Lokmat Sakhi >Parenting > मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ?

मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ?

Understanding boys Puberty: वयात येणाऱ्या मुलींना शेकडो गोष्टी शिकवल्या जातात; पण ‘मुलग्यांचं’ काय? धोका त्यांनाही आहेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 06:26 PM2024-08-27T18:26:12+5:302024-08-27T18:29:23+5:30

Understanding boys Puberty: वयात येणाऱ्या मुलींना शेकडो गोष्टी शिकवल्या जातात; पण ‘मुलग्यांचं’ काय? धोका त्यांनाही आहेच..

Understanding boys Puberty, how to teach a boy to become sensitive, respect women and handle social pressure? parenting tips | मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ?

मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ?

Highlightsस्त्रियांचा व्यक्ती म्हणून सन्मान करणं, परस्पर आदर ठेवणे हे पुरुषी अहंकाराच्या विरुद्ध मूल्य मुलांना शिकवायला हवं.

-डॉ. योगिता आपटे (लेखिका समुपदेशिक आहेत.)

मन सुन्न करणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे गेल्या काही दिवसांत आपण सगळेच हतबल झालो आहोत. कोणत्याही वयाची स्त्री समाजात सुरक्षित नाही, हे आजचे चिंताजनक वास्तव. अशा घटनांनंतर काही दिवस मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात, बंद पुकारले जातात. न्यायाची मागणी होते, अपराध्यांना कठोर शिक्षा व्हावी, असा आक्रोश होतो. समाजमाध्यमांवर ‘ब्लॅकआउट’ सारखा प्रतीकात्मक निषेधही नोंदवला जातो आणि पुन्हा सगळं शांत होतं. आपलं दैनंदिन रहाटगाडगं सुरू राहतं ते पुन्हा एखादी दुर्दैवी घटना घडेपर्यंतच. हे वास्तव उद्विग्न करणारं आहे.

स्त्रियांचं सबलीकरण, त्यांना लहान वयापासून स्वसंरक्षणाचे धडे देणं, शाळा-काॅलेजमध्ये सीसीटीव्ही बसवणं, सखी सावित्री समिती स्थापन करणं अशा उपाययोजना केल्या जातात. पालक संघटना आक्रमक भूमिका घेतात. प्राथमिक शाळांमध्ये फक्त महिला कर्मचारी असाव्यात, असेही सुचवले जाते. थोडक्यात मुलींनी काय करावं, व्यवस्थेनं काय बदल करावा, सरकारने काय कायदे करावेत, याची भरपूर चर्चा होते; परंतु या सगळ्यात पुरुषांच्या मानसिकतेबद्दल खूप कमी विचार होतो.
‘सगळे पुरुष वाईट’ अशी सार्वत्रिक अविश्वासाची भावना तयार होते; पण खरोखरच सगळे पुरुष विकृत असतात का? नक्कीच नाही. त्यांनाही अशा घटनांबद्दल चीड असते. वाईट वाटते, भीतीही वाटते. तेही गोंधळलेले असतात. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी मुलींसह आपल्या मुलांशीही बोललं पाहिजे, अशी चर्चा होते.

वयात येणाऱ्या, पौगंडावस्थेतील आणि किशोरवयीन मुलग्यांशी बोलणं, संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक प्रेरणा अतिशय नैसर्गिक, सुंदर आणि आनंददायी असते. फक्त तिचे नियमन (दमन नव्हे!) मुला-मुलींना शिकवणं हे अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच पालकांना हे पटत असतं. त्यांना असं बोलण्याची इच्छाही असते. परंतु वयात येणाऱ्या ‘मुलग्यांशी’ नेमकं काय बोलावं, त्यासाठी योग्य वय काय, जास्त बोलल्याने नुकसान तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न पालकांना पडतात.

बोलायचं काय? ठरवायचं कसं?

१. सर्वप्रथम हे लक्षात घेऊ या की, लैंगिक शिक्षणाचे दोन पैलू असतात. माहिती आणि मूल्यशिक्षण. इंटरनेटवरच्या पाॅर्न साइट्स आणि माहितीच्या महापुरामुळे आजच्या मुलांना माहिती खूप असते. खरी गरज आहे लैंगिकतेच्या मूल्यशिक्षणाची. मुलं समाजात वावरताना, कुटुंबामधून मूल्य शिकतात. त्यांना लेक्चर नको असतं. स्त्री-पुरुष, समानता हे मूल्य आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत शिकवणं हे अवघड काम आहे; पण हे शिवधनुष्य आपल्याला पेलायलाच हवं!
२. जन्मत: मुला-मुलींमध्ये कोणतीही श्रेष्ठत्वाची भावना नसते. मुलं मोठी होताना संस्कृतीच्या प्रभावाखाली आपली लैंगिक ओळख घडत जाते. ‘मुलीसारखा मुळूमुळू रडू नकोस’ ‘स्वयंपाकात लुडबुड करणं, हे मुलांचं काम नाही.’ ‘मुलं भातुकली-बाहुल्यांशी खेळत नाहीत.’ अशी विधानं नकळतपणे लैंगिक असमानतेचा पुरस्कार करतात. बालवाडीच्या पुस्तकात दाखवलेली विविध व्यावसायिकांची चित्रेही स्त्री-पुरुष असमानता दाखवतात. उदाहरणार्थ सैनिक नेहमी पुरुष दाखवलेला असतो तर नर्स नेहमी महिला..

