डॉ. लीना मोहाडीकर
मुलं वयात यायला लागली की त्यांच्या शरीरात बरेच बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेताना त्यांची मानसिक आणि भावनिक कुचंबणा होण्याची शक्यता असते. अशावेळी पालकांनी त्यांच्याशी मोकळा संवाद साधून त्यांना काही शंका असल्यास त्याचे निरसन करायला हवे. अन्यथा मुले नको त्या ठिकाणहून लैंगिक विषयातील माहिती घेतात आणि चुकीची किंवा अनावश्यक माहिती मिळाल्यास अडनीड वयात काहीबाही प्रयोग करतात. अशावेळी पालकांनी वयात येणाऱ्या मुलांकडे पुरेसे लक्ष दिल्यास मुलांची योग्य आणि निकोप वाढ होते. वयात आलेल्या मुलांच्या शरीरात प्रामुख्याने कोणते बदल होतात आणि त्याबाबत त्यांना काय माहिती द्यायला हवी याविषयी (Sexual Changes in Boys when they become adult Parenting Tips)...
१. वयात आलेल्या मुलांना पहिला अनुभव येतो तो लिंगाला ताठरपणा येण्याचा. इतर मुलींकडे बघून, चित्रपट – नाटक – जाहिरातीं मधील कामुक दृश्य बघून कामभावना वारंवार मनात येतात. ताठर अवस्थेतील लिंगाला हाताने चाळवलं की उत्तेजना वाढत जाऊन वीर्यपतन अनुभव आला की आलेला ताण हलका होतो, आनंदाचा अनुभव येतो. तीच क्रिया परत परत करावीशी वाटते. अशा या हस्तमैथुनाची सवय बहुतेक मुलांना कमी जास्त प्रमाणात लागतेच.
२. बहुधा आत्तापर्यंत लिंगाला स्पर्श करण्या बाबत नकारात्मक आज्ञाच पालक आणि इतरांकडून मिळाल्या असल्याने अनेक मुलांच्या मनात हस्तमैथुन क्रियेबद्दल भीतीच बसलेली असते. पण आलेल्या काम उर्मी स्वस्थ बसू देत नाहीत, हस्तमैथुन केलचं जातं. हस्त मैथुनामुळे लिंगाची वाढ खुंटली, लिंग वाकडं झालं, स्मरणशक्ती कमी झाली, अशक्तपणा आला, शरीरातलं रक्त कमी झालं अशा समजुती वाढायला लागतात. काही जण या भीतीने हस्तमैथुन सोडून देतात, तर काही अधूनमधून येतोय का ताठरपणा या चाचपणीसाठी हस्तमैथुन करून बघतात.
३. हस्तमैथुन केलं नाही तरी स्वप्न पडून झोपेत वीर्यपतन होतच असतं. या आपोआप जाणार्या वीर्यामुळे आपल्याला वीर्यनाश होईल अशी भीती अनेकांना वाटते. काही मुलांना दुसर्या दिवशी अशक्तपणा, निरुत्साह असं काही जाणवतं राहतं. या काळजीने अभ्यासातल लक्ष विचललीत होतं. खरं पाहता वयात आल्यापासून मरेपर्यंत पुरुषांमध्ये वीर्य निर्मिती होत असते. आणि वीर्य हे पुरुष शरीरा बाहेर पडण्यासाठीच असतं. त्यामुळे हस्तमैथुन आणि स्वप्नावस्थेत वीर्यपतन झाल्यामुळे शरीराला कोणताही अपाय होण्याची शक्यताच नसते.
४. हस्तमैथुन ही संभोगाची नक्कल आहे. आलेला लैंगिक ताण हलका करण्यासाठी हस्तमैथुना सारखा दुसरा निर्धोक मार्ग नाही. हे जर वयात आलेल्या मुलाला समजावून दिलं तर त्याच्या मनातील अनावश्यक ताण भीती नष्ट होतील. या मुलांना हे सुद्धा समजावून दिलं पाहिजे की वारंवार लिंग ताठरता येणं हे नैसर्गिक असलं तरी मुद्दाम हाताने चाळवून, उत्तेजक चित्र, व्हिडिओ बघून, कामुक वर्णनं वाचून, कामोद्दीपन आणण्याची अजिबात आवश्यकता नाही. लैंगिक उत्तेजना येण्यासाठी कुठलेही प्रयत्न करावे लागत नाहीत. लिंग ताठरता येणं, टिकणं या गोष्टी पूर्णपणे मनस्थितीवर अवलंबून असतात.
(क्रमश:)
(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)