आई होणं आणि आईपण निभावणं हे वाटतं तितकं सोपं नाही. आपल्या इच्छा, आकांक्षा सगळं बाजूला ठेवून सतत फक्त मुलांसाठी झटणाऱ्या आईलाच ते काय असतं याची कल्पना येऊ शकते. मूलाला जन्म दिल्यापासून ते मूल किमान २० ते २५ वर्षाचे होईपर्यंत पालक म्हणून आपण सतत त्यांच्यासाठी काही ना काही करत राहतो. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना चांगली शिस्त लागावी याबरोबरच त्यांचे शिक्षण इतर कला, सामाजिक भान यांसारख्या एक ना अनेक गोष्टी कळत-नकळतपणे आपण मुलांना शिकवत असतो. यासाठी त्यांना समाजाच्या विविध घटकांमध्ये वावरायला, प्रवासाला घेऊन जातो. मुलांचं बालपण अनुभवसंपन्न असावं आणि त्या बळावर त्यांनी भविष्यात यशस्वी होऊन काही करावं अशी पालकांची किमान अपेक्षा असते (Twinkle Khanna Says About Motherhood).
त्यासाठी मूल जन्माला आल्यापासून आपण त्यांना काही कमी पडू नये यासाठी सतत कष्ट करतो, त्यांना आनंद मिळावा यासाठी झटत राहतो. मात्र वयाच्या एका टप्प्यावर पालक म्हणून मुलं आपल्याला दोष देतातच. प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने नुकतीच आपल्या मनात खोलवर असणारी ही खंत व्यक्त केली. ट्विंकल खन्ना म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती, लेखिका, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी. मात्र सामान्य आईला वाटेल अशी भिती ट्विंकललाही वाटते आणि याबाबत ती मोकळेपणाने बोलते.
नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत तिने मनातील ही सल सगळ्यांसमोर बोलून दाखवली. ट्विंकल सध्या आपली मुलगी नितारा कुमार हिच्यासोबत युरोप टूरला गेली आहे. त्यावेळी केलेल्या पोस्टमध्ये ट्विंकल म्हणते, एकटीने ट्रिपला जाण्याची इच्छा असताना मुलांना घेऊन थकवणाऱ्या ट्रिप्स प्लॅन करणे, ते प्लॅटफॉर्मवर धावत असताना त्यांचा पाठलाग करणे, दुसरीकडे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे सगळे थकवणारे आहे. तसेच त्यांच्यासाठी घेतलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असताना ती मारणे, हॉटेलमधून बाहेर पडताना वॉशरुमला जाऊन येण्यास सांगितले असतानाही बाहेर गेल्यावर एखाद्या ओसाड मैदानाच्या ठिकाणी वॉशरुम शोधत बसणे हे आईपणातील आनंदाचे क्षण आहेत असे ती उपहासाने म्हणते.
अशावेळी कोणतीही आई आपल्या आनंदाला मुरड घालत मुलांच्या आनंदाचा आधी विचार करते. हे इतकं सगळं करुनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण मुलं मोठी होतात तेव्हा आईने आपल्यासाठी केलेल्या या गोष्टींचा त्यांना विसर पडतो आणि ते तुम्हाला काही ना काही कारणावरुन दोष देतात. त्यामुळे कोणतीच आई परफेक्ट नसते, पण मुलांसाठी जे जे करावंसं वाटतं ते ते ती शंभर टक्के प्रयत्न करुन करतेच. मात्र शेवटी तिच्या वाट्याला मुलांनी दिलेला दोषच येतो अशी खंत तिच्या या पोस्टमधून व्यक्त होते. कोणतीही आई ही कधीच परफेक्ट नसते पण बहुतांश जणी अतिशय वाईट काळातही आई म्हणून मुलाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतात या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही असा प्रश्नही ती शेवटी विचारते. या पोस्टमध्ये ट्विंकलने एक व्हिडिओही पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांच्या ट्रिपमधील काही क्षण टिपले आहेत.