Join us  

मम्मा, सुसू आली...वर्किंग मॉम चॅलेंज, ट्विंकल खन्ना विचारतेय, तुमच्याही आयुष्यात असेच घडतेय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 11:34 AM

Twinkle Khanna Working mom Challenge : महिलांनी असे काम करावे जसे त्यांना मूल नाही आणि मुलांना असे वाढवावे की त्यांना काम नाही अशी समाजाची अपेक्षा असते.

ठळक मुद्देतुम्ही स्वतःला बाथरूममध्ये लॉक करून घेता कारण तुम्हाला महत्त्वाचे मेल करायचे असतात?आई असणे याशिवाय इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी ठेवणारी किंवा थकवणारी नसते? 

वर्किंग मॉम असणं हा अनेकदा एक मोठा टास्क असतो. नव्याने आई झाल्याने आईपण शिकत असतानाच ऑफीसच्या कामाचे ताण, त्यात मुलांकडे आपण नीट लक्ष देत नसल्याचा गिल्ट, घरातल्या इतर जबाबदाऱ्या आणि मूल असल्याने ऑफीसमधल्या लोकांकडून मिळणारी वागणूक हे सगळे झेलताना त्या बाईची पुरती दमछाक होऊन जाते. एक वेळ अशी येते की जेव्हा हे सगळे आपल्यासोबतच घडतंय असं वाटायला लागून महिला काही वेळा नैराश्यात जातात. प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने आपल्या ट्विक इंडिया (tweakindia) या इन्स्टाग्राम चॅनेलच्या माध्यमातून या विषयावर एक छानसा व्हिडिओ शेअर केला आहे. वर्किंग मॉमसमोर असणारी चॅलेंजेस सांगत तुम्हीही या सगळ्याला सामोरे जाता का असा साधा प्रश्न तिने विचारला आहे. हे चॅलेंज स्वीकारा आणि स्वत:ला परफेक्ट १० रेटींग द्या असेही ती या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगते (Twinkle Khanna Working mom Challenge).  

(Image : Google)

कॅप्शनमध्ये ट्विंकल म्हणते, “महिलांनी असे काम करावे जसे त्यांना मूल नाही आणि मुलांना असे वाढवावे की त्यांना काम नाही अशी समाजाची अपेक्षा असते. अशा परिस्थितीतून जाणारे आपण एकटेच आहोत असे बहुतांश वर्किंग मॉम्सना वाटते.” मात्र सगळीकडे कमीअधिक फरकाने हीच परिस्थिती असते. अवघ्या १९ तासात या पोस्टला जवळपास ४४ हजार लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंटस केल्या असून काही महिलांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर काहींनी आपल्याला असणारे प्रश्न ट्विंकल खन्ना यांना विचारले आहेत. आता ही १० चॅलेंजेस कोणती ते पाहूय़ा...

१. खूप कामात असताना तुम्हाला आज खायला काय आहे हे विचारण्यासाठी डिस्टर्ब केले जाते?

2.मासिक पाळीमुळे पोटात दुखत असताना तुम्हाला तासनतास काम करत बसावे लागते?

3.तुम्ही गर्भवती आहात हे समजल्यावर तुमच्याकडून काही प्रोजेक्टस काढून घेतले जातात. 

4.मॅटर्निटी लिव्हनंतर पुन्हा ऑफीसला जॉईन होताना वर्क फोर्ससोबत जुळवून घेणे अवघड जाते?  

5.काम आणि फॅमिली यामध्ये तुम्ही प्रायोरीटी ठरवू शकता का असे तुम्हाला विचारले जाते? 

 

6. तुम्ही घाईने मिटींग अटेंड करायला जाता आणि तिथे गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की तुमच्या बाळाने तुमच्या खांद्यावर उलटी केली आहे? 

7. झूम कॉलवर मिटींग सुरू असताना तुम्हाला हा कॉल म्यूट करावा लागतो कारण तुमचे मूल दारावर डोके आपटून तुम्हाला सांगत असते मम्मा सू सू आली?

8. तुम्ही स्वतःला बाथरूममध्ये लॉक करून घेता कारण तुम्हाला महत्त्वाचे मेल करायचे असतात?

9. चुकून सुट्टीच्या दिवशीही तुम्ही मुलांना शाळेत पाठवता?

10. आई असणे याशिवाय इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी ठेवणारी किंवा थकवणारी नसते? 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं