Join us  

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांना धाकात ठेवता? कडक शिस्तीचे होतात ६ दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 3:57 PM

शिस्त लावली तर मुलं सुधारतात, त्यांच्यावर संस्कार होतात असं पालकांना वाटतं. अशा या अति शिस्तीचा (strict parenting) मुलांवर काय परिणाम होतो याबद्दल झालेला अभ्यास मुलांवर 6 दुष्परिणाम ( effects of strict parenting on child) होत असल्याचं सांगतो.

ठळक मुद्देमुलं शिस्तीनं किंवा धाकानं जबाबदारी शिकत नाहीत.आपले आई वडिल आपल्याला समजून घेणार नाही अशी भीती मुलांमध्ये निर्माण होते.मुलं उध्दट होतात. स्वत:ला शिक्षेतून वाचवण्यासाठी खोट्याचा आधार घेतात. 

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी सर्व पालक प्रयत्न करत असतात, धडपडत असतात. मुलांवर संस्कार करणं, त्यांना शिस्त लावणं यासाठी आपल्याला कठोर व्हावंच लागेल असा समज अनेक आई बाबांचा असतो आणि त्यातूनच मुलांशी कठोरपणे (strict parenting)  वागलं जातं. मुलांना धाकात ठेवलं जातं, त्यांना अति शिस्त लावली जाते. आपल्या या शिस्तीमुळे मुलं सुधारतील, बिघडणार नाही असा विश्वास पालकांना वाटतो पण पालक जो विचार करतात तसं प्रत्यक्षात होत नाही असं अभ्यास सांगतो. पालकांच्या अति शिस्तीत वाढणाऱ्या मुलांवर शिस्तीचा, धाकाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला असता (study on strict parenting)  मुलांवर पालकांच्या धाकचे दुष्परिणाम झालेले दिसून आलेत. अति शिस्तीत वाढणाऱ्या मुलांचं वर्तन शिस्तीत/ धाकात न वाढलेल्या मुलांच्या तुलनेत बिघडलेलं आढळून आलं. ही मुलं आपल्या पालकांपासून दुरावलेली आढळून आली. पालकांच्या अति शिस्तीचे मुलांवर 6 दुष्परिणाम (effects of strict parenting on child)  होत असल्याचं अभ्यासातून आढळून आलं आहे. 

Image: Google

अति शिस्तीचे दुष्परिणाम

1. जबाबदारी, शिस्त मुलांना संवादातून, हसत खेळत लावायची असते. पण मुलांनी शिस्तीत राहावं म्हणून त्यांच्यावर नियम, निर्बध लादल्याने मुलांना सतत नियंत्रणात, बंधनात असल्यासारखं वाटतं . त्यांना यातून मोकळं व्हावंसं वाटतं. अशी मुलं आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडता जबाबदाऱ्यांपासून लांब पळतात. 

2. मुलांशी कडक वागणाऱ्या आई वडिलांबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण होते. आपलं काही चुकलं तर आपले आई बाबा आपल्याला समजून घेणार नाहीत, आपण आपल्या आई बाबांना आवडत नाही असा समज निर्माण होतो. त्यातून एकतर मुलांमध्ये खूप राग निर्माण होतो किंवा औदासिन्य निर्माण होतं. अशा मुलांमध्ये रागाची किंवा नैराश्याची लक्षणं दिसून येतात. 

Image: Google

3. मुलं चुकली तर त्यांना सहानुभूती न दाखवता, समजूतदारपणा न दाखवता त्यांच्यावर ओरडलं जातं. कधी इतरांसमोर तर कधी त्यांच्या मित्र मैत्रिणींसमोर. पालकांच्या अशा वर्तनानं मुलांचा स्वाभिमान दुखावतो. पुढे जावून ही मुलं आईवडिल जेव्हा ओरडतात तेव्हा त्यांचं ऐकून न घेता स्वत:चा स्वाभिमान जपण्यासाठी तेही आई वडिलांवर ओरडतात.  अति शिस्तीतून मुलांवर ओरडल्यास मुलं उर्मट/ उध्दट होतात. 

4. आई वडिलांच्या सतत धाकात वावरुन मोठ्या होणाऱ्या मुलांना जे सर्वोच्च स्थानी बसलेले असतात ( मग ते चुकीचे असले तरीही) तेच बरोबर वाटतात. जबाबदारीनं न वागता आपला वरचा व्यक्ती काय सांगतो याची वाट पाहात बसतात. अशी मुलं चुकीच्या विचारांच्या मागे सहज वाहात जातात. 

Image: Google

5. सतत शिस्तीत राहाणारी मुलं शिस्त तोडण्याच्या, नियम मोडण्याचा विचार करतात. एका टप्प्यावर त्यांच्यात ताकद आली की ते कसलीही भिडभाड न ठेवता वागायला लागतात. एक प्रकारे त्यांच्यावर लादल्या  गेलेल्या शिस्तीविरुध्द ते बंड करुन उठतात्, विद्रोही होतात. बाहेर वावरतानाही कोणतेच नियम पाळायचे नाही असंच ठरवून वागतात. बेशिस्त होतात. 

6. कडक शिस्तीचा दुष्परिणाम म्हणजे मुलं खोटं बोलायला शिकतात. आपल्याला आई वडिलांच्या ओरडण्यातून वाचायचं असल्यास त्यांच्याशी खोटं बोलायला हवं असं त्यांना वाटतं आणि त्यातून ते खोटं बोलायला लागतात. स्वत:ला वाचवण्यासाठी खोट्याचा आधार घेण्यात त्यांना काहीही वाटत नाही. यातूनच मुलांना खोटं बोलण्याची सवय लागते. 

 

टॅग्स :पालकत्व