आपली मुलं जसजशी मोठी होत जातात तसे त्यांच्यासोबत जुळवून घेणे काहीवेळा पालकांना कठीण जाते. अशावेळी पालक आणि मुलांमध्ये मतभेद होऊन राग, रुसवा, भांडण अशा गोष्टी वारंवार होतात. या सर्व गोष्टी टाळून आपल्या मुलांसोबत आपले चांगले बॉन्डिंग होणे गरजेचे असते. पालक होणे हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात आनंददायी आणि परिपूर्ण अनुभव असू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की पालकत्व सोपे आहे. एक चांगले पालक होण्यासाठी, तुम्ही तुमच्या मुलाला योग्य आणि अयोग्य यातील फरक जाणून घेण्यास मदत करत असताना; त्यांच्या मानसिकतेचेही संतुलन राखले पाहिजे. ते कठीण असले तरीही, एक पोषक वातावरण तयार करण्यासाठी पालक आणि मुलांमधील बॉन्ड किंवा भावनिक नाते तयार झाले पाहिजे(3 WAYS YOU CAN BE YOUR TEEN’S BEST FRIEND).
मुलांसोबत स्ट्रॉंग बॉन्ड तयार करण्यासाठी हे उपाय करा...
१. फोन हातात घेण्यापेक्षा मुलांचा हात हातात घ्या :- तुमच्या मुलांना भरपूर प्रेम द्या, त्यांच्या संपूर्ण बालपणात मजबूत शारीरिक आणि भावनिक बंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. उबदार स्पर्श किंवा प्रेमळ शब्द मुलांना त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव करुन देतात. काही वेळेला, काही पालक ते ठरवतात तसे त्यांचे पाल्य वागले नाही तर त्यांच्यावर रागावतात. तुम्हाला जे वाटते तेच त्यांनी केले पाहिजे ही अपेक्षा ठेऊ नका, कारण प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. तुमच्या मुलांना त्यांच्या कर्तृत्वाचा आणि स्वतःबद्दलचा अभिमान वाटण्यास मदत करा. जेव्हा ते काही चांगले करतात, तेव्हा त्यांना कळवा की तुमच्या लक्षात आले आहे आणि तुम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. मुलांच्या नैसर्गिक कलागुणांपेक्षा त्यांच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या वागणुकीची स्तुती करा. हे त्यांना कठीण आव्हान स्वीकारण्यास शिकण्यास मदत करेल. मुलांचे काही चुकल्यास त्यांचा हात आत्मविश्वासाने हातात घेऊन रागावण्याऐवजी त्यांना समजावा.
२. एक प्रेमाची गोड मिठी :- तुमच्या मुलाने काय चूक केली आहे हे तुम्ही दाखवत असताना, कठोर पण दयाळू व्हा. कठोर आणि गंभीर व्हा, परंतु जेव्हा तुम्ही त्यांना काय अपेक्षित आहे हे सांगता तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन सांगा. तुम्ही तुमच्या मुलांसोबत एखादे काम किंवा त्यांचा अभ्यास घेत असताना शक्य तितके शांत आणि मवाळ राहण्याचा प्रयत्न करा. साहजिकच, हे एक आव्हान असू शकते. काहीवेळा रागात आपण आपला स्वभाव गमावून बसतो आणि राग नियंत्रणाबाहेर जातो. अशावेळी जर तुम्ही रागाच्या भरात काही केले किंवा तुम्हाला त्या कृत्याबद्दल वाईट वाटले तर तुम्ही तुमच्या मुलांची माफी मागितली पाहिजे. माफी मागून त्यांना जवळ घेऊन एक प्रेमाची गोड मिठी मारा.
३. त्यांचे बोलणे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका :- तुमच्या मुलांसोबत गप्पा मारताना ऐकण्याचा सराव करा जेणेकरुन त्यांना कळेल की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत आहात. ते तुमच्याशी बोलत असताना त्यांच्याकडे पहा आणि हो-हो मला समजले किंवा बोलणे चालू ठेवा यासारखी होकारार्थी विधाने करुन तुम्ही त्यांचे मन वळवू शकतात.जेव्हा तुमची बोलण्याची पाळी असेल, तेव्हा तुम्ही प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांना काय म्हणता येईल ते सांगा. मुलांशी दररोज बोलण्यासाठी विशिष्ट वेळ बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रामुख्याने झोपण्यापूर्वी, नाश्त्याच्या वेळी किंवा शाळेनंतर घरी आल्यावर त्यांच्याशी बोलण्याची वेळ ठरवा. मुलांशी संवाद साधताना मोबाईल फोन किंवा हातातले काम काही काळासाठी बाजूला ठेवा. त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. त्यांचे मत ऐकून मगच आपले मत मांडा.