मुलं रात्री झोपलेली असताना अचानक जोरजोरात दात चावतात, दात एकमेकांवर इतके घासतात की त्यांना काही स्वप्न पडतंय का किंवा काही होतंय का असा प्रश्न पालकांना पडतो. बरेचदा हा आवाज इतका मोठा असतो की त्यामुळे आपल्याला रात्री जाग येते आणि मूल असं का करतंय याबाबत चिंताही वाटू लागते. ही समस्या एकूण मुलांपैकी साधारणपणे १ ते ५ वर्षे वयोगटातील २० ते ३० टक्के मुलांमध्ये दिसून येते. मूल दात खातंय म्हणजे त्याला जंत झाले असतील किंवा त्याचं पोट दुखत असेल असे काहीतरी तर्क आपण लावतो. पण त्यामागचं नेमकं कारण न समजल्याने आपण या विषयाकडे दुर्लक्ष करतो (What is The Reason behind grinding Teeth bruxism while sleeping).
काहीवेळा हा त्रास जास्तच होत असेल तर मुलांना थेट डॉक्टरांकडे घेऊन जाऊन आपण या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. या दात खाण्याच्या समस्येविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशांता पै आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देतात. मुलांनी असं करण्यामागचे नेमके कारण आणि ही समस्या दूर होण्यासाठी पालक म्हणून आपण काय करायला हवे याविषयी त्या काय सांगतात पाहूया...
काय असतं यामागचं कारण?
मुलांना कोणत्या तरी गोष्टीची वाटणारी भिती किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांनी घेतलेला ताण हेच यामागचे मुख्य कारण असते. लहान मुलांना कसला आलाय ताण असे पालकांना काही वेळा वाटू शकते. पण त्यांनाही नवीन लोकांशी, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा, एखाद्या प्रसंगात समजूतीने वागण्याचा किंवा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत नसल्याचा ताण येऊ शकतो. काही वेळा मुलांना आपल्या मनातले नीट बोलून दाखवता येत नाही. त्यामुळे मनावर हा ताण घर करुन राहतो आणि तो अशाप्रकारे वेगळ्या मार्गाने आपल्याला दिसून येतो. काही वेळा दात खाण्याची समस्या ही दातांच्या किंवा जबड्याशी निगडीत गोष्टींशीही संबंधित असू शकते.
पालकांनी यासाठी काय करायला हवं?
१. मुलांना कोणत्या गोष्टीची भिती वाटते याबाबत मुलांशी चर्चा करायला हवी. त्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारुन किंवा गप्पांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील नेमकी भिती काय आहे ते समजून घ्यायला हवे.
२. मुलांसोबत खेळण्याचा, दंगा-मस्ती करण्याचा वेळ वाढवायला हवा. अनेकदा आपल्याला आपल्या बिझी शेड्यूलमधून मुलांसोबत खेळायला किंवा अॅक्टीव्हीटी करायला वेळच मिळत नाही. मात्र त्यामुळे मुलं असुरक्षित होण्याची शक्यता असते.
३. मुलांसाठी रात्रीच्या वेळी सकारात्मक किंवा त्यांना छान वाटतील अशा गोष्टी वाचून दाखवा किंवा ऑडीओ स्वरुपात ऐकवा. ७० ते ८० टक्के वेळा दात खाण्याची ही समस्या मुलं काही प्रमाणात रिलॅक्स झाली की दूर होते.