Worst skincare products for kids: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होणं स्वाभाविक आहे. लहान मुलांना तर जास्तच त्रास सहन करावा लागतो. घामोळ्या, पुरळ किंवा रॅशेज अशा समस्या लहान मुलांमध्ये अधिक बघायला मिळतात. अशात पालक आपल्या मुलांना आराम मिळावा म्हणून त्यांच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या क्रीम, पावडरचा वापर करतात. पण यातील काही गोष्टी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारकच अधिक ठरतात. अशात लहान मुलांसाठी उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी वापरू नये याबाबत एक्सपर्टकडून माहिती देण्यात आली आहे.
काय सांगतात एक्सपर्ट?
डर्मेटोलॉजिस्ट जुशिया सरीन यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, 'लहान मुलांची त्वचा खूप नाजूक, मुलायम आणि संवेदनशील असते. अशात थोडंही दुर्लक्ष महागात पडू शकतं. काही चुकीच्या स्किन प्रोडक्टमुळे मुलांची त्वचा तर खराब होईलच सोबतच आरोग्यही बिघडेल'.
लहान मुलांसाठी काय वापरू नये?
टॅल्कम पावडर
लहान मुलांच्या त्वचेसाठी काय वापरू नये यात सगळ्यात वरचा नंबर लागतो तो टॅल्कम पावडरचा. भारतात जास्तीत जास्त पालक मुलांना टॅल्कम पावडर लावतात. खासकरून उन्हाळ्यात घामोळ्या आणि रॅशेज दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, डॉक्टर सांगतात की, टॅल्कम पावडर नुकसानकारक ठरू शकतं. यात बरेच बारीक कण असतात, जे श्वासांच्या माध्यमातून फुप्फुसात जाऊ शकतात आणि याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे याचा वापर टाळाला.
अॅंटी-बॅक्टीरिअल साबण
बरेच लोक आपल्या लहान मुलांसाठी अॅंटी-बॅक्टेरिअल साबणांचा वापर करतात. पण डॉक्टरनुसार, या साबणा त्वचेसाठी नुकसानकारक असतात. त्यांच्यानुसार, लहान मुलांच्या त्वचेवर नॅचरली काही चांगले बॅक्टेरियाही असतात. जे अॅंटी-बॅक्टेरिअल साबणांनी नष्ट होतात.
सुगंधी उत्पादनं
डॉक्टर सांगतात की, लहान मुलांसाठी सुगंधी प्रोडक्ट्सचा वापर देखील टाळला पाहिजे. कारण यातील केमिकल्सनं लहान मुलांना एलर्जी किंवा रॅशेज होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांसाठी नेहमीच हलक्या, सुगंध नसलेल्या प्रोडक्ट्सचाच वापर करावा.