तब्बल २ वर्षांनी शाळा सुरू झाल्याने मुलांबरोबरच पालकांचीही धांदल उडाली आहे. शाळेचे रुटीन मागच्या २ वर्षांपासून काहीसे शांत असल्याने आई वर्गाला मुलांचे डबे भरणे, त्यांना तयार करणे या कामांमध्ये काहीशी विश्रांती होती. पण आता रुटीन पुन्हा पूर्वरदावर आल्याने पुन्हा डब्याला काय द्यायचे, मुलं वेळेत उठतील का, त्यांचे आवरेल का, रीक्षावाले काका वाट पाहून निघून तर नाही ना जाणार, मुलाला भूक लागली तर काय असे प्रश्न काहीसे सुरू झाले आहेत. जेवणाच्या डब्याला आपण मुलांना पोळी-भाजी देतोच. पण अनेकदा जास्त वेळाची शाळा असली किंवा घरापासून शाळेचे अंतर लांब असले तर मुलांना आणखी एखादा खाऊचा डबा लागतो. (Snack Options For School Tiffin) अशावेळी खाऊच्या डब्यात रोज काय द्यायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतो. सतत विकतचे काही ना काही किंवा बिस्कीटे देणे हा मुलांचे पोषण होण्यासाठी तितका चांगला पर्याय नाही. त्यामुळे त्यांना आवडेल आणि पोषकही होईल असा कोणता खाऊ द्यायचा याचे काही सोपे पर्याय...
१. लाडू
मुलांना साधारणपणे लाडू प्रकार आवडतात. तसेच गोड असल्याने लाडू आवडीने खाल्ले जातात. लाडू कॅरी करायलाही सोपे असल्याने एका छोट्या डब्यात एक किंवा दोन लाडू सहज बसतात. यामध्ये आपण आदलून बदलून लाडूचे वेगवेगळे प्रकार देऊ शकतो. लाडू घरात करणेही सोपे असते. घरात करायला जमत नसेल तर बाजारातही वेगवेगळे लाडू सध्या सहज उपलब्ध असतात. राजगिरी, चुरमुरा असे हलके लाडू किंवा दाण्याचा, सुकामेव्याचा, रव्याचा, बेसनाचा, नाचणीचा असे पोटभरीचे लाडू आपण मुलांच्या खाऊच्या डब्यात आवर्जून देऊ शकतो.
२. फळ
एरवी मुलं फळ खाण्यासाठी नाक मुरडतात. पण खाऊच्या डब्यात त्यांच्याकडे दिलेली गोष्ट खाण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच त्यांना भूक लागली असेल तर समोर असेल ते गपचूप खाऊ शकतात. मात्र बे फळ स्वच्छ धुवून, त्याच्या फोडी करुन द्यायला हवे. फळ गोड असल्याने मूल दमले असेल तरी पटकन एनर्जी मिळण्यास मदत होते.
३. खाकरा किंवा घरगुती पापड्या
मुलांना साधारणपणे पौष्टीक गोष्टींपेक्षा कुरकुरीत, तेलकट गोष्टी जास्त आवडतात. वेफर्स, कुरकुरे किंवा त्यासारखे पदार्थ मुलं अतिशय आवडीने खातात. पण त्यापेक्षा त्यांना सुरुवातीपासूनच खाकरा, घरात केलेले तळण असे दिल्यास ते खूशही होतात आणि पोटही भरते. यामध्ये उडदाचा पापड, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाच्या पापड्या, घरी केलेले बटाट्याचे वेफर्स अगदी सहज देऊ शकतो. खाकरा हाही खाऊच्या डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. खाकऱ्यावर एखादी चटणी आणि तूप घातल्यास त्याची चव आणखी वाढते.
४. चिवडा
चुरमुरे, साळीच्या लाह्या, मखाणे, पातळ पोहे यांचे चिवडे करणे सोपे असते. यामध्ये दाणे, खोबरे, लसूण, कडीपत्ता असे सगळे घातल्यास चिवड्याची चव तर वाढतेच पण चिवडा आणखी पौष्टीक होतो. पचायला हलका आणि कुरकुरीत असल्याने हा प्रकार मुलं आवडीने खातात. त्यांना आवडत असेल तर एका लहान डब्यात कांदा, टोमॅटो आणि कोथिंबिर दिली तर ते चिवड्यावर घालून खाऊ शकतात. यामुळे पोटभरीचे आणि ओलसर होते आणि भूकही भागते.
५. अंडे
अंडे हा प्रोटीन रिच पदार्थ असल्याने अंड्याचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. उकडलेले अंडे, ऑम्लेट, अंडा फ्राय असे अंड्याचे वेगवेगळे प्रकार आपण करु शकतो. मूलंही अंडं खाण्याची सवय असेल तर आवडीने खातात. अंड्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते आणि सारखी भूक लागत नाही. त्यामुळे झटपट खाता येईल आणि तरीही पौष्टीक असे अंडे खाऊच्या डब्याला आपण नक्कीच देऊ शकतो.