कधी मूल रडते म्हणून, तर कधी जेवत नाही म्हणून मोबाइल हातात दिला की काम होते. पालकांना हे अनेकदा सोयीचे वाटत असले तरी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सतत मोबाइल पाहणे घातक ठरु शकते. हे माध्यम प्रसंगी किती धोकादायक होऊ शकतं, लहान लेकरांच्या हाती दिलेलं, पालकांचं लक्षच नसलेलं जग किती भयंकर असू शकतं याची प्रचिती देणारी घटना नुकतीच पुण्यात घडली. अनेकांना सुन्न करुन गेली. मात्र याकडे केवळ घटना म्हणून न पाहता त्याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे हे पालक म्हणून आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.
पुण्यातील पिंपरी भागात हॉरर फिल्म्स पाहण्याची सवय असलेल्या ८ वर्षाच्या मुलाने खेळता खेळता आपल्या बाहुलीचा गळा आवळला आणि त्यानंतर त्याने खेळण्याच्या नादात स्वत:लाही गळफास घेतला. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे चेहऱ्यावर कापड घालून बाहुलीला फाशी दिल्यानंतर स्वत:ला फाशी घेतल्याने या मुलाचा हकनाक जीव गेला. त्याला भयपट पाहण्याची आवड असल्याने ते पाहून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या साऱ्याचा अर्थ काय आणि कसा लावायचा?
सोशल मीडिया, मुलांच्या गेमिंग आणि पोर्न पाहण्याच्या सवयीचा अभ्यास करणाऱ्या पत्रकार/लेखिका मुक्ता चैतन्य सांगतात..
या केसमध्ये फक्त गेमिंगमुळेच त्याने असे केले असा दावा आपल्याला करता येणार नाही. मात्र मुलांच्या हातात गॅजेट्स देताना ते त्यावर नेमके काय पाहतात, त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार आपण गांभिर्याने करायला हवा. अनेकदा मुलांच्या स्क्रीन टाइमवर किंवा स्क्रीन कंटेंटवर पालकांचा कंट्रोल नसल्याने मुले खूप लहान वयात अश्लिल, घातक अशा गोष्टींना बळी पडतात. त्याचा नकळत त्यांच्या मनावर परिणाम होत असतो आणि त्यातूनच अशाप्रकारची कृत्ये घडतात. पालकांमध्ये याबाबत अवेअरनेस असण्याची आवश्यकता आहे. पालकांना या नवीन माध्यमाबाबत कळत नसेल तर त्यांनी ते मुलांकडून समजून घेऊन त्यामागचे परिणाम लक्षात घ्यायला हवेत. मूल गप्प बसावे किंवा आपली कामे व्हावी, त्याने नीट जेवण करावे म्हणून त्यांच्या हातात मोबाइल देण्याची सवय आपणच त्यांना लावतो आणि नंतर ते ऐकत नाहीत अशी तक्रार करतो. पालक आणि मुलांमध्ये त्यांच्या स्क्रीन टाइमबद्दल संवाद व्हायला हवा. आभासी जग आणि सत्यता यातील फरक त्यांच्या लक्षात यायला हवा. हे माध्यम अतिशय परिणामकारक असल्याने पालकांची यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे हे पालकवर्गानी लक्षात घ्यायला हवे.
मुलांच्या मनाचा काय विचार?
प्रसिद्ध बालसमुपदेशक डॉ. शिरीषा साठे सांगतात, मुलं ही अनुकरणप्रिय असतात, लहान वयात दिसलेली प्रत्येक गोष्ट त्यांना करुन पाहायची असते. पण मुलांच्या मनात त्या गोष्टी किती खोलवर रुजतात आणि त्याचा ते प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करतात याबाबत येत्या काही वर्षात गडबड होत आहे हे नक्की. पाहिलेल्या गोष्टींमधले काय चांगले काय वाईट याची समज त्यांना नसल्याने आपण त्यांच्यासमोर काय ठेवतो हे महत्त्वाचे. पूर्वी गोष्टी वाचल्या जायच्या किंवा कोणीतरी वाचून दाखवले जायचे. यामध्ये राजा-राणी, चोर-पोलिस, परी ही कॅरॅक्टर असायची आणि ती मुले साकारायची. पण आताचे डिजिटल माध्यम हे दृश्य माध्यम असल्याने त्याचा मुलांच्या मनावर थेट परिणाम होतो. तसंच हे माध्यम सहज उपलब्ध होणारं असल्याने त्यावर अनेकदा कोणाचा कंट्रोल राहत नाही. मात्र मुलांवर त्याचा अतिशय विचित्र परिणाम होत असतो. लहान मुलांना अडकवून ठेवणारे गेम किंवा व्हिडिओ ज्यावेळी तयार केले जातात तेव्हा त्यांच्या मानसिकतेचा विचार का केला जात नाही? मुलांपर्यंत सकारात्मक गोष्टी पोहचवणे अधिक योग्य वाटत नाही का? या प्रश्नांची उत्तरंही शोधायला हवी.