सकाळी झोपेतून उठल्यापासून आपण मुलांना अमुक कर तमुक कर असं मागे लागतो. मुलांनी आपलं सगळं ऐकावं, कायम शहाण्यासारखं वागावं आणि आपण म्हणू कसं सगळं करावं अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. पण मुलं आपल्या म्हणण्याप्रमाणे काहीच करत नाहीत आणि मग मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण सतत तक्रार करत राहतो. यामुळे आपली तर चिडचिड होतेच पण मुलांच्या आणि आपल्या नात्यावरही त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागतो. पण मुलं ही आपलं बोलणं, वागण, चालणं सगळं बारकाईने टिपत असतात आणि आपण त्यांच्याशी जसं वागतो तसंच ते आपल्याशी किंवा इतरांशी वागत असतात. त्यामुळे मुलांशी वागता-बोलताना खूप काळजी घ्यावी लागते (Want Your Children Listen to You Parenting Tips).
आपण प्रेमाने सांगून, समजावूनही अनेकदा मुलं आपलं म्हणणं ऐकत नाहीत. यामागे नेमकं काय कारण असतं. तर आपण मुलांना एखादी गोष्ट करायला नुसतं सांगत नाही तर त्यांच्यावर एकप्रकारचा अधिकार गाजवतो. अनेकदा पालक म्हणून आपले म्हणणे बरोबर असले तरी एखादी गोष्ट सांगण्याची आपली पद्धत मुलांना आदर न देणारी असू शकते. म्हणूनच मुलं आपलं ऐकत नाहीत. ते ऐकत नाहीत म्हणून आपण ओरडतो, चिडतो आणि आपण असं करतो म्हणून ते पुन्हा ऐकत नाहीत. हे चक्र चालूच राहते. त्यापेक्षा एक सोपी गोष्ट केल्यास मुलं आपलं अगदी सहज ऐकतील.
नेमकं काय करायचं?
मुलांशी आपण बोलताना त्यांना आपल्याकडून सहानुभूतीची अपेक्षा असते. आपल्या बोलण्यातून आपण ती अगदी सहज दाखवू शकतो. हा अगदी सोपा उपाय असून अगदी साध्या पद्धतीने आपण त्यांना ही सहानुभूती दाखवून देऊ शकतो.
तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे ही भावनाच त्यांना खूप सुखावणारी असते. त्यामुळे ते अगदी सहज आपलं म्हणणं ऐकतात. उदाहरणार्थ, तू असं उद्धट बोलायला नको होतंस या ऐवजी तू आता खूप अपसेट होतास म्हणून तू असं बोललास पण असं बोलणं योग्य नाही असं बोललात तर मुलं आपलं म्हणणं जास्त लवकर ऐकण्याची शक्यता असते.