डॉ. वैशाली देशमुख
डॉक्टरांच्या सत्राला मागच्या वेळी काहीशा शंकेनं आलेली मुलं यावेळी मात्र उत्सुकतेनं त्यांची वाट पहात होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुलांनी आपापले प्रश्न चिठ्ठ्यांवर लिहून टेबलावरच्या पेटीत टाकले होते. आपल्याला घाणेरडे वाटणारे विषय खरंतर तसे नाहीत, आपल्या इतर अवयवांसारखेच हेही अवयव असतात असा मुलांना साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांची भीड चेपली होती.
डॉक्टरांनी एक चिठ्ठी उचलली. एका मुलानं विचारलं होतं, लिंग ताठ का होतं? आणि असं झालं तर काय करायचं?
डॉक्टर म्हणाले, “लिंगामध्ये कुठलेही स्नायू किंवा हाडं नसतात. त्यामध्ये खूप साऱ्या पोकळ्या असतात, आणि त्या रक्तवाहिन्यांना जोडलेल्या असतात. वयात येत असताना तुमच्या हॉर्मोन्सची पातळी वाढलेली असते. त्यामुळे लैंगिक चित्रं दिसली किंवा काही विचार मनात आले तर एकदम या रक्तवाहिन्यांमधला प्रवाह वाढतो, लिंगातल्या पोकळ्या भरून जातात. म्हणून लिंग ताठरतं. बऱ्याच वेळा तर काही कारण नसतानाही असं होतं. ही गोष्ट पूर्णपणे मुलांच्या नियंत्रणात नसते. असं काही झालं तर मुलं घाबरतात, बिचकतात.
पण मुलांना हे सांगायला हवं की..
लिंग ताठरणं ही एक नैसर्गिक घटना आहे. हातानं दाबून ते ठीक होत नाही. पण घाबरू नका, तुम्ही काहीच करू शकत नाही असं नाही. तुमची पोझिशन थोडीफार बदलली तर ते इतरांना दिसतही नाही. शांतपणे वाट पाहायची, म्हणजे ते आपोआप कमी होतं. तो रक्तप्रवाह कमी व्हावा यासाठी मनाला दुसरीकडे वळवायचं. म्हणजे दुसरे काहीतरी विचार मनात आणायचे, अभ्यास, मित्र, बास्केटबॉलची मॅच, मित्रानं सांगितलेला एखादा जोक किंवा चक्क एखादा अवघड पाढा, असं काहीही. काही खोल श्वास घेतले तरी चालतील.
लिंग रात्री झोपेतसुद्धा ताठरू शकतं. अशा वेळी कधी कधी जननेंद्रियांच्या सेमिनल व्हेसिकल नावाच्या पिशवीत साठलेलं वीर्य लिंगातून नकळत बाहेर टाकलं जातं. सकाळी उठल्यावर ते लक्षात येतं. याला स्वप्नावस्था (wet dreams) असं म्हणतात. हेसुद्धा अगदी नैसर्गिक आहे. शुक्राणू(sperms) सातत्यानं तयार होत असतात, त्यामुळे ते अधूनमधून असे बाहेर टाकायला लागतात. याविषयी काळजी करण्याचं काही कारण नाही.
मुलांशी हे शास्त्रीय भाषेत बोललं नाही तर ते चुकीच्या गोष्टी शोधतात आणि त्याचे भलते अर्थ लावून भलते प्रयोग करतात.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)