Join us  

तुमची मुलं नक्की काय खातात? चिडचिड-लठ्ठपणा-हट्टीपणा नको असेल तर लक्षात ठेवा १० गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 3:02 PM

मुलं काय खातात त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न की आईबाबा, पालक त्यांना नक्की काय खाऊ घालतात, नेमकं चुकतं कुठं?

ठळक मुद्दे संपूर्ण घराने जीवनशैली बदलायची ठरवली तर ते मुलांना जास्त सोपं जाईल.

डॉ. श्रुती पानसे

आहार ही एक गोष्ट अशी आहे की जी संतुलित पद्धतीने नियमित केली तर शरीराला आणि मेंदूला ऊर्जा मिळते. त्यातून रक्त तयार होतं आणि रक्ताभिसरणामुळे मुलांमधला शारीरिक आणि बौद्धिक उत्साह टिकून राहतो. महाराष्ट्रातल्या काही भागात मुलांच्या कुपोषणाची समस्या गंभीर आहे. मुलांना एक वेळचा आहार ही मिळत नाही. सरकारतर्फे मिळणारी खिचडी हाच त्यांचा मुख्य आहार असतो. ही समस्या जितकी जटील आहे, तितकीच अन्य घरांमधल्या मुलांच्या योग्य पोषणाचीही आहे. ज्या घरांमध्ये सुबत्ता आहे, पण तरीही मुलं सुदृढ नाही, त्यांची वाढ खुरटलेलीच आहे त्या घराघरात ते ही एक प्रकारचं कुपोषणच होत आहे.घरात मुलं काय खात आहेत, हे बघणं हे आई बाबांचं काम आहे. मुलांचं खाणं हे त्यांच्या स्वत:च्या हातात नसतं. त्यांना आई बाबा जो आहार देतील, तोच त्यांना घ्यावा लागतो. मात्र बदललेल्या परिस्थितीत दोन प्रश्न निर्माण होतात.आई बाबा स्वत: काय आहार घेतात?मुलं त्यांच्या डोक्यावर बसून, हट्ट करकरुन काय खायला मागतात?या दोन प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली तर असंतुलित आहाराचा प्रश्न सुटेल. आणि पर्यायानं खुरटलेली वाढ, लठ्ठपणा हे वाढीस लागलेले प्रश्नही कमी होतील.

(Image : google)

मुलं काय खातात?

१. मुलांचा आहार सत्वयुक्त असायला पाहिजे, तो असतोच असं नाही. घरात सर्व काही असूनही मुलं पोषक आहार घेत नाहीत. जास्त उष्मांक असलेला आहार घेतात. यामध्ये दुकानात, अगदी दर्शनी भागात ठेवलेल्या रंगेबिरंगी, हवाबंद पुड्यांमध्ये भरलेलं चटपटीत खाणं हे फक्त जिभेला छान वाटणारं आहे. पण ते नि:सत्व आणि हानीकारक आहे.२.  विशेषत: ए डी एच डी असणाऱ्या मुलांनी तर जंकफूड खाऊच नये.३. घरात जो स्वयंपाक केला जातो, त्यातही भाज्या आणि फळांचं प्रमाणही किती आहे ते पाहणं आवश्यक आहे. तंतुमय पदार्थ कमी आणि बटर, चीज, मैद्याचे पदार्थ जास्त असं असेल तर मुलांचं वजन वाढणारच. याशिवाय यांच्या जोडीला व्यायाम आणि हालचालींचा अभाव असेल तर लठ्ठपणा वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होणारच.

(Image : google)

४. वास्तविक ‘किती खावं ’ यांची सूचना हायपोथॅलॅमस देत असतो. पण जर काही कारणाने मनावर ताण असेल तर अमीगडालाचा सहभाग वाढतो आणि मूड सुधारण्यासाठी काहीही आणि कितीही खाल्लं जातं, ते अपथ्य कारक असलं तरीही!५. आपण जेव्हा आवडीचे पदार्थ खातो, तेव्हा मेंदूत आनंदी रसायनं निर्माण होतात. हीच आनंदी रसायनं पुन्हा पुन्हा निर्माण होण्यासाठी शरीर तेच पदार्थ मागतं. हे काम असतं डोपामाईन या रसायनाचं. काही प्रमाणात हे रसायन आवश्यक असतं. पण त्याचं अतिरिक्त प्रमाण झालं तर तो पदार्थ खाण्याचं एक प्रकारे व्यसन लागतं. म्हणून मुलं काही पदार्थ पुन्हा पुन्हा मागतात.६. एका वस्तीतल्या काही कुटुंबांशी झालेल्या चर्चेतून काही वेगळ्याच गोष्टी आढळल्या. त्यांच्या घरांमधल्या मुलग्यांमध्ये हट्टीपणा, चिडचिड आणि वजनवाढ अशा गोष्टी आढळल्या. तेव्हा साहजिकच त्यांच्या आहाराविषयी विचारणा केली. त्यात असं आढळलं की ते ‘मुलगे ’ असल्यामुळे त्याला जे हवं ते खायला दिलं जायचं. त्यामुळे मुलं हे दहा- दहा रूपयांचे हवाबंद पुडक्यातले पदार्थ खायचे. पण घरातल्या मुलींना मात्र हे खाण्यासाठी दहा रुपये दिले जायचे नाहीत. त्यांना घरचं जे असेल ते खावं लागायचं परिणामी मुलींची शारीरिक आणि मानसिक प्रकृती चांगली होती आणि मुलग्यांची मात्र ढासळली होती.७. सोय आणि चव म्हणून बाहेरचे पदार्थ आता घरात रुळले आहेत. त्यांचं प्रमाण कमीत कमी ठेवलं तरी या समस्येला तोंड देता येईल.८. नीट बघितलं तर या सर्वच समस्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. मुलांचा शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास योग्य प्रकारे व्हावा असं वाटत असेल तर या तीनही समस्यांवर एकत्र काम करायला हवं आणि ते काही अवघड नाही. ९. समजा, आपल्या घरात लठ्ठ मूल असेल तर त्याला न हिणवता, व्यायाम करून घेणं , आहारात योग्य बदल करणं आणि त्याला कसले ताण असतील तर ते दूर करणं आवश्यक आहे. कारण वाढलेल्या वजनामुळे मानसिक गुंतागुंत निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. तसं असेल तर हा प्रश्न अजूनच शांतपणे सोडवावा लागेल. १०. अशा परिस्थितीत संपूर्ण घराने जीवनशैली बदलायची ठरवली तर ते मुलांना जास्त सोपं जाईल.

(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.)संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी))

टॅग्स :पालकत्व