Join us  

आई, खूप बोअर होतंय! आता मी काय करू? - मुलांच्या प्रश्नाला द्या भन्नाट ‘ॲक्शन’ उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 4:06 PM

टीव्ही-मोबाईल पाहत बसतात म्हणून मुलांना समर कॅम्पमध्ये ‘अडकविण्यापेक्षा’ त्यांना मजा येईल अशी कौशल्यं घरातच शिकवली तर. लाइफ स्किल्सही शिकता येतील आणि मजाही येईल सुटीची.. 

ठळक मुद्देही ‘जीवन’ कौशल्य आहेत. ‘मुलगा’ कौशल्य किंवा ‘मुलगी’ कौशल्य नव्हेत.

गौरी पटवर्धन

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सगळ्यात जास्त वेळा ऐकू येणारं वाक्य म्हणजे “आई बोअर होतंय. आता मी काय करू?”आणि अर्थातच त्यापाठोपाठ “मी फोनवर खेळू का?” किंवा “मी टीव्ही / यूट्यूब बघू का?” करमतच नाही म्हणून मग त्यांचा स्क्रीन टाईम भसाभस वाढतो आणि शेवटी तो टाळण्यासाठी पालक सगळ्यात सोपा मार्ग निवडतात तो म्हणजे मुलांना कुठल्यातरी सुटीतल्या क्लासला किंवा कॅम्पला घालून टाकतात.मुलांचे दिवसाकाठी ५-७ तास मजेत जातात आणि त्यांना आर्ट / क्राफ्ट / स्पोर्ट्स असलं काहीतरी शिकता येतं. मात्र शाळेच्या चौकटीत अडकलेली मुलं पुन्हा दुसऱ्या चार भिंतीत अडकतात. कुणीतरी शिकवतं तेच शिकतात, आपल्या मनानं मोकळेपणानं आपण मस्त काहीतरी करावं हे राहूनच जातं. त्यामुळे कुठल्यातरी समर कॅम्पमध्ये नुसतं ‘अडकविण्यापेक्षा’ त्यांना घरातच काही गोष्टी शिकविल्या किंवा त्यांनी त्या शिकल्या आपणहून तर?काही मूलभूत जीवन कौशल्य? ते शिकण्यात आणि स्वत: करून पाहण्यात मुलांचा काही वेळही मजेत जातो आणि शिवाय त्यातून त्यांना जे शिकायला मिळतं त्याचा त्यांना आयुष्यात खूप उपयोगही होतो.ही जीवन कौशल्य म्हणजे काही फार अवघड गोष्टी नसतात. मोठी माणसं घरात सहज करत असतात अशी कामं, जी कुठल्याच शिबिरात कधी शिकायला मिळत नाहीत आणि जी शिकल्याने मुलांचा खूप फायदा होणार असतो ती कामं म्हणजे जीवन कौशल्य! ही शिकवताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ही ‘जीवन’ कौशल्य आहेत. ‘मुलगा’ कौशल्य किंवा ‘मुलगी’ कौशल्य नव्हेत. त्यामुळे यातील प्रत्येक गोष्ट मुलांनीही शिकायला हवीत आणि मुलींनीही.

(Image : Google)

आता मी काय करू याचं उत्तर..

१. स्वयंपाक -  स्वयंपाक करता येणं हे एक अत्यंत महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे. मुळात सर्व वयाच्या मुलांना स्वयंपाकघरात लुडबुड करायला किंवा मदत करायला अतिशय आवडतं. मग मुलांना आपल्या रोजच्या कामात सहभागी करून घेतलं तर ते त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कौशल्य शिकतात. यात मुलांच्या वयानुसार साधं लिंबू सरबत तयार करण्यापासून ते अगदी भाज्या चिरणे, ते वाळवणाची कामं आणि थेट एखादा पदार्थच करणे, पोळ्या करायला शिकणे असं सहज करता येईल.

