आपल्या मुलांनी कायम शहाण्यासारखं आणि शिस्तीत वागावं अशी प्रत्येक आईवडीलांची अपेक्षा असते. मुलांना योग्य त्या वयात शिस्त आणि वळण लागलं तरच मोठेपणी ते शहाण्यासारखे वागतात. नाहीतर ते डोक्यावर बसण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळे आपण मुलांना सतत शिस्त लावायला जातो. मुलांनी आयुष्यात चांगला माणूस घडावे, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालक म्हणून आपण झगडत असतो.मुलांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे चांगले आणि शिस्तीतच वागावे यासाठी अनेकदा पालकांचा अट्टाहास सुरू असल्याचे दिसून येते. मुलांना शिस्त लावताना अनेकदा आपण त्यांना ओरडतो, कधी काही गोष्टींचा धाक दाखवतो, मारतोही. पालक म्हणून आपण त्यांच्या भल्याचाच विचार करत असतो. हे जरी खरे असले तरी शिस्त लावताना मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा कितपत परिणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे. शिस्त लावणे ही एक सहज प्रक्रिया असून ती करताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी (Three basic tips to help discipline children)...
१. तुम्ही जे बोलता ते तुम्ही फॉलो करा
पालक म्हणून मुलांना आपण बऱ्याच सूचना देत असतो. पण या सुचनांचे आपण पालक करतो की नाही हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आपण ती गोष्ट करत नसू तर ती मुलांना करायला सांगण्याचा आपल्याला अधिकार राहत नाही.
२. प्रत्येक वागण्याला शिस्त लावू नका
बऱ्याच पालकांना मुलांना प्रत्येक गोष्टीत काही ना काही सूचना देण्याची सवय असते. मुलांना सतत शिस्त लावायला गेलं तर ती वैतागतात. मुलांच्या वागण्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी असेल असं नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते एक वेगळी आयडेंटीटी आहे हे आपण मान्य करायला हवे. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीत मुलांना सूचना दिल्या तर ते आपलं ऐकणं कालांतराने नकळत बंद करतील.
३. मतांवर ठाम राहा
मुलांना एकदा एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं की ते नाहीच असायला हवं. त्यांनी रडापडी केली किंवा आदळआपट केली म्हणून आपण त्यांना हवी ती गोष्ट करु द्यायची नाही. कारण असे केले तर मुलांना काय केल्यावर आपल्याला काय मिळते हे समजते आणि मग पुढच्या प्रत्येक वेळी ती गोष्ट मिळवण्यासाठी ते तसेच वागतात. अशा वागण्याने त्यांचा हट्टीपणा वाढण्याचीही शक्यता असते. त्यामुळे एखादी गोष्ट नाही म्हणजे नाहीच असायला हवी.