बाळाचा जन्म झाला की त्याला काय नाव द्यायचं अशा चर्चांना सुरुवात होते. आपल्या बाळाला आयुष्यभरासाठी एक नाव देणं म्हणजे त्याची ओळख निर्माण करण्यातील पहिली पायरी असते. या नाव देण्याच्या सोहळ्याला आपल्याकडे बारसं म्हटलं जातं. हे नाव बाळाचे आई-वडिल, आजी-आजोबा किंवा कुटुंबातील आणखी कोणी ठरवतात. पालकांसाठी ही पालकत्त्वाची पहिली पायरी असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असे असले तरी हे नाव आत्याने बाळाच्या कानात सांगायची पद्धत असते. आता आपल्या बाळाच्या जन्म वेळेनुसार त्याच्या पत्रिकेत कोणते अक्षर आले आहे, त्यानंतर सगळ्यांना आवडणारे नाव आणि इतर काही नावे अशी ५ नावे ठेवली जातात. असे असले तरी त्यातले एकच नाव मुख्य असून तेच नेहमीसाठी वापरले जाते.
आता हे झाले नेहमीचे. पण आपल्या बाळाचे नाव ठेवण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी आता काही जण आपल्याला मदत करण्यासाठी तयार असतात. न्यूयॉर्कमध्ये बेबी नेमर म्हणून प्रसिद्ध असलेली टेलर ए ही यासाठी थोडेथोडके नाही तर तब्बल १५०० डॉलर म्हणजेच १ लाख १४ हजार रुपये घेते. तर ३३ वर्षाची हंपरी पालकांना आपल्या बाळाला नेमके नाव देण्यासाठी मदत करते. त्याचे ती १० हजार डॉलर म्हणजेच ७.६ लाख रुपये घेते. बहुतांश वेळा आपल्या बाळाचे नाव हे आपली सांस्कृतिक मूल्ये आणि आपल्या आकांक्षा यांच्याशी निगडीत असते. मागच्या वर्षी हंपरी सर्व्हीसेसच्या अंतर्गत १०० हून अधिक मुलांना नावे देण्यात आल्याचे हंपरी हिने सांगितले. हंपरी हिने २०१५ मध्ये या व्यवसायाला सुरुवात केल्याचे ती सांगते. पालकांनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरुन नाव ठरवाचे असेल तर पैसे कमी आकारले जातात. पण तुमच्या बाळाचे आणि व्यवसायाचे नाव एकच ठेवायचे असेल तर त्यासाठी जास्त पैसे आकारले जातात.
सुरुवातीला ती तिच्या आवडीची बाळांची नावे आणि त्यांचे अर्थ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असे. त्यावेळी माझ्या पोस्ट लोक आवडीने वाचत असल्याचे आणि मला फॉलो करत असल्याचे मला समजले. त्यानंतर मी इन्स्टाग्रामवर हे सुरू केले, तर लोकांना ते खूप आवडत असल्याचे मला जाणवले. मी सांगत असलेल्या गोष्टी लोकांना आवडतायेत आणि त्यासाठी लोक माझ्याकडे येतायेत हे मला त्यावेळी समजले. मग आपण नव्याने आई झालेल्या महिलांना त्यांच्या बाळांना नाव देण्यासाठी मदत करुया असे मी ठरवले. आता अशाप्रकारे आपल्या बाळाला नाव देण्यासाठी कोणाची मदत घेत असल्यामुळे लोक काही पालकांना आळशी समजतात. या कामासाठी पैसे देणारे पालक चिंताग्रस्त असतात मात्र ते परफेक्शनिस्ट असतात असे हे काम करणारी एक प्रोफेशनल सांगते. त्यामुळे येत्या काळात अशाप्रकारे बाळांचे नाव ठरवण्याच्या व्यवसायाकडे नक्कीच करिअर म्हणून पाहिले जाऊ शकते.