 

(Image : Google)

२. शिवणकाम -  हाताने काही शिवणं ही कला जणू काही अस्तंगत होत असल्यासारखी परिस्थिती आहे. पण, कितीही तयार कपडे मिळत असले, तरी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येतेच ज्यावेळी आपल्याला तातडीने उसवलेला कपडा शिवायला लागतो किंवा बटण लावून घ्यायला लागतं किंवा हुकचं काजं करून घ्यावं लागतं. इतक्या किरकोळ कामासाठी बाहेर जाणं शक्य होत नाही आणि मग असे कपडे उगाच पडून राहतात. त्यापेक्षा शिवणकाम हे जीवनकौशल्य आपण मुलांना शिकवू शकलो तर त्यांची त्यामुळे आयुष्यभराची सोय होऊन जाईल. शिवाय सुट्टीतला त्यांचा वेळही मजेत जाईल. इतकंच नाही, तर किरकोळ दुरुस्ती करण्यापासून त्यांनी सुरुवात केली तर पुढे जाऊन ते कपडे अपसायकल करायला शिकतील आणि कोणास ठाऊक, एखाद्या जुन्या जीन्सपासून ते एखादी मस्त पर्सही बनवतील!

(Image : Google)

३. घरातली किरकोळ दुरुस्ती कामं -  घर म्हंटलं की त्यात सतत काही ना काही बंद पडतं, काही वस्तू खराब होतात. अशा वेळी त्या वस्तू दुरुस्त करण्यात मुलांना सहभागी करून घेतलं तर तेही ती कामं सहज शिकू शकतात. यात फ्यूज बदलणं, बल्ब बदलणं, नळाचा वॉशर बदलणं, घरात लायटिंग करायचं असेल तर ती माळ नीट लावणं, पंखे स्वच्छ करणं अशा अनेक गोष्टी येतात. ही सगळी कामं करायला १४-१५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मजा येते. पण, त्यासाठी घरातल्या मोठ्या माणसांना वेळ काढून त्यांच्याबरोबर ती कामं करावी लागतात.

 

(Image : Google)

४. गाडी / स्कूटर / सायकल दुरुस्ती -  गाडी किंवा स्कूटर रिपेअर करायला टाकली असेल तर तिथे अवश्य मुलांना घेऊन जा. मेकॅनिक ती कामं करत असताना मुलांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. छोट्या टुल्सची नावं आणि उपयोग कळतात. गाडीचं ऑइल पाणी बघता येतं. स्टेपनी कुठे असते, ती कशी बदलतात, पंचर कसं काढतात हे मुलांना बघायला मिळतं आणि त्यातून जी माहिती मिळते ती त्यांनाच पुढे जाऊन कामी येते.

 

(Image : Google)

५. फर्स्ट एड किट-  प्रत्येक घरात एक औषधांचा डबा असायला पाहिजे. त्यात थोडं काही लागलं तर लागणारी औषधं असायला पाहिजेत. त्यात आयोडीन, सोफ्रामायसिन, डेटॉल, बँडेड, कापूस, कॉटन बँडेज, क्रेप बँडेज अशी सामग्री पाहिजे. शिवाय ताप, अंगदुखी, दाढदुखी यावरच्या गोळ्या पाहिजेत. त्याशिवाय टॅप मोजायचा थर्मामीटर, घरात कोणाला बीपी सेल तर त्याचं यंत्र, कोणाला शुगर असेल तर त्याचं यंत्र, कोणाला दम्याचा त्रास असेल तर इन्हेलर अशाही गोष्टी या मेडिकल किटमध्ये असल्या पाहिजेत आणि हे मेडिकल किट मुलांना वापरता आलं पाहिजे. औषधांवर मुलांना समजतील अशा चिट्ठ्या चिकटवणं आणि या प्रत्येक गोष्टीचा उपयोग समजून घेणं हे मुलं आवडीने करतात. आणि उन्हाळ्याच्या सुटीतला धडपडाट पाहता, ते किट हवंच हाताशी!

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)patwardhan.gauri@gmail.com

टॅग्स :पालकत्वलहान मुलंसमर स्पेशल