डॉ. किशोर अतनूरकरकिशोरावस्थेतील मुलांना आणि त्यांच्या पालकांना लैंगिकता या विषयावर तातडीने आणि योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. वयात येणाऱ्या मुलांशी कुणी बोलत नाही, शास्त्रीय माहिती सांगत नाही, बोलण्यात मोकळेपणा आणि संवाद नाही हे प्रश्न आहेतच. त्यात मुलांना ‘पॉर्न’ पाहण्याची सवय लागल्यास दोन गोष्टी होतात. एकतर, अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि त्यामुळे करिअरची वाट लागणे. दुसरं म्हणजे भविष्यात लिंगात ताठरता येण्यात अडचणी निर्माण होणे, वैवाहिक जीवनातील ‘कामगिरी’ धोक्यात येणे असे लगेचचे आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात.
उपाय काय?१. अत्याधुनिक आणि प्रगतिशील तंत्रज्ञान आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, त्याचा वापर जर ‘शहाणपणा’ने केला नाही, तर किशोरवयीन मुलांचं जगाचं खूप नुकसान होऊ शकतं. एखादा मुलगा अश्लील व्हिडीओ पाहतोय असं लक्षात आल्यानंतर, पालक किंवा शिक्षकाने एकदम संतप्त प्रतिक्रिया देऊ नये.२. सेक्ससंदर्भात मुलं प्रश्न विचारतात म्हणजे ती मुलं वाया गेलीत, असं समजायचं काही कारण नाही. त्यासंदर्भात त्यांना उत्सुकता असते, त्यांना काही माहिती पाहिजे असते हे मोठ्यांनी समजून घेऊन त्यांना समजेल अशा भाषेत योग्य ते उत्तर दिलं पाहिजे.३. जे काही अशा व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं जातं ते ‘फिल्मी’ असतं. वास्तविक जीवनात असं घडत नसतं, हे त्यांना आरडाओरड करून नव्हे, तर शांतपणे पण कडक शब्दांत सांगितलं पाहिजे.
(Image : google)
४. असे व्हिडीओ पाहण्याची सवय लागल्यास मनात विकृत कामुक भावना तयार होतात. मुलांना मुलीबद्दल आकर्षण निर्माण होण्याचं हे वय आहे हे मान्य; पण, त्या भावनांसोबत वाहून न जाता मनावर नियंत्रण ठेवून आपल्या करिअरमधे प्रगती होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे, हे त्यांना ‘उपदेश’ वाटणार नाही अशा भाषेत सांगावं लागेल.५. इंटरनेटचं जग हे खूप अफाट असं आहे. अश्लील व्हिडीओ पाहण्याइतपत सीमित न राहता, त्या इंटरनेटची असाधारण क्षमता ओळखा आणि त्याचा उपयोग आपल्या ज्ञानसंवर्धनासाठी करा, हा विचार मुलांच्या मनात रुजविण्याचा दृष्टीने मोठ्यांनी काम केलं पाहिजे.६. प्रजननाची मोठी अवघड जबाबदारी निसर्गाने, मुलींवर जास्त दिली आहे. मुलींना मासिकपाळीच्या अनुभवातून जावं लागतं, ही कटकट त्यांना आयुष्यातील ३० ते ४० वर्षे दर महिन्याला सहन करावी लागते, त्यांनाच तब्बल ९ महिने गर्भधारणेच्या अनुभवातून जावं लागतं, बाळंतपणाच्या कळा सहन कराव्या लागतात. स्तनपानाची जबाबदारीदेखील त्यांचीच. या सर्व गोष्टींतून निसर्गाने मुलांची (पुरुषांची) सुटका केली आहे. या सर्व गोष्टी मुलांना शालेय जीवनातच समजावून सांगितल्यास, मुलं मुलींचा आदर करायला शिकतील.७. मुलगी म्हणजे फक्त सेक्ससाठी आहे आणि मुलांनी तिचा फक्त ‘उपयोग’ करून घ्यायचा असतो, तिच्यासोबत ‘एन्जॉय’ करायचं असतं, असे समज मुलांच्या मनातून काढून टाकले पाहिजेत. शारीरिक संबंध म्हणजे केवळ ‘मौज किंवा टाइमपास’ नव्हे, तर एकमेकांविषयी विश्वास, आदर, प्रामाणिकपणा या पायाभूत तत्त्वांशी निगडित बाब आहे.८. आपल्या देशातील प्रत्येक किशोरवयीन मुलापर्यंत या संदेश वजा सूचना पोहोचविण्याच्या योजना आखून त्या अंमलात आणल्या पाहिजेत. पालक, शिक्षक, डॉक्टर्स, समाजप्रबोधन करणारे लोक या सर्वांची ती जबाबदारी आहे. हे सारं घडवून आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असून चालणार नाही.९. हे अवघड काम पूर्णत्वाला नेण्यासाठी, फक्त किशोरवयीन मुलांना सांगून उपयोगाचं नाही. पालक आणि शिक्षकांचे ‘वर्ग’ घ्यावे लागतील. त्यांना आपल्या मुलांना याबाबतीत कसं शिकवायचं हे शिकवावं लागेल.१०. साधरणतः ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कागज की नाव’ या हिंदी सिनेमात एक डायलॉग होता, “स्कुल और कॉलेजेस में जो पढाया जाता हैं, वो जिंदगी में सामने नही आता तो फिर जिंदगी में जो सामने आता हैं वो स्कूल में क्यूं नही पढाया जाता?” याच धर्तीवर म्हणायला हवे की किशोरवयीन मुलांच्या लैंगिक विश्वातील समस्या नीट हाताळायच्या असतील तर, लैंगिक शिक्षण हा शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असला पाहिजे. या संकल्पनेला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे.
atnurkarkishore@gmail.com