Join us  

 समर कॅम्पला पाठवता, महागडे क्लास लावता पण मुलांना काय आवडतं, पालक कधी विचारतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 6:32 PM

मुलांचं आपलं आपण शिकणं सुटीत सुरू होऊ शकतं, फक्त त्यासाठी थोडा धीर धरण्याची तयारी असली पाहिजे!

ठळक मुद्देमुलांसोबत आपणही बरंच काही शिकतो आणि समृद्ध होत जातो..

-रंजना बाजीशाळांना उन्हाळ्याची सुटी सुरू होणार याच्या आनंदापेक्षा आजकाल पालकांना आणि मुलांना त्याचं टेन्शनच जास्त येत असावं.मुलांना दिवसभराच्या किंवा निवासी शिबिरांना पाठवणं ही एक वरवरची मलमपट्टी झाली; पण मुलांना वेळ देणं ही पालकांची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. विशेषत: वयाची पहिली १२ वर्षं तरी मुलांजवळ एक तरी पालक असणं गरजेचं आहे. दर वर्षी सुटी येणार हे आपल्याला माहीत असतंच. अशा वेळी आधीपासूनच कामाचं, रजांचं नियोजन करून या सुटीच्या काळात मुलांसाठी दोन्ही पालकांनी एकत्र किंवा आळीपाळीनं वेळ काढायला पाहिजे.

 पालक मुलांसोबत सुटीत काय काय करू शकतात?सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना काय काय करायला मनापासून आवडतं ते समजावून घेणं. त्या गोष्टी करण्यासाठी मुलांना योग्य अवकाश देणं हे पालक नक्की करू शकतात.१. मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शाळेत अडकवल्यामुळं ती शाळेत दिल्या गेलेल्या पुस्तकी माहितीलाच ज्ञान समजतात; पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन जे आपल्याला आकलन होतं ते खरं ज्ञान मिळवणं आहे. यासाठी मुलांना वेगवेगळे अनुभव घ्यायला संधी दिली पाहिजे.२. स्वयंपाक करणं, मुलांसोबत लहान- मोठा प्रवास करणं. यासाठी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरावीत. मोठ्या शहरात जाऊन हरवून जाण्यापेक्षा लहान शहरात, गावात जाणं, तिथं घडत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी बघणं, त्यात भाग घेणं.

(Image : google)

३. आठवी आणि पुढच्या मुलांना एकट्याला बस किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी फिरायची सवय लावणं.४. लहानसहान खरेदी आणि इतर कामं करायला पाठवणं, मुलांबरोबर उत्तम सिनेमे नाटकं बघणं, त्याबद्दल बोलणं, चांगली पुस्तकं वाचणं.पालक स्वत: काय करणार?यात महत्त्वाचा भाग असा की, पालकांनी या गोष्टी स्वत: करायला सुरू करायच्या आहेत. त्यांचा मनापासून आनंद घ्यायचा आहे. मुलांना त्यात आवड निर्माण झाली की, मुलं आपण होऊनच त्यात सहभागी होतील; पण कुठल्याही परिस्थितीत मुलांना या गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध करायला भाग पाडू नये.ज्ञानेंद्रियं वापरून आपल्या भोवतीचं जग समजून घेणं, ही मुलांची सहज आकलन प्रक्रिया आहे. मुलांना खूप लवकर शाळेत घालून त्यांना पुस्तकांच्या जगात नेल्यामुळं त्यांची ही सहज आकलन प्रक्रिया बंद पडत जाते. यासाठी त्यांच्या ज्ञानेंद्रियांना पुन्हा चालना मिळेल अशा काही गोष्टीसुद्धा पालक करू शकतात. उदा. त्यांना निरीक्षण चित्रं काढायची गोडी लावणं; पण यात कलेचा भाग नसून निरीक्षणाचा भाग आहे, हे आधी लक्षात घेऊन त्या चित्रांना चांगलं, वाईट असं न समजता ते प्रत्यक्षाच्या जास्तीत जास्त जवळ कसं जाऊ शकेल हे मुलांनी स्वत: बघणं. एकत्र स्वयंपाक करतानासुद्धा चव, गंध, दृष्टी या जाणिवा जास्त वापरल्या जातात याचं भान ठेवता येऊ शकतं.त्याचप्रमाणं पैसे न खर्च करता काही आनंद मिळू शकतात, याची उदाहरणं आपण मुलांसमोर ठेवू शकतो. निरुद्देश पायी फिरायला जाणं, रस्त्यात काही इंटरेस्टिंग प्रक्रिया चालणाऱ्या जागा असतील तिथं रेंगाळणं, त्यांचं निरीक्षण करणं. उदा. लहान- मोठ्या गाड्या दुरुस्तीची लहान दुकानं, शिलाईची दुकानं इत्यादी.मुलांना खऱ्या जगण्याचा अनुभव देणं, त्यांना जीवन कौशल्यांची ओळख करून देणं आणि त्यातून आनंद कसा घेऊ शकतो हे आपण आधी अनुभवून तो मुलांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं काम पालक म्हणून आपण करू शकतो. यातून मुलांसोबत आपणही बरंच काही शिकतो आणि समृद्ध होत जातो, हा याचा आणखी एक फायदा आहेच.

(लेखिका सहज शिक्षण अभ्यासक आहेत.)dranjana12@gmail.com

टॅग्स :समर स्पेशललहान मुलं