रितंभरा जंगले (शब्दांकन : माधुरी पेठकर)
मी आई होते ना म्हणून जमलं! काव्यांजली माझ्या आयुष्यात आली आणि मला माझ्यातल्या क्षमतांची जाणीव झाली. जन्मत:च काव्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिला दुसऱ्या दवाखान्यात हलवलं. वेगवेगळे डाॅक्टर येवून तपासून जात होते, काही निदानच होत नव्हतं. घरचे 'तिला जाऊ द्या आत्ता' असे निर्वाणीचे बोलू लागले. पण नवरा म्हणाला, जोपर्यंत खिशात पैसे आहेत तोपर्यंत मी बाळाला बरं करण्यासाठी प्रयत्न करणारच!' काव्या त्यातून बरी झाली पण पुढे वेगळं आव्हान वाट पाहत होतं.
श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून काव्याला मुंबईला नेलं. केईएममध्ये दाखवलं. तिथे ती महिनाभर ॲडमिट होती. बरी होवून घरी आली तेव्हा अक्षरश: हाताच्या अंगठ्याएवढीशीच होती ती. अतिशय नाजूक. थोडं घराबाहेर काढलं तरी आजारी पडायची ती. श्वास घ्यायला त्रास व्हायचा म्हणून रात्र रात्र तिला मांडीवर घेवून बसावं लागायचं. आजारपणामुळे काव्या ॲक्टिव्ह नव्हती. दीड वर्षांची झाली तरी ती बोलत नव्हती. खूपच अशक्त आहे म्हणून नसेल बोलत असं वाटलं आम्हाला. पण आम्ही हाक मारली तरी ती बघायची नाही म्हटल्यावर आम्ही घाबरलो. तिला दवाखान्यात नेलं. कानाशी संबधित तपासण्यांसाठी जळगावमध्ये फार सुविधा नव्हत्या म्हणून पुण्याला नेलं. तिथे ईएनटी तज्ज्ञांकडे तपासणी केल्यावर काव्याला ९५ टक्के हिअरिंग लाॅस असल्याचं कळलं. आमच्या तर पायाखालची वाळूच सरकली.
काव्याच्या आजारपणामुळे आमचा बेकरीचा व्यवसाय बंद पडलेला. त्यात काव्याचा कर्णबधिरपणा. पुण्याच्या डाॅक्टरांनी इम्प्लांटचा सल्ला दिला. पण आमच्यासाठी हे सगळंच नवं होतं. डाॅक्टर काहीही सांगतात असं वाटलं. आम्ही तिला पुण्यात स्पीच थेरेपी सुरु केली. तिला जळगावहून पुण्याला दर महिन्याला दोनदा स्पीच थेरेपीला न्यावं लागायचं. हे असं अनेक महिने सुरु होतं. पण काहीच फरक नव्हता. पुन्हा नवीन डाॅक्टर गाठले. त्यांनी तपासून इम्प्लाण्ट हाच पर्याय असल्याचं सांगितलं. साडेपाच लाख रुपये खर्च येणार होता. असलं नसलं ते सगळं विकलं, ओळखींच्याकडून पैसे घेवून पै पै जमा केली. इम्प्लाण्ट झालं. ऑपरेशननंतरही स्पीच थेरेपी सुरुच होती. नंतर तिला जळगावच्या मुकबधिरांच्या शाळेतही घातलं. पण काव्यावर त्याचा काही परिणाम दिसून येत नव्हता. मग आम्हाला नाशिकच्या माई लेले विद्यालयाची माहिती मिळाली. या संस्थेत कर्णबधिर मुलांसाठी मेहनत घेतली जाते हे ऐकलं आणि आम्ही कसलाही मागचा पुढचा विचार न करता, नोकरी धंदा सर्व सोडून काव्यासाठी नाशिक गाठलं.
