सायली कुलकर्णी
मुलांना शिस्त लावायची कशी हा अनेक पालकांचा प्रश्न असतो. मुळात पालकत्व आणि शिस्त याचं अतूट नातं कालातीत आहे. संस्कार करणं, वळण लावणं, घडवणं या साऱ्यासाठी शिस्त ही आवश्यक असते. शिस्त म्हणजे काय? याबद्दल अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, 'चांगल्या वर्तणुकीसाठी ठरवले गेलेले नियम किंवा नियमांचा संच' म्हणजे शिस्त होय. 'गुणवत्तापूर्ण आयुष्य' जगण्यासाठी शिस्तीचे असलेले महत्त्व नव्याने सांगायला नको. पण मग शिस्त लावायची तरी कशी? मुळात काही पालकांचे शिस्त लावण्यासंदर्भातच गैरसमज दिसतात.
(Image : Google)
काय म्हणजे शिस्त असं पालकांना वाटतं?
१. शिस्त लावत असताना नियम हे पालकांनी ठरवून, आखून द्यायचे असतात.
२. पालकांचा धाक असेल तरच मुलांमध्ये शिस्त बाणावते.
३. मोठ्या आवाजात, दटावून सांगितले की मगच मुले ऐकतात.
४. लहान मुलांना भीती दाखवली आणि मोठया मुलांना धमकी दिली की ते बरोबर नीट वागतात.
५. शिक्षा हा शिस्तीचा अविभाज्य घटक आहे.
६. कायम उपदेश, कान उघडणी करणे हे वळण लावण्यासाठी अत्यावश्यकच आहे.
७.मुलांना वळण लावण्यासाठी करडी शिस्त आवश्यक असते.
८. धपाटे, दणके नी फटके ही दंडाची भाषाच शिस्त लावण्यात उपयोगी ठरते.
९. शिस्त लावत असताना आक्रमक होणे स्वाभाविकच आहे.
१०. तर कधी दुसऱ्या टोकाचा मोकाटपणा आणि स्वैराचारही दिसून आला.
(Image : Google)
पण हे खरे नव्हे..
पालकत्व शैलीबाबत आणि शिस्त लावण्याच्या पद्धतीबाबत जी काही अनेक संशोधने झाली त्यात असे लक्षात आले की शिक्षा देण्यामागचा बहुतेक पालकांचा हेतू हा मुलांना चांगले वळण लावणे, मुलांना संस्कारी बनविणे हा असतो. कठोर शिक्षेचा अंतर्भाव असणाऱ्या या शिस्तीमुळे अगदी थोडाच काळ,तात्पुरत्या स्वरूपात वर्तनबदल होताना दिसतो. मात्र या शारीरिक, भाषिक, मानसिक प्रकारच्या टोकाच्या शिक्षेमुळे होणारे परिणाम हे दूरगामी आणि नकारात्मक असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारच्या शिस्तीमुळे पालक-बालक संबंध तर दुरावतातच पण त्या बरोबरीने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांच्यात चिंताग्रस्तता वाढते. एकंदरीतच मुलांच्या सर्वांगीण विकासात बाधा येते.
मग मुलांना शिस्त लावायचीच नाही का? नियम, शिस्त ही विकासासाठी पूरक आणि तितकीच अत्यावश्यक बाब आहे. ध्येय पूर्तीसाठी शिस्त ही हवीच!
ते कसे करायचे?
त्यासाठी हवे पॉझिटिव्ह डिसिप्लिन. म्हणजे सकारात्मक शिस्त. ती कशी लावायची?
(Image : Google)
सकारात्मक शिस्त कशी लावायची?
१. घरातील विविध नियम मुलांवर लादण्यापेक्षा नियम ठरवण्यात त्यांचा सहभाग घ्या.
२. नियम ठरवत असताना त्यामागील कारणे, त्यांचे महत्व व त्याबाबतची जबाबदारी या संदर्भात मुक्त व स्पष्ट धोरणे मांडा.
३. एकत्रितपणे व विचारपूर्वक ठरवलेल्या धोरणांमुळे, नियमांमुळे सहसा हात उचलण्याची वेळ येणार नाही.
४. वादाची जागा संवादाने कशी भरता येईल यासाठी पावले उचला.
