Join us  

परीक्षेतलं अपयश ते लहानशा गोष्टीमुळे झालेला संताप-नैराश्य, मुलं आत्महत्येचा विचार का करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 6:52 PM

मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात हे पालकांनी कसं ओळखायचं, काय करायचं?

ठळक मुद्दे जगताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. जगण्यासाठी संघर्ष अटळ असतो, त्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागते.

डाॅ. संजय जानवळे (एम. डी. बालरोगतज्ज्ञ)

‘आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या’, हे लोकमतमध्ये ( ४ जून ) प्रकाशित झालेले वृत्त वाचले. मन सुन्न झाले. एका उच्चशिक्षीत कुटुंबाची ही गत तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न मनात उभा ठाकतो. परिक्षेतल्या अपयशाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या किंवा गृहिणींच्या आत्महत्या दुर्दैवी आहेत. या आत्महत्यांची गांभिर्याने नोंद घेण्याची गरज आहे. या आत्महत्यांची अनेक कारणे आहेत. जगताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. जगण्यासाठी संघर्ष अटळ असतो, त्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागते. प्रतिकुल परिस्थतीचा धैर्याने सामना करत आयुष्याचा पैलतीर गाठावे लागते. आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होतील,असे नाही.

मनात मृत्यूला कवटळण्याचे विचार का येतात?१. पालकांच्या आसुरी आकांक्षाचे व अनावर हव्यासाचे दडपण मुलांवर येते. पालकांनी याचा विचार करावा व आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना त्यांनी अपयश कसं पचवायचं किंवा यशासाठी सहज परीश्रम कसे करायचे हे शिकवायला हवं.२. औदासिन्य, नैराश्य किंवा चिंता या सारखे मानसिक आजार, हे आत्महत्येचे महत्वाचे कारण आहे.३. रागाच्या भरात आत्महत्या केल्या जातात. आपल्याला राग येण्यापूर्वी शरीरात काही बदल होत असतात. आपल्या तर्कशक्तीवर व न्यायनिवाडा (जजमेंट ) करण्याच्या शक्तीवर नियंत्रण करणे, हे सेरेब्रल काॅर्टेक्स या मेंदूच्या एका भागाचं महत्वाचं कार्य असते. तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदूची लिंबीक सिस्टिम करत असते.

४. मेंदुच्याच टेम्पोटल लोब मध्ये ‘अमिगडाला’ नावाचं एक केंद्रक असते. अमिगडाला हे लिंबीक सिस्टिमचा एक भाग असतो. यातून निर्माण होणाऱ्या भावनेच्या संवेदना मेंदूतील सेरेब्रल काॅर्टेक्सला बायपास करून ॲडरिनल ग्लॅंडकडे जातात. त्यामुळे अशा संवेदनात तर्कशक्तीचा किंवा न्यायनिवाडा करण्याच्या शक्तीचा अभाव असतो. मग 'ॲडरिनल ग्लॅंड' नावाच्या शरीरातल्या ग्रंथीत 'ॲडरिनॅलिन' व 'काॅर्टिझाॅल' या स्ट्रेस हाॅर्मोन्सची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते व माणसाला राग येतो. म्हणून रागीट माणुस कुठल्याही एखाद्या गोष्टीवर आक्रमकपणे रिॲक्ट होतो. त्यावेळी तो कसलाच विचार करत नसतो. जेंव्हा राग येतो तेव्हा त्याचे स्नानू फुरफुरतात, डोकं दुखतं, रक्तदाब वाढतो, शरीराचं तापमान चढतं, अधिक प्रमाणात घाम फुटतो.

५. ‘औदासिन्य' या मानसिक आजाराला बळी पडलेल्या व्यक्ती नेहमी दुःखी, विषण्ण असतात. त्याचा अनिष्ट परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. या आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घेणे श्रेयस्कर.६. कधी तरी उदास होणं वेगळं अन् नेहमीच उदास,दुःखी रहाणं वेगळं. रोजच्या कामात मन रमत नसेल, झोपेच्या समस्या उद्भभवल्या असतील तर त्या व्यक्तीला डिप्रेशन या मानसिक आरोग्याच्या समस्येने घेरले आहे का हे तपासावे. अशा व्यक्तीमध्ये खूप जास्त किंवा खुप कमी झोपणे, खूप जास्त किंवा खूप कमी खाणे, आपण निरूपयोगी / नालायक आहेत व त्याबरोबरच उगाचच अपराधीपणा वाटत राहणे, मृत्यु किंवा आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा नेहमी त्याविषयी बोलणे, अशी लक्षणे दिसून येतात.

७.  औदासिन्य हे अनेक कारणामुळे येत असते. अनुवांशिकता, मेंदूतील जीवरासायनिक बदल, काही सामाजिक घटक, व्यक्तिमत्व आणि ताणतणाव ही काही त्याची कारणे होत. औदासिन्याची शिकार झालेल्या व्यक्तीत आत्महत्येसारख्या गुंतागुंती घडू शकतात. मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे अनिवार्य असते. ८. चिंता (anxity), वर्तणुकीतचे आजार, व्यसनाधिनता, यासारख्या इतर मानसिक आजारासोबत आयुष्यात घडणार्या काही घटनांमुळे डिप्रेशन येते उदा . कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. जेंव्हा एखादी व्यक्ती डिप्रेस होत असेल तेव्हा त्या व्यक्तीने, ज्या गोष्टीमुळे आपण डिप्रेस झालो आहोत ती गोष्ट फक्त आपल्याच बाबतीत घडते आहे का? त्या गोष्टींला आपल्या आयुष्यात किती स्थान आहे? त्या गोष्टींचा त्याग करणं, त्या सोडून देणं तर गरजेचे बनलं आहे का, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. त्या गोष्टीला चिकटून न बसता तिचा त्याग केला तर काय होईल,याचा विचारही त्या व्यक्तीने अवश्य करावा. स्वत:त बदल करणे, आव्हान स्वीकारणे कठीण असते, परंतु त्यासाठी प्रयत्न केल्यास, लक्षात येईल की ज्याचा त्रास आतापर्यंत आपल्याला होत होता, तो त्रास आता होत नाही.

९. आत्महत्यांची अनेक कारणे आहेत. या आत्महत्येचा खरी झळ ही त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांना बसते. आजच्या या धकाधकीच्या जीवनात 'जगणं' संघर्षाचं बनलं असलं तरी, आत्मविश्वासानं सामोरं गेल्यास, तेच 'जगणं'आनंदाचं होतं. तणावपुर्ण जीवनशैली अनेक व्याधीचे मूळ ठरते. आरोग्य कधीच विकत घेता येत नाही, ते कमवावे लागते. नेहमी निरोगी राहण्याचा अन् चांगले जगण्याचा प्रयत्न प्रत्येकानी करायला हवा.

एम. डी. बालरोगतज्ज्ञ, बीडdr.sanjayjanwale@gmail.com९८२२८२४१३५

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशिक्षणआरोग्यमानसिक आरोग्यरिलेशनशिप