अश्विनी बर्वे (मुक्त पत्रकार/शिक्षिका)
आज फक्त मुलांशीच बोलू असं ठरवलं नव्हतं; पण तसं झालं. माहीत होतं की, वेगवेगळे कॉम्प्युटर गेम, मोबाइल गेम, ग्राफिक्स असणारे सिनेमे यावरच बोलणं होणार. मुलं/मुलगे मग ते ९ ते १२ वर्षांचे; पण बोलता- बोलता त्यांनी एकमेकांच्या तक्रारी सुरू केल्या. तो मला असा म्हणतो, कंपास, दप्तर खाली पाडतो, मुद्दाम मी वर्गात हजर असताना गैरहजर म्हणतो. या तक्रारी सुरू झाल्या. त्या ऐकून मी त्यांनाच त्यावर उपाय विचारला. तर त्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि सरसावून बसले. मग एकदम विषय आता सर्वांत चर्चेत असणाऱ्या बातमीपर्यंत आला आणि सगळीकडे शांतता पसरली.
आणि एक मुलगा म्हणाला माझी आई सतत माझ्या बहिणीलाच सांगत असते की, इकडे जाऊ नको, हे करू नको. आम्हाला पण भीती वाटते, रडू येते याकडे कोणीच लक्ष देत नाही. यावर बाकीची मुले हसू लागली. रडणे, भीती वाटणे हे मुलांबाबत होऊ शकते हे घरातच मान्य नाही म्हणूनच इतर मुले त्याला हसत होती. अनेकवेळा घरात भांडणे होतात, आईवर हात उगारला जातो, बहिणीला शिव्या दिल्या जातात. आईचा चेहरा रडका असतो; पण तरीही ती आदल्या दिवशीच्या खुणा विसरून ती घरात वावरत असते. हे सर्वच मुलगे बघत असतात आणि स्त्रियांशी असेच वागायचं असतं असं त्यांच्या मनात येऊ शकते.
मुलांचे म्हणणे होते की, आम्हाला आमच्या शरीराबद्दल, त्याच्या स्वच्छतेबद्दल कोणीच सांगत नाही. म्हणजे आई बहिणीला काही ना काही सांगत असते तसे आमचे वडील/बाबा आमच्याशी काहीच बोलत नाहीत. ते फक्त विचारतात अभ्यास केला का? मार्क किती पडले? आम्हाला मुलींशी बोलताना लाज वाटते, जी मुलं बिनधास्त बोलतात त्यांच्याबद्दल भारी वाटतं. मग ते मुलीकडे आम्हाला ढकलतात आणि मग अजून लाजल्यासारखं होतं. त्यामुळे मित्राऐवजी मुलींचाच राग येतो; पण मुलींनी आमच्याशी बोलावं असं आम्हाला नक्की वाटतं. खेळताना त्या आमच्या पक्क्या शत्रू असतात हे मात्र नक्की.
ही चर्चा वाढत गेली तसं लक्षात आलं की मुलांनासुद्धा (मुलगे) त्यांच्या शरीरात होणारे बदल त्याबरोबरच त्यांच्या मनात होणारे बदल याबद्दल समजून घ्यायचे आहे. कारण फक्त बदल होतात हे सांगून उपयोग नाही, तर त्यांच्याशी जुळवून कसे घ्यायचे हे सांगायला हवे.
मुलं कोणते प्रश्न विचारतात?
१. जास्त राग आल्यास आपले मन शांत होण्यासाठी काय करावे?
२. माझे वडील आम्हाला मारतात, आईवर चिडतात मग अशावेळी काय करावे?
३. उदास वाटल्यावर उत्साह मिळवण्यासाठी काय करावे?
४. वर्गात एकमेकांशी बोलताना मजा येते; पण टीचरने प्रश्न विचारला की, भीती वाटते, तोंडातून शब्द फुटत नाही, टीचर रागवण्याची भीती वाटते. अशावेळी काय करावे?
५. कोणी रागावल्यास अंग थरथर कापते, डोळ्यांत पाणी येते. अशावेळी सगळेजण आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. तेव्हा स्वतःची लाज वाटते. अशावेळी काय करावे?
६. आम्ही एखाद्या मुलीशी सहज बोललो तरीही मुले त्याचा वेगळा अर्थ का काढतात?
७. आम्ही स्वतःला स्मार्ट का समजतो? स्मार्ट म्हणजे काय?
उत्तरं कुणाकडे मागायची?
मुलांना अनेक प्रश्न पडतात. त्यांचे वयच तिठ्यावरचे आहे. त्यांना स्वतःत झालेल्या बदलांचा शोध घ्यावा वाटतो; पण तो कसा हे माहीत नसते. कारण वडिलांनाही तसे मार्गदर्शन कधी मिळालेले नसते किंवा असा काही विचार करायचा असतो हेच त्यांना माहीत नसते.
समाजात मुलग्यांना आणि मुलींना वेगळी वागणूक मिळते असे अनेक मुलांना वाटते. त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याचा विचार मुलग्यांना करायला लावला तेव्हा अनेकजण म्हणाले. ‘सगळं मुलींनाच मिळतं. सरकारतर्फे मोफत पुस्तके, मोफत शिक्षण मिळते, त्यांना बसभाडे कमी लागते, मुलींकडे सतत सहानुभूतीने पाहिले जाते.’
काही मुलांना वाटते की, मुलगे शिकले आणि नोकरी मिळाली नाही, स्वत:च्या पायावर उभं राहिले नाही तर लोक काय म्हणतील? मुलांच्या मनावर पोषणकर्त्याच्या भूमिकेचा ताण येत असेल हे कुणाच्या लक्षात तरी येतं का?
मुली आणि मुलांचे संगोपन खूप वेगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे किशोरवयीन मुलगे किंवा इतर वयातील मुलगेसुद्धा समाजाची पूर्ण कल्पना नसल्याने असे फायद्या-तोट्याची गणितं मांडतात. अर्थात, ही मुले उघडपणे फार कमीच बोलतात.
मुलांना जेव्हा विचारले तुम्ही मोठे झल्यावर कसे वागणार?
तर अनेकजण म्हणाले, ‘आम्ही बाबासारखे वागणार नाही, आमच्या मुलाशी आम्ही विश्वासाचे नाते तयार करू, त्यांच्याशी संवाद साधू, मारणार नाही.’
आपल्या मुलांच्या मनात काय चालू आहे, हे समजून घेण्याची आणि त्यांना समजावून सांगण्याची मोठी जबाबदारी आता घरोघरच्या वडिलांवर आहे. त्यांनी स्वत:चे विचार तपासून पाहिले पाहिजेत.
मुली व मुलं माणूस म्हणून संपन्न होण्यासाठी प्रेम व सौंदर्य यांच्या संकल्पना मुळातून तपासल्या पाहिजेत. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण असे समीकरण मुलांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचते. त्यामुळे त्यांचा भावनिक गोंधळ झालेला आहे. मुला-मुलींमध्ये मोकळेपणा, चांगली मैत्री होईल असे वातावरण तयार होणं आवश्यक आहे.
ashwinibarve2001@gmail.com