डॉ. श्रुती पानसे
वास्तविक बालवाडी सुरू होण्याचं योग्य वय चार वर्ष पूर्ण सांगितलं आहे. परंतु सध्या तिसऱ्या वर्षी बालवाडी सुरू होते. आणि त्या आधी नर्सरी किंवा प्ले ग्रुप सुरू होतो. पूर्वी घरात माणसं जास्त असायची, त्यांच्याशी बोलत, त्यांच्याकडे बघत, मुलं अनेक कौशल्य शिकायची. त्यांच्या भाषेचा विकास व्हायचा. पण आता ती परिस्थिती बदलली आहे.
घरात जास्त माणसं नसतात. ती देखील आपापल्या कामात असतात. मुलांच्या कानावर भाषा आली नाही तर शब्दसंपत्ती वाढत नाही. इतर मुलं असतील अशा बालकेंद्रात, प्ले ग्रुप मध्ये मुलांना घातलं तर अनेक जण जी भाषा बोलतात ती मुलं ऐकतात. यातून त्यांची शब्दसंपत्ती आपोआप वाढते. घराबाहेर राहाण्याची सवय होते. सामाजिक कौशल्य लहानपणापासून वाढीला लागतात.
मात्र यासाठी ते बालकेन्द्र खरोखरीच बालकेंद्रित असायला हवं. मुलांना जेव्हा या नव्या जागेत सुरक्षितता वाटेल तेव्हाच मुलं त्या जागेला, तिथल्या व्यक्तींना, नव्या मित्र मैत्रिणीना स्वीकारतात.
काय काळजी काय घ्यायची?
१. पालकांनी मुलांना सुरक्षित वाटेल, अशा ठिकाणी घालायला हवं. जिथे पालकांचा हात मुलांच्या हातातून हळूहळू सोडवला जाईल, अशी जागा जास्त चांगली.
२. जास्त फी आहे म्हणजे जास्त चांगली काळजी घेतली जाईल असं नसतं. जागा एसी असण्यापेक्षा तिथे मुलं मोकळेपणी खेळतात का?
३. आपण त्यांना घ्यायला जातो तेव्हा खुश असतात का, तिथे रमतात का, हे बघणं जास्त आवश्यक आहे.
४. त्या बालकेंद्राबद्दल इतर अनेक पालकांचं काय मत आहे याचाही विचार करायला हवा.
५. या वयात मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नयेत याची काळजी घेणं सर्वाधिक आवश्यक आहे.
(लेखिका मेंदूविषयक अभ्यास तज्ज्ञ आहेत.)