नाशिकच्या माई लेले विद्यालयात अर्चना कोठावदे नावाच्या शिक्षिका काव्याला भेटल्या. तिला बघितलं आणि त्यांनी काव्याला पुन्हा नर्सरीपासून शिकवण्याचा सल्ला दिला. २०१२ पासून काव्याचं पुन्हा एकदा नर्सरीपासूनचं शिक्षण सुरु झालं. अर्चनाताईंनी प्रेमळ आईसारखी काव्यावर मेहनत घेतली. त्याचे परिणाम दिसू लागले. काव्या शिकू लागली. निबंध, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेवू लागली. बक्षिसं मिळवू लागली. आज काव्यांजली दहावीत आहे. सामान्य मुलांसोबतच तिचं शिक्षण सुरु आहे. पण कोणत्याही सामान्य मुलांपेक्षा काव्या कुठेही कमी पडते आहे असं अजिबात नाही. पण हा टप्पा गाठण्यासाठी खडतर आणि आव्हानात्मक प्रवास करावा लागला हे मात्रं खरं.
माझी नोकरी, काव्याची शाळा, मुलगा, घर हे सगळं सांभाळतांना तारेवरची कसरत होत होती. पण हळूहळू काव्याची प्रगती बघून माझ्यात आणि नवऱ्यात आणखी प्रयत्न करण्याची ताकद येत गेली.
एव्हाना या सगळ्या परिस्थितीकडे एक आव्हान म्हणून बघण्याची दृष्टी मिळाली होती. काहीच सोपं नव्हतं. काव्याला सुरुवातीला सांगितलेलं ऐकूयायचं नाही. तिला परत परत सांगणं, शिकवणं सुरु झालं. तिच्या गतीने संयम ठेवून बोलावं लागायचं. पण या पध्दतीने बोलण्याने काव्याला संवाद साधता येवू लागला. तिच्यात आत्मविश्वास येवू लागला. तिचं आणि माझं बाॅण्डिंग आणखी पक्कं झालं. काही अडलं की काव्याला मीच हवी असायची. तिचं समाधान होईल अशी माहिती तिला शब्दांद्वारे सांगणं ही देखील आधी माझ्यासाठी परीक्षाच होती. मी स्वत: उत्तर भारतीय आणि नवरा महाराष्ट्रीयन. मराठी लग्नानंतर शिकायला लागले. शिकले म्हणजे काय तर जुजबी. पण काव्याचं शिकण्याचं माध्यम मराठी होतं म्हटल्यावर मला मराठी लिहिणं, वाचणं, बोलणं नीट यायलाच हवं होतं. त्यामुळे काव्यासोबत मीही मराठी शिकू लागले. आज काव्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी मराठीत देवू शकते.
कलाकुसरमध्ये मला न आवड होती ना गती. पण काव्याला हे आवडतं हे समजलं तेव्हा तिची आवड विकसित करण्यासाठी मलाही कलाकुसर शिकायला लागली.
आज मागे वळून बघितलं की माझा मलाच प्रश्न पडतो,' कसं केलं हे सर्व आपण? कसं जमलं आपल्याला हे?' माझ्या आतून उत्तर येतं 'आई होते ना मी म्हणून करु शकले!' आज आई आहे म्हणूनच मला वाटतं की काव्यांजलीने या जगात स्वावलंबी व्हावं. या बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे वावरण्याचा तिला आत्मविश्वास यायला हवा. आम्ही आईबाबा म्हणून तिला स्वावलंबी बनण्याचे धडे दतोय. त्या बळावर आता काव्यालाही बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे वावरण्याचा आत्मविश्वास यायला लागला आहे. जे आहे ते स्वीकारायचं आणि जे शक्य आहे तेवढं करायचं या नियमाने मी स्वत:ची ताकद वाढवली. काव्या जो पर्यंत स्वत:च्या पायावर उभी राहात नाही तोपर्यंत मला एक आई म्हणून खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे.
(रितंभरा जंगले नाशिकस्थित फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत.)