३. नैतिकतेचे डोस देण्यापेक्षा मोकळा संवाद साधण्याचा पालकांनी प्रयत्न करायला हवा. ‘माझा जन्म कसा झाला?’ हा जवळजवळ प्रत्येक मुलाने लहानपणी विचारलेला प्रश्न. अशा प्रश्नांकडे संधी म्हणून पाहायला हवे. अशा ‘अवघड’ प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देण्यापेक्षा योग्य माहिती देता येते. मुलांशी लहानपणापासून सर्व विषयांवर बोलायला हवं.
४. पौगंडावस्थेतील मुलांशी बोलताना माध्यमांतील बातम्यांचा उपयोग करता येतो. तुला ही घटना माहिती आहे का? तुझे मित्र-मैत्रिणींशी याबाबत काही बोलणं झालं का? याबद्दल तुला काय वाटते? अशा प्रश्नांतून मुलांना बोलतं करायला हवं.
५. अशा घटना टाळण्यासाठी समाजात रुजायला हव्यात दोन प्रमुख भावना. पहिली म्हणजे आदरभाव. समोरच्या व्यक्तीचा मान ठेवणे. सगळ्यांशी साैजन्याने वागणे, मतभेदांचा स्वीकार करणे आणि आपली चूक असेल तर माफी मागणे, या गोष्टी मुलांना प्राधान्याने शिकवायला हव्यात. रस्त्यावर गाडी चालवताना स्त्रियांनी ओव्हरटेक करून पुढे जाणे आजही बऱ्याच पुरुषांना सहन होत नाही. स्त्रियांचा व्यक्ती म्हणून सन्मान करणं, परस्पर आदर ठेवणे हे पुरुषी अहंकाराच्या विरुद्ध मूल्य मुलांना शिकवायला हवं.

६. ‘एम्पथी’ किंवा समानुभूती ही दुसरी आवश्यक भावना. दुसऱ्याच्या भावना समजून घेणं आणि त्याला येणाऱ्या अनुभवाची कल्पना करू शकणं असा याच अर्थ. एखाद्याच्या शरीराला त्याच्या इच्छेविरुद्ध हात लावणं, जबरदस्तीनं अंगचटीला जाणं, हे किती त्रासदायक आणि अपमानास्पद आहे, यावर मुलांशी बोलायला हवं. बरेचदा शारीरिक अत्याचार, विनयभंग, बलात्कार यावर गुन्हा दाखल होतो. न्यायाची शक्यता निर्माण होते; परंतु त्यापेक्षा कैकपटींनी अधिक प्रमाणात मुलींना शाब्दिक, मानसिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. शरीरयष्टीवरून इशारे करणं, समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मेसेज/फोटो पाठवणे ही कृत्येही थांबायला हवीत, हे असं वागणं चूक आहे हे मुलांना सांगायला हवं.
७. मैत्रिणींबद्दल बोलताना मर्यादा सांभाळणे, कोणाच्याही अंगचटीला न जाणे, इतर मित्र असं वागत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करणे, कोणत्याही मुलीच्या शरीर-मन-भावनांचा आदर करणे, अशी मूल्य आजच्या मुलांना पालकांनी द्यायला हवी. हे सारं मोकळेपणानं बोलता येऊ शकतं.

८. ‘नकाराचा स्वीकार’ हे अजून एक महत्त्वाचं कौशल्य. खरंतर नकार देता-घेता येणं हे कणखर मनाचं लक्षण आहे. या कौशल्याचा आयुष्यात अतिशय उपयोग होतो. नैराश्यवरचीही लस आहे खरंतर! पण आजच्या ‘मूलकेंद्रित’ पालकत्वामध्ये मुलांना नकार देण्याची सवयच पालक हरवत चालले आहेत. कोणत्याही मागणीला मिळालेला नकार मुलांना संयमानं स्वीकारता आला तर भविष्यात त्यांना कुणी मुलीने नाही म्हणणेही पचवणे जमू शकेल.
९. मुलींना कणखर, स्वावलंबी बनवणे तसेच मुलग्यांना सौजन्यपूर्ण आणि मर्यादाशील करणे, ही आजच्या काळाची गरज आहे. तरच मुलामुलींचे भविष्य मुलींसाठी सुरक्षित असेल.

yogeeta.apte@gmail.com

Web Title: Understanding boys Puberty, how to teach a boy to become sensitive, respect women and handle social pressure? parenting tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.