आपलं तान्हं बाळ मोठं होऊ लागतं. म्हणता म्हणता शाळेत जातं, वयात यायला लागतं. टीनएज सुरु होतं. नाजूक विषय या वयातल्या मुलामुलींशी कसे बोलावे असे नवे प्रश्न पालकांना पडतात. त्यात वयात येण्याची प्रक्रिया मुलींमध्ये वेगळी आणि मुलांमध्ये वेगळी घडते. मुलींचं वयात येणं, त्याची लक्षणं पालकांना विशेषत: आयांना पटकन सांगता येतात. त्या मुलींशी बोलतातही पण मुलगे वयात येताना नेमकं काय घडतं? का घडतं? हे मात्र पालकांनाच नीट माहित नसतं. आणि मग मुलग्यांशी कुणी बोलत नाही आणि ते माहिती घ्यायला नको ती साधनं वापरतात.
वाढत्या वयात मुलांना आपल्या शरीर मनातल्या बदलांविषयी खूप प्रश्न पडतात. हे फक्त आपल्याच बाबतीत होतं आहे समजून मुलंही संकोचतात. न्यूनगंड बाळगतात. स्वत:च्या कोषात जातात. फक्त मुलींचं वयात येणं ही गंभीर आणि संवेदनशील बाब असते असाही पालकांचा गैरसमज असतो. पण मुलांचं वयात येणं हे देखील तितकंच जटील असतं. म्हणूनच या टप्प्यातल्या मुलग्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर 'होतं असं ' हे वरवरचं, त्रोटक उत्तर देणं टाळून शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न जर पालकांनी केला तर आपल्याच शरीरातील बदलांनी गोंधळून गेलेल्या मुलांना धीर मिळतो.
तशाच धीराची आणि शास्त्रीय उत्तराची गरज रोहनला होती.
(Image : google)
रोहन गाण्याच्या क्लासला जायचा. पण गेल्या तीन महिनांपासून क्लासला नियमित जाणारा रोहन मध्ये मध्ये दांड्या मारु लागला. क्लासच्या शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर रोहनच्या आईला हे समजलं. तिने रोहनला याबाबत विचारलं तेव्हा ' मुलं माझ्या बदललेल्या आवाजाला हसतात, चिडवतात म्हणून मला क्लासला जायला आवडत नाही' असं उत्तर दिलं. माझा, आवाज असा कसा भसडा झाला? इतर मुलांचा का नाही झाला? या रोहनच्या प्रश्नावर 'आवाज फुटला तुझा' एवढंच उत्तर आईने दिलं. पण आवाज फुटतो म्हणजे काय होतं हे मात्र तिला माहित नव्हतं. त्यामुळे रोहनची आणखीनच चिडचिड वाढली. या वाढत्या वयातल्या रोहनला विशेषत: त्याच्या प्रश्नांना कसं तोंड द्यावं हेच तिला कळत नव्हतं. वाढत्या वयातील मुलांच्या शरीरातील बदल, त्यांचं स्वरुप आणि त्यामागील कारणं समजून घेतली तर रोहनची आई रोहनला आणि पर्यायाने स्वत:ला मदत करु शकली असती.
मुलांचा आवाज का फुटतो?
१. वयात येताना टेस्टोस्टेराॅन नावाचं हार्मोन स्वरयंत्राचा आकार वाढवतं.
२. मुलांच्या गळ्यावर कंठ किंवा घाटी दिसायला लागते. त्याच्या आतले पडदे काहीसे जाडसर होतात त्यामुळे बाहेर पडणारा आवाज बदलतो.
३. पुरुषी आवाज वेगळा होता. काही दिवसांनी मुलांना परत गाताही येतं.
४. आवाज बदलला ही आनंदाची गोष्ट आहे हे मुलांना सांगायला हवं.
पालकांनी नेमकं करायचं काय? वाचा
https://urjaa.online/why-boys-voice-chage-in-puberty-age-how-parents-can-help-to-understand-physical-and-mental-changes-in-pubery-age-kids/