Join us  

मोठ्या होणाऱ्या मुलीचं आणि आईचं पटत का नाही, सारखी भांडणं आणि रुसवेफुगवे? पाहा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2024 6:02 PM

आईने केलेले लाड, मारलेली मिठी, घेतलेली पापी हे मोठ्या होत जाणाऱ्या मुलींना आवडतनाही असं का?

 डॉ. वैशाली देशमुख(टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोग तज्ज्ञ)

ईशा खेळून घरी आली. दोन तासांपासून ईशा घरी नव्हती. त्यामुळे तिला पाहताच आईला एकदम छान वाटलं. ईशा लहान होती तेव्हा आई दिसली की तिला इतका आनंद व्हायचा की ती सारखी आईला मिठ्या मारायची. पण १२ वर्षांची झालेली ईशा आता पूर्वीसारखी आईला मिठीच मारायची नाही. उलट आई तिचे जवळ घेवून लाड करते तर तेही तिला नकोसे होतात. खेळून आलेल्या ईशाला आईने मिठी मारली तर ईशाने आईची मिठी सोडवून घेतली. ईशाच्या अशा वागण्याने आईला खूप वाईट वाटलं. आपल्या मुलीला आपण आवडत नाही का? की आपला स्पर्श तिला नकोसा होतो? या प्रश्नांनी योगिता अस्वस्थ झाली. पण हे फक्त योगितासोबतच घडतं असं नाही. किंवा केवळ ईशाच असं वागते असंही नाही.ईशाच्या आईला जी समस्या वाटतेय ती समस्या नसून वयात येणाऱ्या मुलींची वागण्याची एक सर्वसाधारण पध्दत आहे.

मोठ्या होणाऱ्या मुलींचं वागणंमोठ्या होणाऱ्या मुलींना आईने मिठी मारलेली, कुरवाळलेलं, लाडाने पापी घेतलेली आवडत नाही. याचा अर्थ मुलींना आई आवडत नाही असा नाही. खरंतर मोठ्या होत जाणाऱ्या मुलींमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. त्या छोट्या मुलीला आईची मिठी हवीशी वाटते. आईच्या कुशीत शिरावंसं तिला वाटतं. पण किशोर वयातल्या मुलींमध्ये एक मोठं, समजूतदार आणि स्वत:ला प्रौढ समजणारं मूलही लपलेलं असतं. या मुलीला मात्र आईने मिठी मारणे, लाडाने पापा घेणं हे बालिश प्रकार वाटतात. ते नकोसे होतात. आपण आता मोठे झालोय हे त्यांना आईला सांगायचं असतं.किशोर वयातल्या मुली फक्त आईचाच स्पर्श नाकारतात असं नाही तर घरात भावंडांशीही मस्ती करेनाशा होतात. याउलट बाहेर मित्र-मैत्रिणींचे स्पर्श मात्र त्यांना चालतात आणि आवडतातही. हे असं होतं कारण मोठं होत जाणाऱ्या मुलींमधे आता मित्र मैत्रिणींचं महत्त्व वाढलेलं असतं.

(Image :google)

आईने काय करायला हवं?१. मुलगी आपला स्पर्श नाकारत असली म्हणून नाराज होवू नये. आपल्यात आणि मुलीत दुरावा निर्माण झालाय आणि आता तो वाढतच जाईल असा समज करुन घेवू नये. उलट भविष्यात तो निर्माण होवू नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी आई आणि मुलीमधलं बाॅण्डिंग वाढवण्यासाठी मिठी, पापी सोडून इतर पर्यायांचा अवलंब करावा.२. समोरासमोर बसून बोलणं वाढवावं. बोलता बोलता खांद्यावर हात ठेवणं, हातात हात घेवून आश्वस्त करणं, पाठीवरुन हात फिरवणं अशा गोष्टी केल्यास आई आणि मुलीमधलं प्रेम वाढतं.३. मुलीने मिठी सोडवली म्हणून भडकून न जाता संयम ठेवावा. आपण दाखवलेलं प्रेम मुलगी नाकारतेय म्हटल्यावर चिडून न जाता शांत राहावं; जेव्हा केव्हा मुलगी आपल्याशी बोलायला येते, काही सांगायला येते तेव्हा तिच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं. ती कितीही कमी महत्त्वाचं बोलत असली, विषय आपल्या आवडीचा नसला तरी ती काय म्हणतेय हे लक्ष देवून, रस घेवून ऐकावं. यातून आई आपल्याकडे पूर्ण लक्ष देते, आपलं ऐकून घेते, आपल्याला वेळ देते ही जाणीव मुलीमध्ये पक्की होत जाते.

४. आपल्या मुलीला मिठी मारावीशी वाटणं, तिला जवळ घ्यावंसं वाटणं ही कोणत्याही आईची सहज भावना असते. पण मोठ्या मुलींच्या बाबतीत ती कृतीत उतरवताना मात्र ' तुला मिठी मारु का?' 'तुझा पापा घेवू का?' असं विचारावं. असं विचारणं हे खूप पाश्चात्त्य संस्कृतीचं वाटत असलं तरी या गोष्टीतून मुलांच्या ईच्छांचा, त्यांच्या मान्यतेचा आपण पालक म्हणून आदर करतो आहोत असा संदेश जातो. त्यातून आई आणि मुलीमधलं प्रेमच वाढतं.५. मुलीसोबत वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर बोलणं, एकत्र बसून सिनेमा पाहाणं, मुलीला आवडते ती गोष्ट करण्यात सहभागी होणं अशा प्रकारे आई आणि मुलीमधलं नातं अधिक घट्ट आणि मैत्रीचं होतं.

वयात येणाऱ्या मुलींना नेमकं काय हवं असतं? याविषयी अधिक माहिती..https://urjaa.online/what-girls-want-to-be-when-they-grow-up-why-teenage-girl-dont-want-to-be-hugged-to-mother/