मूलं ऐकत नाहीत अशी तक्रार जवळपास प्रत्येक पालक करताना दिसतात. आपण सांगितलेलं सगळं मुलांनी ऐकावं आणि शहाण्यासारखं वागावं असं आपल्याला वाटत असतं. पण मुलांना मात्र त्यांच्या मनाप्रमाणे काहीतरी करायचे असते. मुलं म्हटल्यावर ती शिस्तीत वागणार नाहीत, त्यांना हवं तसंच ते करणार हे सगळं जरी खरं असलं तरी भविष्यात त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी आपली धडपड सुरू असते. मूल लहान असताना त्याने स्वच्छ दात घासावेत, नीट आंघोळ करावी, कपडे स्वच्छ ठेवावेत, जेवताना न सांडता नीट जेवावे, वेळच्या वेळी झोपावे असे आपल्याला वाटत असते. त्यासाठी आपण त्यांना तशा सवयीही लावतो. तर मुले थोडी मोठी झाली की त्यांनी नीट अभ्यास करावा. एखाद्या गोष्टीसाठी हट्टीपणा करु नये, आपण म्हणतो त्याप्रमाणे सगळ्या भाज्या आणि पौष्टीक पदार्थ खावेत असा आपला आग्रह असतो. पण मुलांना ते नको असते आणि त्यांना मॅगी, चिप्स, बिस्कीटे याच गोष्टी हव्या असतात. किंवा त्यांना अभ्यास न करता नुसते खेळायचे असते किंवा मोबाइलवर गेम खेळायचे असतात.
मुलं असा हट्टीपणा करायला लागली की आपला पारा चढतो आणि मग घरात वादाला सुरुवात होते. आपण ४ वेळा सांगूनही मूल ऐकत नसेल की आपले पेशन्स संपतात आणि मग आपण त्याच्यावर ओरडतो, प्रसंगी त्याला फटकाही देतो. पण यामुळे मुले हिरमुसतात आणि जास्त हट्टीपणा करण्याची शक्यता असते. मुलांनी सतत शहाण्यासारखे वागायला हवे आणि त्यांनी अमुक वेळात अमुक गोष्टी नीट करायलाच हव्यात असा आपला आग्रह असतो. पण मुलांना तेच करायचे नसते. अशावेळी आपल्याला हव्या त्या गोष्टी मुलांकडून करवून घेण्यासाठी प्रसिद्ध मेंदू अभ्यासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे कोणते उपाय सांगतात ते समजून घेऊया.
प्रत्येक पालक मुलांच्या बाबतीत हेच करतात...
१. विशिष्ट गोष्टी करण्यासाठी मुलांना बक्षीस घेणे. एखादी गोष्ट केली तर तुला चॉटलेट देईन, नवीन खेळणं, खाऊ देईन, फिरायला नेईन अशा गोष्टी सांगून मुलांकडून आपल्याला हवी ती गोष्ट साध्य करुन घेता येते. मात्र दरवेळी असे सांगून त्याची सवय होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. नाहीतर आपण अमुक केल्यावर आपल्य़ाला काहीतरी मिळतं ही कायमची सवय लागू शकते.
२. शिक्षा हा आणखी एक मार्ग असतो. यामध्ये ओरडायचे, डोळे मोठे करायचे, रट्टे द्यायचे अगदीच नाही ऐकले तर बेदम मारायचे, कोंडून ठेवायचे, घराबाहेर काढायचे असे मार्ग अवलंबले जातात. आपण असे करतो म्हणून भितीपोटी मुले हे करतातही. पण ते आतून आलेले नसते तर ती गोष्ट भितीपोटी केलेली असते. त्यामुळे हे उपाय कितपत योग्य आहेत याबाबत आपण प्रत्येकाने विचार करायला हवा.
पण काय करायला हवे?
१. मूलं साधारणपणे त्यांना हवं ते त्यांना हवं तसंच वागत असतात. अशावेळी तसे वागण्यातून त्याना काय तोटा होणार आहे हे शांतपणे समजून सांगितले पाहिजे. जेणेकरुन मुलांना ते कारण पटेल आणि ते आपण म्हणतो ती गोष्ट ऐकतील.
२. मुलांनी अभ्यास केला, त्यांचे अक्षर छान आले, त्यांना चांगले मार्क मिळाले, त्यांनी एखाद्या गोष्टीत पारितोषिक मिळवले तर त्यांना सर्वात जास्त छान वाटणार आहे, आनंद मिळणार आहे हे त्यांना समजावून सांगायला हवे.
३. अशाप्रकारे त्यांच्याशी संवाद साधल्याने त्यांच्या गोष्टींची जबाबदारी ते घ्यायला तयार होतील. यासाठी काही वेळ जाईल, आपल्याला बरेच पेशन्सही ठेवावे लागतील. पण एकदा एखादी गोष्ट त्यांना आतून पटली की पुन्हा त्याबाबत आपल्याला त्यांच्या मागे लागावे लागणार नाही हे नक्की.
४. या गोष्टीमुळे मुलांना आपण जे करतोय ते आपल्या चांगल्यासाठी आहे हे समजेल आणि आपलेही अनेक प्रश्न अगदी सहज सुटतील. यामुळे घरात भांडणे, वाद यांचे प्रमाण आपसूकच कमी होईल.
५. त्यामुळे बक्षिस किंवा शिक्षेपेक्षा एखाद्या गोष्टीतून मिळणारा आनंद, समाधान याबाबत मुलांना सांगितल्यास त्यांच्यात नक्कीच बदल होईल. हे एकदा किंवा दोनदा सांगून लगेच होईल असे नाही. कदाचित ही गोष्ट वारंवार सांगावी लागेल. पण त्याचा फायदा दिर्घकालिन होईल हे लक्षात घ्यायला हवे.
६. यामुळे आपण जबाबदार व्यक्ती तयार करु हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. कोणत्या धाकामुळे किंवा बक्षिसाच्या अमिषामुळे ही व्यक्ती घडलेली नसेल तर त्याला त्याचा फायदा, आनंद, समाधान समजल्यामुळे तो एखादी गोष्ट करत असेल.