Join us  

मोबाइल दाखवल्याशिवाय मूल जेवतच नाही? २ वर्षांच्या आतल्या मुलांना मोबाइल दाखवणंच धोक्याचं, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 3:39 PM

Side Effects of Screen Time in kids Before 2 Years : मोबाइलवर गाणी दाखवल्याशिवाय खातच नाही, निदान दोन घास जातात पोटात म्हणत मुलांना मोबाइल दाखवत भरवणं अत्यंत चुकीचं

मुलं ताटात दिलेलं खात नाहीत मग दाखव त्यांना मोबाइल, बाहेर गेल्यावर बोलू देत नाही, सतत रडरड करतं नाहीतर प्रश्न विचारतं मग दाखव गाणी किंवा कार्टून्स असं आपण अगदी सर्रास पाहतो. पालकांचं काम होत नाही किंवा त्यांना शांतता मिळावी म्हणून अनेकदा मुलांच्या हातात मोबाइल कोंबला जातो. सुरुवातीला हे पालकांना सोयीचं वाटत असलं तरी नंतर ही गोष्ट डोईजड होते आणि मग तेव्हा मात्र मुलं काही केल्या ऐकत नाहीत. एकदा मुलांना जेवताना किंवा थोडी रडारड केल्यावर आपल्याला मोबाइल मिळतो हे लक्षात आलं की तो पालकांकडून कसा मिळवायचा याचं तंत्र ते शिकतात. ही सवय हल्ली मुलांना ८-१० महिन्यापासूनच लागते (Side Effects of Screen Time in kids Before 2 Years). 

पालक, घरातील इतर व्यक्ती यांच्या हातात सतत मोबाइल असल्याने मुलांनाही कमी वयात त्याचे फॅसिनेशन वाटते. त्यावर दिसणारी हलती चित्रे, आवाज आणि प्रकाश याची त्यांना भुरळ पडते आणि मग एकदा चुकून जरी ही स्क्रिन हातात आली तरी मुलांना अतिशय पटकन त्याचे व्यसन लागते. एकदा या स्क्रिनची सवय झाली की मुलं ठरलेल्या वेळेला किंवा अगदी कधीही स्क्रिनशिवाय राहू शकत नाहीत. पालकांसाठी मात्र ही फारच त्रागा करायला लावणारी आणि त्रासदायक गोष्ट होऊन बसते. मात्र २ वर्षे वयाच्या आत मुलांच्या हातात मोबाइल अजिबात द्यायला नको. यामागे शास्त्रीयदृष्ट्या नेमकी काय कारणे आहेत ती समजून घ्यायला हवी. इन्स्टाग्रामवर बच्चों की डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. माधवू भारद्वाज याबद्दल काय सांगतात पाहूया…

(Image : Google)

१ ते ३ वर्षे वयात मुलांची सगळ्यात वेगाने वाढ होत असते...

१. फक्त चालणे, उभे राहणे आणि धावणे इतक्याच गोष्टींमध्ये ते वाढत नाहीत तर या काळात त्यांचे इतर सेन्सही अतिशय वेगाने डेव्हलप होत असतात. म्हणजेच एखाद्या गोष्टीला स्पर्श करायचा का नाही, अमुक गोष्ट करणे चूक की बरोबर अशा सगळ्या गोष्टी मुलांना समजत असतात. 

२. मोबाइलमध्ये मुलं लाईटस, सतत बदलणारी चित्र, आकर्षक रंग आणि आवाज या सगळ्या गोष्टींमध्ये गुंग होतात. मात्र हा संवाद एकतर्फी असल्याने यामध्ये त्यांना बोलावे, कोणाशी इंटरअॅक्ट करावे लागत नाही. मात्र त्यामुळे त्यांचे संवाद कौशल्य, एखाद्या परिस्थितीत कसे वागायचे याबाबत मुलांना काहीच समजत नाही. 

३. या सगळ्या गोष्टींमुळे उशीरा बोलणे, सतत टँट्रम दाखवणे, एकटेच राहणे आणि खेळणे अशा गोष्टी या मोबाइल पाहणाऱ्या मुलांमध्ये होऊ शकतात. कधी आजुबाजूला जास्त लोकं असतील तर अशी मुलं एकदम अनकम्फर्टेबल होतात. अशी मुलं आपल्या वयाच्या मुलांशी खेळू शकत नाहीत, संवाद साधू शकत नाहीत. 

नेमकं काय करायचं? 

१. मुलांचा स्क्रीन टाइम बंद करायचा. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आपल्या हातातून मोबाइल दूर ठेवावा लागेल. कारण ते आपल्याला पाहून सगळ्या गोष्टी शिकत असतात, त्यामुळे आपण जर मोबाइल दूर ठेवला तर तेही ठेवतील. 

२. मुलं घरात असतील तेव्हा घरातील प्रत्येकाने वेळ वाटून घेऊन त्यांच्यासोबत वेगवेगळ्या अॅक्टीव्हिटीज करायला हव्या. त्यांच्या वयाच्या मुलांसोबत ते कसे जास्तीत जास्त खेळतील यासाठी प्रयत्न करायला हवा. 

३. मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी जास्तीत जास्त गप्पा मारायला हव्यात. मुलांसोबतचा मी टाईम अतिशय महत्त्वाचा असतो. या वेळात मूल बोलतं झाल्याने त्याच्या मनातल्या गोष्टी, त्याच्या आजुबाजूच्या गोष्टींचा ते मूल कसं विचार करतं या सगळ्या गोष्टी समजणं सोपं होईल. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं