प्री स्कूलला घातलेलं असतं, तर त्यांना शाळेची सवय आहे असं पालकांना वाटतं. पण, मुलांचं तसं नसतं, अनेक मुलं शाळेच्या पहिल्या दिवशी रडतात. ते अगदी नैसर्गिक आहे. त्या रडण्यालाच सेपरेशन एन्झायटी म्हणतात. नवनवीन चेहरे, अगदी अपरिचित नवं वातावरण, घरातलं-मायेचं-परिचयाचं कुणीच जवळ नाही या सगळ्याची प्रतिक्रिया म्हणून मुलं रडतात. जे अगदीच स्वाभाविक आहे. सहज प्रतिक्रिया आहे.

मुलं रडतात कारण त्यांना असुरक्षित वाटतं. नव्या वातावरणात परकं वाटतं. शाळेचं वातावरण जरी शिकण्यासाठी, मुलांनी खूप मजा करण्यासाठी, मुलांसाठी अतिशय मायेनं जरी तयार केलेलं असलं तरी ते मुलांसाठी नवं असतं. मुलं धास्तावतात. बावचळतात. हळूहळू जसजसं ते त्या वातावरणात रुळतात, ते वातावरण, तिथली माणसं, शिक्षक परिचयाचे होतात तसतशी त्यांना शाळा आवडू लागते. पण, शाळेविषयी असा विश्वास वाटणं, मायेचा धागा तयार होणं यासाठी थोडा वेळ जावा लागतो. हळूहळू मुलांच्या लक्षात येतं की शाळेत मजा येते, इथं छान वाटतं. आपण सुरक्षित आहोत, ठरल्यावेळी आईबाबा आपल्याला घ्यायला येतील, तसतशी त्यांची धास्ती, भीती, एन्झायटी कमी व्हायला लागते.शाळा बदलली तरी मुलांना अशी धास्ती वाटते कारण त्यांच्यासाठी नव्या शाळेतलं वातावरण नवीन असतं. तेही रडतात. कारण त्यांना आधीच्या शाळेची आठवण येते, तिथल्या शिक्षकांची आठवण येते. आणि काही मुलं तर इतर मुलं रडतात म्हणून त्यांना पाहून पाहूनही रडतात. बाकीच्यांना रडताना पाहून यांच्याही मनातली भीती, धास्ती, असुरक्षितता दाटून येते.

अशावेळी आईबाबांनी काय करायला हवं?सेपरेशन एन्झायटीच्या या नवनव्या काळात आईबाबांची भूमिकाही फार मोलाची ठरते. आईबाबांनी काही गोष्टी केल्या तर मुलांसाठी शाळेत रुळणं सोपं होतं.१. मुलांना नव्या वातावरणात रुळण्यासाठी पालकांनी वेळ द्यायला हवा. मुलांनाही सांगायला हवे की सुरुवातीला असं वाटतं, हे थोडे दिवस वाटेल मग तुला मजा येईल शाळेत. मूल रडतं म्हणून पालकांनीच पॅनिक होऊन हातपाय गाळू नयेत.२.मुलांच्या मनाची तयारी करा. शाळेत जाणं का महत्त्वाचं आहे, सगळ्यांना जावं लागतं. शाळेत किती मजा येते याविषयी स्वत:चे अनुभव मायेनं सांगा. मोठे बहीण-भाऊ, मित्र यांचे शाळेविषयीचे किस्से उत्साहाने-प्रेमानं सांगितले तर मुलांसाठीही बदलाची नवी गोष्ट सोपी होेते.३. मुलांशी खोटं बोलू नका, धाक दाखवू नका, भीती घालू नका. त्यापेक्षा प्रेमानं सांगा, शाळेविषयी सकारात्मक गोष्टी सांगा आणि आपण ठरल्यावेळी, इतके वाजता तुला न्यायला येऊ असं सांगा. शाळेतले मित्र, नव्या गमतीजमती हे सारं उत्साहानं सांगा. शाळेची भीती घालू नका.४. मूल शाळेत कधीकधी खूप रडतं, अजिबात शाळेत थांबायला तयार नसतं. अशावेळी शाळेतून पालकांना मुलांना घ्यायला या, असा फोन येऊ शकतो. तसं झालं तर पटकन या, मुलांना काही न म्हणता घेऊन जा. तसं केलं तर मुलांनाही वाटतं की आईबाबा जवळ आहेत, ते पटकन येतात हा विश्वासही मुलांसाठी महत्त्वाचा असतो.

शाळा आणि शिक्षकांसाठी काय महत्त्वाचं?

१. शाळेत मुलांसाठी अत्यंत आनंदी, सकारात्मक वातावरण हवं. मुलांना शाळेत भरपूर माया मिळायला हवी. त्यांना वाटलं पाहिजे की इथे आपण मजेत आहोत, सुरक्षित आहोत, ही सगळी माणसं आपल्यावर खूप प्रेम करणारीच आहेत. तसं झलं तर मुलं पटकन रुळतात. त्यांची भीती कमी होते आणि हे सगळं आपलंच आहे असं त्यांना वाटू लागतं.२. मूल खूपच रडत असेल, वर्गात बसायलाच तयार नसेल तर त्याला डांबून न ठेवता सुरुवातीला लवकर घरी जाऊ द्यायला हवे. शाळेची वेळ हळूहळू वाढवली पाहिजे.३. मूल ऐकत नसेल तर त्याचं आईशी फोनवर बोलणं करुन द्यायला हवं. आपली आई जवळच आहे, आपण सुरक्षित आहोत असं त्यामुळे मुलांना वाटतं.

आईबाबा आणि शाळाआईबाबा आणि शाळा दोघांनी मिळून मुलांसाठी एक सुंदर, पोषक आणि आनंदी वातावरण तयार करायला हवं. जिथं मुलं रुळतील, आनंदानं नव्या गोष्टी शिकतील. त्यासाठी दोघांनी एकत्र प्रयत्न केले तर मुलांसाठी हा नवा टप्पा सोपा होईल. त्याच्या शिक्षणाचा आणि आनंदी जगण्याचा पाया मजबूत होईल आणि आनंददायी शैक्षणिक प्रवासाला आरंभ होईल!

espaliersaba@gmail.com

टॅग्स :Shalechi Taiyariपालकत्वशिक्षणशाळालहान मुलं