Join us  

विराट कोहली-रणबीर कपूर यांनी घेतला पॅटर्निटी ब्रेक, तर त्यात नावं ठेवण्यासारखं काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 5:35 PM

बाळ झाल्यावर जसं आई ब्रेक घेते, तसा बाबानेही घेतला तर लगेच त्यात अपमानास्पद वाटावं असं काय आहे?

ठळक मुद्देका लगेच अब रणबीर डायपर बदलेगा म्हणून नावं ठेवायची? मुळात आपल्याच पोटच्या पोराची डायपर बदलणं कमीपणाचं का वाटावं?

तसं आपल्या समाजात हे नवीन नाही, पण प्रश्न एवढाच आहे की हे चित्र बदलणार कधी? आठवतं, वामिकाच्या जन्माच्या वेळी विराट कोहली पॅटर्निटी रजा घेऊन ऑस्ट्रेलियातून सुटी घेऊन घरी आला होता. आपल्याकडे अनेकांना अजिबात ते आवडलं नव्हतं अनेकजण म्हणाले, जा आता तू डायपरच बदल, तुझी तीच लायकी आहे. आता तेच सारं रणबीर कपूरच्या संदर्भातही ऐकायला येतं आहे. अलिकडेच बॉलिवूड हंगामाने दिलेल्या एका बातमीनुसार तो पॅटर्निटी लिव्ह अर्थात पालकत्व रजा घेण्याचा विचार करतो आहे. बाळ झाल्यावर काही दिवसांनी आलिया पुन्हा कामाला सुरुवात करेन, रणबीर सुटी घेईन असं ते वृत्त होतं. त्यावर सोशल मीडियात अनेकांनी त्याला ट्रोल केलं काहीजण म्हणाले, अब ये बच्चे संभालेगा और मॅडम काम करेगी..

(Image : google)

हे इतकं अपमानास्पद आणि जुनाट बोलणं-वागणं आपल्या समाजात आजही का दिसावं? करिअरिस्ट महिलाच काय अगदी नोकरदार महिलाही बाळ झालं की काळ स्लो डाऊन करते. बाळ ही आपली जबाबदारी आहे या भावनेपेक्षाही अत्यंत प्रेमानं, मायेनं आई होत बाळाचं सारं करते. ते सारं अपेक्षितच असतं. बाळ झाल्यावर करिअरला बाईने रामराम ठोकला तरी लोकांना त्याचं काही वाटत नाही. उलट ते तिनं करायलाच हवं अशी भावना असते. मात्र पुरुषानं काही काळ आपल्याला बाळ झाल्यावर सुटी घेतली, आपलं बाळ आपण वाढवावं त्याला वेळ द्यावा असं वाटलं तर लगेच त्याला नावं ठेवण्यासारखं, अपमान करण्यासारखं काय आहे?

(Image : google)

आलिया किंवा रणबीर, अनुष्का-विराट कोहली सेलिब्रिटी आहेत म्हणून नव्हे तर प्रत्येकानंच आजच्या आधुनिक काळात स्वत:ला विचारायला हवं की बाळ झाल्यावर बाबानं काही काळ जर करिअरमधून ब्रेक घेतला, बाळ सांभाळलं तर त्यात आकाशपाताळ एक करण्यासारखं अनपेक्षित किंवा भयंकर काय आहे?रणबीरला जर वाटलं की आपल्या बाळाला वेळ देणं सिनेमात काम करण्यापेक्षा महत्त्वाचं आहे तर त्याच्या निर्णयाचा सन्मान करण्याइतपत समंजसपणा का असू नये? का लगेच अब रणबीर डायपर बदलेगा म्हणून नावं ठेवायची? मुळात आपल्याच पोटच्या पोराची डायपर बदलणं कमीपणाचं का वाटावं?

 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट