Join us  

मोबाइल-टीव्ही पाहत सोफा-बेडवर बसून जेवतात? मुलांची वाढच खुंटली तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 3:33 PM

मुलं मोबाइल पाहत जेवतात, एका जागी बसून जेवतच नाहीत, स्वत:च्या हातानंही जेवत नाहीत त्याचे काय परिणाम होतात?

ठळक मुद्देएक पालक म्हणून मुलांबरोबरच या नव्याने सुरू होणाऱ्या 'अन्नप्राशन संस्कारास' अनेक शुभेच्छा.

सायली कुलकर्णी (सायकॉलॉजिस्ट, पुणे)

रमाच्या आजीला (रमा-वय वर्षे ४) घरभर फिरून तिला खाऊ घालावे लागते. कार्टून नेटवर्क वरील फेवरिट कार्टून बघतच अथर्व (वय वर्षे १२) जेवतो. आठ वर्षांचा संस्कार अजूनही आईने भरवल्या शिवाय जेवतच नाही. असं खाऊ घालून रमा, अथर्व, संस्कार यांच्या पोटात अन्न तर जाते पण अन्नसेवनातून होणाऱ्या सर्वांगीण विकासाचे काय? आता तुम्ही म्हणाल जेवण आणि आमच्या मुलांची फिजिकल डेव्हलपमेंट तर आम्हाला माहित आहे -कारण त्याविषयी नेहमीच बोलले जाते. पण सर्वांगीण विकास? ही काय भानगड आहे?

(Image : google)

आज बऱ्याचशा घरांमध्ये जेवणाबाबतची स्थिती काय दिसते हो? तर, सोफा- बेड- कुठेही वाट्टेल तिथे बसून जेवणे, तेही बरेचदा बाहेरून ऑर्डर केलेले जंकफूड किंवा घरी बनवलेले फास्टफूड. जेवताना सगळ्यांची डोकी टीव्ही किंवा मोबाईलमध्ये आणि हातातोंडाची जुगलबंदी. साधारण असेच, हो ना?भारतीय संस्कृती मध्ये अन्नग्रहणाला एका संस्काराचे स्थान दिलेले आहे. एका जागेवर बसून जेवणे, मोबाईल-टीव्ही न बघत जेवणाशी समरस होणे, घरातील सर्वांनी एकत्र बसून घरी बनवलेले ताजे- सात्विक अन्न खाणे, जेवणापूर्वी भोजन मंत्र म्हणणे या आणि अश्या अनेक बाबींचा विचार आवर्जून केला गेला आहे.मग आज त्याच्या मागचं शास्त्रही जाणून घेऊयात. नव्याने झालेल्या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, अन्नामुळे केवळ तुमच्या शरीरालाच नव्हे तर तुमच्या मेंदूला- मेंदूत असणाऱ्या भावनांच्या केंद्रांना, बोधनिक केंद्रांना आणि पर्यायाने विचार प्रक्रियेला चालना मिळते. अन्न पदार्थाची चव, वास, त्याचे टेक्शर यांच्यामुळे लहान मुलांची सेंसरी डेव्हलपमेंट उत्तम होण्यास मदत होते. तर हाताने आणि गरज असल्यास चमचाच्या सहाय्याने मुलांना आपापले खाऊ दिल्यास त्यांच्या फाईन मोटर स्किल्स ची डेव्हलपमेंट साधण्यास मदत होते.मग एक जागरूक पालक म्हणून 'अन्न संस्काराबद्दल' आपली नेमकी काय भूमिका असावी?

(Image : google)

काय करता येईल?

▪️ सोफ्यावर बेडवर बसून जेवणे कटाक्षाने टाळा. जेवणासाठी घरातील विशिष्ट जागा ठरवा.▪️ लहानपणापासूनच मुलांना पूर्ण जेवण होईपर्यंत एका ठिकाणी बसण्याची सवय लावा.▪️ जेवताना मुलांना मोबाईल टीव्ही यांसारख्या गोष्टी दाखवण्यापेक्षा त्यांच्याशी गप्पा मारा.▪️ मुलांना स्वतःच्या हाताने खाण्याची संधी द्या.▪️ शक्यतो दिवसातून एकदा तरी कुटुंबातील सगळेजण एकत्र जेवण करा.▪️ संपूर्ण जेवण बाहेरून मागण्यापेक्षा गरज भासल्यास स्वयंपाकासाठी मदतनीस हवे तर घ्या.▪️ स्वयंपाक घर ही एक छोटी प्रयोगशाळाच आहे. त्यामुळे स्वयंपाकातल्या सोप्या- सोप्या कृतींसाठी मुलांचीही मदत घ्या.▪️ भाज्या विकत आणताना, मटार - पालेभाज्या यांसारख्या भाज्या निवडण्याच्या कामात मुलांना आवर्जून सामील करा.▪️ जेवणाची सुरुवात प्रार्थना किंवा भोजन मंत्राने केल्यास उत्तम.▪️ अन्नपदार्थ, त्याची चव या जोडीला सकारात्मक हलके-फुलके अनुभव शेअर करा.▪️ अन्न वाया जाऊ न देता, गरजेपुरतेच खाण्याची सवय तुम्ही बाळगा आणि मुलांनाही लावा.▪️ हलक्याफुलक्या संवादातून, गोष्टीच्या माध्यमातून मुलांना जेवण बनवण्यात सामील असलेल्या घटकांबद्दल व प्रक्रियेबद्दल माहिती द्या.▪️ एखाद्यावेळी एकत्रित हॉटेलमध्ये जेवायला काहीच हरकत नाही. पण सेलिब्रेशन म्हणजे पार्टी, बाहेर जेवणे हे नेहमीचे समीकरण होऊ देऊ नका.▪️ अन्नाचा केवळ चवीपुरताच विचार न करता त्यामागील कष्टाची ही जाण ठेवा. पदार्थ आवडल्याची पावती आवर्जून द्या.▪️ जीभेच्या चोचल्यांच्या पलीकडे जाऊन 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' याबाबतची जाणीव मुलांना द्या.▪️ जेवणाच्या निमित्ताने एकमेकांसोबत शेअरिंग आणि केअरिंग चा आनंद चाखा.एक पालक म्हणून मुलांबरोबरच या नव्याने सुरू होणाऱ्या 'अन्नप्राशन संस्कारास' अनेक शुभेच्छा.

(लेखिका पुणेस्थित सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याशी 9552542012 या क्रमांकावर संपर्क करता येईल.) 

टॅग्स :पालकत्वमोबाइल