त्याचं वय वर्ष अवघं १७, या अडनिड्या वयात तरुण-तरुणींना सेक्स या विषयाबाबत काहीशी उत्सुकता, भिती, साशंकता अशा सगळ्या संमिश्र भावना असतात. तशाच भावना अमेरिकेतील मिशिगन येथे राहणाऱ्या जॉर्डन याच्या मनातही असाव्यात. ऑनलाइन शोषणाच्या घटना जगभरात वाढत असताना या मुलाने सेक्सटॉर्शनला बळी पडून स्वत:चा जीव घेतला. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर सर्फींग करत असताना अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. या सगळ्या प्रकारानंतर जॉर्डनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्या रात्री त्याची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही असं म्हणत पालक आणि मुलांमध्ये ऑनलाइन गोष्टींबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले (Teenage Victim to Sextortion Scam Parenting Tips).
भविष्यात सेक्सटॉर्शनसारख्या घटनांबाबत जागरुक राहण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जॉर्डन हा हायस्कूलमध्ये शिकणारा आणि अतिशय उत्तम फूटबॉल खेळणारा तरुण. इन्स्टाग्रामवर या व्यक्तीने जॉर्डनचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे १ हजार डॉलर्सची मागणी केली. त्यापैकी ३०० डॉलर्स दिल्यानंतरही त्याचे धमक्या देणे थांबले नाही, तेव्हा यापुढे आपल्याला त्रास दिल्यास आपण आयुष्य संपवून टाकू असे जॉर्डनने या व्यक्तीला सांगितले. त्यावर गुन्हेगाराने या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आणि जॉर्डनने खरंच आत्महत्या केली.
हल्ली अगदी सातवी-आठवीपासूनच मुलं आई-वडीलांच्या किंवा घरातील इतर कोणाच्या मोबाइलवरुनसोशल मीडिया अकाऊंटस हँडल करत असतात. या साईटसबद्दल असणारे आकर्षण आणि अर्धवट ज्ञान यामुळे त्यांना जाळ्यात अडकवणे सायबर चोरांना अगदी सोपे असते. त्यामुळेच गेमिंग, सेक्स यांसारख्या आकर्षित करणाऱ्या गोष्टींचा वापर करुन या मुलांना अडकवले जाते आणि मग त्यातून गंभीर प्रकरणे समोर येतात. सेक्सटॉर्शनची प्रकरणे गेल्या काही वर्षात वाढली असताना या प्रकरणातही सदर मुलासोबत एका नायजेरीयन व्यक्तीने अशाचप्रकारे धमकी दिल्याचे समोर आले आहे.
भारतातही फोन, इंटरनेट यांचे जाळे गेल्या काही वर्षात वेगाने वाढते आहे. त्यामुळे पोर्नोग्राफी, सेक्सटिंग, फोनसेक्स यापासून निर्माण होणारा धोकाही वाढत जाणार आहे. सुरेश बडा मठ या संशोधकाने भारतातील लैंगिक गुन्ह्यांवर संशोधन केले आहे. यावरील लेखात त्यांनी म्हटले आहे की भारतातील 12 टक्के वेबसाईट या पोर्नोग्राफीशी संबिधित आहेत. ते बघणारे भारतीय दर्शक (युवांची संख्या अधिक!) सेकंदाला सुमारे तीन ते चार हजार डॉलर्स पोर्नोग्राफीवर खर्च करतात, असा अंदाज आहे. म्हणूनच आपले मूल स्क्रीनसमोर असताना नेमके काय करते, कोणत्या गोष्टीत धोका आहे याबाबत पालकांनी मुलांना वेळीच जागृत करण्याची, योग्य ती माहिती देण्याची आवश्यकता आहे.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
हे एकप्रकारचे लैंगिक शोषण असून एखाद्या व्यक्तीकडून पैसे उकळण्याच्या हेतूने हा प्रकार केला जातो. व्यक्तीचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार यामध्ये प्रामुख्याने केले जातात. या व्यक्तीच्या कुटुंबियांना किंवा जोडीदाराला हे फोटो किंवा व्हिडिओ पाठवले जातील असे सांगून धमकावले आणि ब्लॅकमेल केले जाते. आपली अशाप्रकारे मानहानी आणि बदनामी होऊ नये म्हणून या गुन्हात अडकलेला व्यक्ती गुन्हेगारांना पैसे देण्याचे कबूल करतो. पण वेळेत पुरेसे पैसे दिले गेले नाहीत तर समोरच्या व्यक्तीला वारंवार धमक्या देण्यात येतात.