- डॉ. वैशाली देशमुख
तुम्हाला जस्टीन बीबर माहिती असेल ना? फेमस कॅनेडियन पॉप सिंगर? एकदा पेपरमध्ये त्याच्याविषयी बातमी आली होती. तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. बातमी अशी होती, ‘जस्टीन बीबरच्या करिअरला सगळ्यात मोठा धोका- फुटलेला आवाज!’ असं जे घरोघर मुलांना वाटतं की आपला आवाज बदलला, सगळे म्हणू लागतात की तुझा आवा फुटला? तर म्हणजे नेमकं काय होतं?
‘फुटलेला आवाज? म्हणजे काय असतं? ते काय भांडं आहे का फुटायला?’ पण असं घडतं खरं.
बहुतेक मुलांमध्ये साधारण ११ वर्षांच्या नंतर सोळा वर्षांपर्यंत कधीतरी हे सुरू होतं. बोलायला तोंड उघडलं की कसला आवाज बाहेर येईल कोण जाणे, अशी भीती वाटायला लागते. जस्टीनसारख्या अनेक गायकांना आवाज फुटल्यामुळे गायला अडचण झाल्याच्या कथा आहेत. त्यातले काहीजण निराश झाले, काहीजणांनी चक्क गाणं सोडून दिलं. पण ‘हेही दिवस जातील’ यावर ज्यांचा विश्वास होता, ते प्रयत्न करत राहिले आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. हा आवाज काही असाच विचित्र राहणार नाहीये. फक्त काही महीने जाऊ दिले की तोपर्यंत स्वरयंत्राची वाढ पूर्ण होईल, आवाजाला शिस्त लागते आणि तो मोठ्या माणसांसारखा भारदस्त येईल. मधल्या काळात मुलांना जरा अडचणीचं होतं हे खरं. थोडी एकमेकांना चिडवाचिडवीही होऊ शकते, कारण प्रत्येकाचा आवाज वेगवेगळ्या वेळी फुटतो ना म्हणून. पण आवाज फुटणं म्हणजे काही वाईट नाही हे मुलांना सांगायला हवंच.
मुलांचा आवाज का फुटतो?
आपला आवाज येतो कुठून? तो येतो आपल्या गळ्यातल्या स्वरयंत्रातून (larynx). आपल्या फुप्फुसांतून बाहेर येणारी हवा आणि आवाजाची ही पेटी, या दोन्हींच्या मदतीनं आपल्या घशातून आपण आपल्याला हवे ते आवाज काढू शकतो, बोलू शकतो, गाऊ शकतो. वयात येताना टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन या स्वरयंत्राचा आकार वाढवतं. मुलांच्या गळ्यावर कंठ किंवा घाटी दिसायला लागते. त्याला 'ॲडम्स ॲपल' ( Adam’s apple)असंही म्हणतात. त्याच्या आतले पडदे काहीसे जाडसर होतात. साहजिकच बाहेर पडणारा आवाज बदलतो. आणि नुसता बदलत नाही, तर तो चक्क फुटतो. कधी बेसूर, कधी भसाडा, तर कधी चिरका!
मुलींच्या स्वरायंत्रात होणारे बदल इतके जास्त नसतात. त्यामुळे त्यांच्या आवाजात थोडा प्रौढपणा येतो, पण मुलांप्रमाणे मुलींचा आवाज फुटत नाही.
आपल्या गाण्यानं सगळ्यांना वेड लावणारा जस्टीन यापुढे गाऊ शकेल की नाही अशी त्याच्यासकट सगळ्यांना भीती वाटायला लागली होती. पण ती भीती अर्थातच खोटी ठरली. त्याचा फुटलेला आवाज हळूहळू स्थिरावला. आणि तो वेगळ्या, अधिक परिपक्व आवाजात पुन्हा जोमानं परतला. अजूनही जगभर त्याचे कितीतरी कार्यक्रम होत असतात. जसं जस्टीन बिबर सावरला आणि उत्तम गायक झाला तसं सगळ्या मुलांना आपल्या आवाजाची पट्टी बदलेल हे माहितीच हवं.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com