५. नियम पाळल्यास अथवा न पाळल्यास होणाऱ्या परिणामांबाबत मुलांशी स्पष्ट संवाद साधा.
६. मुलांनी गैरवर्तन केल्यास त्यांना 'टाईम आउट वॉर्निंग' द्या. ही ताकीद स्पष्टपणे, तटस्थपणे, विधानाच्या स्वरूपात द्या.
७. ठरवलेले नियम घरातील सदस्य म्हणून तुम्हीही पाळा.
८. परिणामांची अंमलबजावणी करत असताना फर्म, कणखर आणि त्याच बरोबरीने आवश्यकतेनुसार फेअर, वाजवी भूमिका ठेवा.
९.नियम पाळण्याबाबत मुलांना सबल करा. मुलांच्या वयानुसार वाजवी अपेक्षा राखून गरज भासल्यास त्यांच्या क्षमतांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पावले उचला.
१० सूचनांचा भडीमार करण्यापेक्षा प्रोत्साहित करणारे वातावरण राखा.
११. लहान आहात तुम्हाला काय कळतंय.. यापेक्षा एक व्यक्ती म्हणून मुलांना, त्यांच्या मतांना आदर द्या.
१२. मुलांना आज्ञाधारक बनवण्यापेक्षा त्यांच्या विवेकी विचाराला चालना द्या.
१३. मुलांशी टोचणी लागेल असे, टोमण्याच्या स्वरूपात बोलण्यापेक्षा सहज आणि स्पष्ट संवाद साधा.
१४. आरडाओरडा टाळा, कोणत्याही वयातील मुलांशी बोलताना तुमची भाषा आणि आवाजाची पट्टी संयमित असू द्या.
१५. आवश्यक तेथे प्रशंसा, कौतुक, शाबासकीची थाप द्यायला विसरू नका.
१६. मुलांच्या चूका दाखवण्यापेक्षा त्यांच्या चुकांचे कौशल्यपूर्वक रीडायरेक्शन, पुनर्निर्देशन करा.
१७. मुलांच्या उलट उत्तराला वैयक्तिकरित्या न घेता संयमाने हाताळा.
१८. अर्थात शांतपणे व संयमाने संवाद साधल्यास आरडाओरड, चिडचिड, उलट उत्तरे टाळता येतात.
१९. घरात हलकेफुलके वातावरण, विनोद बुद्धी जागी ठेवा.
२०. मुलांना त्यांच्या वयानुरूप जबाबदाऱ्या अवश्य द्या. अशा जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची सवय लावा .
२१. पालकांचा संयम संपण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मुलांच्या उत्साहापुढे, एनर्जीपुढे पालकांची अपुरी पडणारी एनर्जी. ही शारीरिक आणि मानसिक ऊर्जा राखा.
२२. शारीरिक ऊर्जेसाठी व्यायाम आणि मानसिक ऊर्जेसाठी रिलॅक्सेशन यांचा अवलंब करा.
२३. करडी शिस्त आणि स्वैराचार यामुळे निर्माण होणाऱ्या वर्तन समस्या सोडविण्यात एनर्जी घालवण्यापेक्षा त्या निर्माणच होणार नाहीत यासाठी मुलांच्या सहभागाने सकारात्मक मर्यादा ठरवा आणि त्या पाळा.
२४. चारचौघांच्या पुढे चुका दाखवणे टाळा. चारचौघात प्रशंसा आणि एकांतात कौशल्यपूर्ण कानउघडणी हे पत्थ्य पाळा.
२५. कुठे थांबायचं याचा विवेक मुलांना येण्यासाठी तुम्ही मुलांपुढे एक आदर्श उदाहरण म्हणून उभे रहा.
२६. पालक म्हणून तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये सातत्य आणि विश्वसनीयता राखा.
या सगळ्या नंतर आता तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की मग मुलांना रागवायचं नाही का? राग येणं, रागावणं हे नैसर्गिक आहे. जरूर रागवा पण त्या रागाला विवेकाची जोड द्या. केंव्हा, कुठे, कसे, का रागवायचे याचे भान असू द्या. हे सारं म्हणजेच सकारात्मक शिस्त.
(लेखिका सायकॉलॉजिस्ट आहेत.)