Join us  

वयात येणाऱ्या ‘मुलग्यांच्या’ आयुष्यात काय घडते आहे? चुकीची माहिती आणि ‘तसलं’ पाहत मुलगे मोठे होतात आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 6:27 PM

वयात येणाऱ्या मुलीला तरी काही समजावून सांगितले जाते; पण मुलग्यांचे काय? त्यांच्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं कोण देणार?

ठळक मुद्देभीतीपोटी वडिलांना किंवा शिक्षकांना विचारू शकत नाही. दोन पर्याय उरतात. एक मित्रांशी चर्चा आणि दुसरा 'जादुई चिराग' अर्थात स्मार्ट फोन.

डॉ. किशोर अतनूरकरनुकताच 'ओह माय गॉड २' हा सिनेमा पाहिला. किशोरवयीन मुलांच्या लैंगिक भावनांचा सामंजस्याने विचार करावा लागेल, अन्यथा येणाऱ्या पिढीचं कधीही न भरून येणारं नुकसान होऊ शकतं असा स्पष्ट संदेश देण्यात हा चित्रपट यशस्वी झालाय. मी गेल्या दहा वर्षांत अनेक शाळा-कॉलेजमधील साधारणतः ८ वी ते १२ वी वर्गातील (फक्त) मुलांशी संवाद साधत आहे. त्यांच्याशी बोललं की लक्षात येतं की, आपल्या शरीरात आणि मनात होणाऱ्या बदलाबद्दल, मुलीकडे आकर्षित होण्याच्या प्रबळ इच्छेबाबत प्रत्येक मुलाला काही तरी विचारायचं असतं. हस्तमैथुनाशिवायदेखील त्यांच्या मनात बरंच काही सुरू असतं. गेल्या दहा वर्षांच्या अनुभवावर आधारित विचार मांडणं गरजेचं आहे असं वाटतं.वर्तमानात घडतेय काय?लैंगिकतेसंदर्भातील सामाजिक आचारनियम किंवा संकल्पना खूप वेगाने बदलत आहेत. पिढी कोणतीही असो, काळ कोणताही असो, किशोरवयीन मुला-मुलींना आपण 'बंधमुक्त' जीवन जगावं असं वाटत असतं. असं वाटणं निसर्ग नियमाला धरून आहे. निसर्ग तोच आहे, आपली सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था बदलत आहे. ग्रामीण भागातून विविध कारणांसाठी शहरात स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलं आहे, पूर्वी फक्त बाबाच नोकरी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडत असत; आता आई आणि बाबा दोघेही नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर जात असल्यामुळे मुला-मुलींना दिवसातील अनेक तास घरी एकटं राहण्याची संधी मिळते. शिक्षणासाठी या वयातील मुला-मुलींना शहरात वसतिगृहात राहावं लागतं. स्मार्ट फोन आणि इंटरनेट नावाचं हत्यार म्हणजे दुधारी तलवारच. इतक्या सुंदर तंत्रज्ञानाचा उपयोगापेक्षा दुरुपयोगच होताना दिसतो आहे. टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या बऱ्याच मालिकांचे विषय प्रेमकथा, विवाहबाह्यसंबंध अशा विषयाभोवती फिरताना दिसतात.

(Image : google)

मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे, कन्या शाळा अदृश्य होत आहेत. किशोरवयीन मुले आणि मुली एकमेकांना शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसमध्ये वारंवार भेटत आहेत. या वयात शुद्ध वासनारहित प्रेमापेक्षा, शारीरिक आकर्षण आणि शरीरसुखाची इच्छा प्रबळ असते. शुद्ध प्रेम आणि शारीरिक आकर्षणातील फरक त्यांना समजत नाही. या वयातील मुला-मुलींना दुचाकीवर एकत्र फेरफटका मारण्यात काहीच गैर वाटत नाही. एकमेकांच्या फक्त स्पर्शातून निर्माण होणारा रोमांच आता गायब झालाय. एकमेकांशी मोबाइलवर चॅट करण्यात आपला किती वेळ वाया जातोय याचं भान त्यांना राहत नाही. या चॅटिंगचं रूपांतर मीटिंग किंवा डेटिंगमध्ये होतं. एकमेकांना कामूक भावना जागृत करणारे संदेश, फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्याची सुरुवात होते. काही वेळेस एकमेकांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवण्यापर्यंतदेखील यांची मजल जाऊ शकते, असं आढळून आलं आहे. गेल्या दहा वर्षांपासून विविध शाळा-कॉलेजात जाऊन या वयातील फक्त मुलांशी, मुलींच्या आकर्षणासंदर्भात संवाद साधत असताना त्यांनी विचारलेले काही प्रश्न वाचकांसमोर ठेवणं गरजेचं आहे. 'संभोग करताना मुली एक विशिष्ट पद्धतीने का किंचाळतात? लिंग ताठ झाल्यानंतर बाहेर पडणारं द्रव चांगलं का वाईट? असे आणि याहूनही स्पष्ट प्रश्न आठवी ते दहावीच्या वर्गातील मुलं विचारतात यावर काही पालकांचा कदाचित विश्वास बसणार नाही. यावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. काही मुलं तरी निश्चितपणे 'पॉर्न' व्हिडीओ पाहत असणार. एकदा असा व्हिडीओ पहिला की तो पुन्हा-पुन्हा पाहावासा वाटतोच. त्या सवयीचं रूपांतर व्यसनात होतं. मुलांना मुलींच्या शारीरिक आकर्षणाबद्दल खूप काही विचारायचं असतं. किशोरवयीन मुलांना अनेकदा मला आवडणारी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करत असेल हे जाणून घेण्याची फार इच्छा असते. ‘तिला पाहिल्यानंतर किंवा तिचा विचार जरी केला तरी माझं लिंग ताठ होत असेल तर, मला पाहिल्यानंतर तिला काय होत असतं?' सर्व शाळेतील मुलांकडून विचारला जाणारा हा 'कॉमन' प्रश्न आहे.सर्वसामान्यपणे वयात आलेल्या मुलींशी मासिक पाळी, शरीरात होणारे अन्य बदल याबाबतीत आई बोलते. तरुण मुलींवर आईची 'नजर' असते. मुलांसोबत मैत्री असेल तर 'सावध' कसं राहायचं याबाबतीत वेळोवेळी सूचना देत असते.पण मुलांचं काय?

(Image : google)

लैंगिक दृष्टीने उत्तेजित होण्याचं त्यांचंदेखील हेच वय. मुलींकडे ते कमालीचे आकर्षित होतात, मनामधे लैंगिक संबंधाविषयी खूप कुतूहल असतं. मुलांना याबाबतीत योग्य ती माहिती देणारी कुठलीही एजन्सी समाजात सध्या कार्यरत नाही. त्यात निसर्गाला माहिती नसतं की हा मुलगा दहावी-बारावीला आहे. निसर्ग आपलं काम आपल्या वेळेला करत असतो. नेमकं करिअर घडवण्याच्या वयातच मुलींबद्दलचं आकर्षण निर्माण होत असतं. यासंदर्भात बोलणार कुणाशी? त्यांनी विचारावं कुणाला? खूप प्रश्न अनुत्तरित राहतात. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळेपर्यंत तो बेचैन राहतो. भीतीपोटी वडिलांना किंवा शिक्षकांना विचारू शकत नाही. दोन पर्याय उरतात. एक मित्रांशी चर्चा आणि दुसरा 'जादुई चिराग' अर्थात स्मार्ट फोन.या विषयावर मित्रांशी चर्चा करण्याची मजा वेगळीच असते. पण, त्या चर्चेमुळे प्रश्नांचं योग्य ते उत्तर मिळेलंच असं नाही. मित्रांसोबत झालेली चर्चा एकतर मनातला गोंधळ वाढवू शकते किंवा चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. अजून एक मजेदार प्रकार आजकालच्या किशोरवयीन मुला-मुलींच्या बाबतीत दिसून येतोय, तो म्हणजे, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं. तसं असणं हे प्रतिष्ठेचं आणि नसणं म्हणजे, 'जिंदगीला काही मतलब नाही.' अशी ती मानसिकता.सारांश काय तर, दिखावा-बडेजाव-मिरवणे वृत्ती वाढत आहे. मुलं-मुली आपल्या दिसण्याला आजकाल खूप महत्त्व देताना दिसतात. आता मोठ्या माणसांनाही सामान्य प्रसंगाचे फोटो- व्हिडीओ शेअर करून 'लाईक्स ' मिळवण्याची घाई झाली आहे. मुलं ते आहतात आणि त्यांनादेखील तेच करण्यात धन्यता वाटायला लागते. आपण आपला करिअर घडविण्याच्या काळातील बहुमूल्य वेळ वाया घालवत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. कधी कधी लक्षात येऊनदेखील मन 'वळत' नाही..पण प्रश्न तोच, बोलायचं कुणाशी, विचारायचं कुणाला?

( पुढच्या भागात : मुलांशी बोलायचं काय, उपाय कोणते?)atnurkarkishore@gmail.com

टॅग्स :पालकत्वलहान मुलं