-डॉ. वैशाली देशमुखहार्दिक खेळून आला. आईनं दार उघडल्यावर त्यानं ‘हाय आई!’ असं म्हणून तिला घामट अंगानं थेट मिठीच मारली. आईचा एकदम तोल गेला आणि ती ओरडली, ‘अरे हळू जरा, किती मस्ती करतोस हार्दिक! धसमुसळेपणा नुसता!’ हल्ली तो असाच करतो, मोठा होतोय त्याची ताकद वाढली आहे. काही बोललं की चिडतोही, असं का?
परवा त्यानं सहज त्याच्या छोट्या बहिणीला टपली मारली , तर तिनं भोकाड पसरलं.‘मी काय केलंय? साधी टपली तर मारली! उगाच ओरडते ही.’ आठवीतला हार्दिक हा खेळाडू आहे, तो बास्केटबॉल खेळतो. सध्या त्याची उंची वाढायला लागली आहे आणि तो आईहून उंच झाला आहे. त्याची ताकद वाढली आहे, पण त्याच्या ते लक्षातच येत नाही. त्यानं सहज गमतीत धक्का मारला तरी लोकांचा तोल जातो. मग सगळे त्याला ओरडतात. ‘धसमुसळा, मस्तीखोर, आडदांड’ असं काही ना काही त्याला आई, आजी, बाबा म्हणत असतात. शाळेतून घरी आला आणि कुठेतरी बँडेज केलेलं दिसलं की आई विचारते, ‘आज काय उद्योग करून आला आहेस? मारामारी वगैरे केलीस का?’ कारण मधल्या सुट्टीत डबा खायचा सोडून या मुलांची कुस्ती चालू असते हे तिला माहिती झालंय.
परवा तर कहरच झाला. हार्दिकच्या वर्गातल्या शमानं टीचरकडे तक्रार केली त्याच्याविरुद्ध. ती त्याला पेन देत नव्हती तर त्यानं तिचा हात पिरगळून ते काढून घेतलं. मग टीचरनी शिकवायचं थांबवलं आणि त्या म्हणाल्या, ‘मला वाटतं आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आपले हक्क काय हे सगळ्यांना माहिती असतं, हो ना?पण जेव्हा तुम्ही इतरांना स्पर्श करता तेव्हा मात्र त्यात तुम्ही एकटे नसता, अशा वेळी तो फक्त तुमचा हक्क रहात नाही. त्या दुसऱ्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कुणालाही हात लावताना स्वत:ला विचारा, त्या व्यक्तीची त्यासाठी संमती आहे ना? सरसकट त्यांची संमती गृहीत धरणं, त्यांना मान्य असेलच असं समजणं बरोबर आहे का?’मुलांनी ‘नाही’ अशा माना हलवल्या.
‘हार्दिक, तुम्हा मुलांना याबाबतीत जास्त काळजी घ्यायला हवी. आता तुमचे स्नायू बळकट होतायत, तुमची शक्ती वाढतेय. आपण दुसऱ्याला दुखवतोय हे तुमच्या लक्षात येत नाही. मस्ती करणं हा आपला हक्क आहे असं तुम्हांला वाटतं. ‘मी मुलगा आहे ना, म्हणून मी असा आहे.’ असं मुलांना वाटत असेल. पण मुलगा असणं म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं नव्हे. तुमच्या शक्तीचा नीट वापरही करता येतो. इतरांना आदर देण्यात खरी मर्दानगी आहे.टिचरने असं समजल्यावर हार्दिकला समजलं की आपलं नक्की काय चुकतंय.
शाळा सुटल्यावर कुणी न सांगताच हार्दिक शमाला सॉरी म्हणाला.मोठ्या होत जाणाऱ्या हार्दिकची ताकद आता योग्य गोष्टींसाठी तो वापरेल हे नक्की. न रागवता शिक्षिकेनं समजावलं आणि त्याला समजलं. म्हणून वयात येणाऱ्या मुलांशीशांतपणे बोलणं आवश्यक!
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)vrdesh06@gmail.com