मोबाइल हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. मग ते एखादे लहान मूल असो नाहीत ८०-९० वर्षाची वयस्कर व्यक्ती. मोबाइलशिवाय आता कोणाचेच पान हालत नाही. अगदी १ वर्षाच्या वयापासून मुलं आई-वडीलांच्या मोबाइलमध्ये डोकावून पाहतात आणि नंतर आई-वडीलच त्यांना गाणी नाहीतर गोष्टी मोबाइलवर लावून देत असल्याने त्यांना त्याची सवय लागते. हळूहळू मोबाइलची ही सवय इतकी वाढत जाते की मुलांना झोपेतून उठल्यावर, जेवताना, आवरताना, शाळेतून आल्यावर आणि झोपताना सतत मोबाइल लागतो. मुलं थोडी मोठी झाली की त्यांचे हे स्क्रीनचे व्यसन वाढत जाते आणि मग युट्यूबवर विविझ प्रकारचे व्हिडिओज पाहणे, गेमिंग, सोशल मीडियाचा वापर वाढत जातो (What Age should we allow our kids to have their own mobile phone).
सुरुवातीला आई-वडील नाहीतर आजी-आजोबा यांचा फोन वापरणारी ही मुलं आपल्याला आपला स्वतंत्र फोन हवा म्हणून हट्ट धरतात. कधी मुलं घरात एकटी राहत असल्याने किंवा आणखी काही कारणासाठी पालक त्यांना स्वतंत्र मोबाइल घेऊनही देतात. पण पालक मोबाइल देत नसतील तर काही मुलं पालकांना धमकावणे, घरातून निघून जाणे किंवा अन्य काही गोष्टी करुन वेठीस धरत असल्याचेही चित्र आपल्या आजुबाजूला असते. प्रत्यक्षात मुलांच्या हातात त्यांचा स्वतंत्र मोबाइल केव्हा द्यायला हवा. मोबाइल देण्याचं योग्य वय कोणतं असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडतात. पालकांनाही कधी ना कधी याबाबतचा निर्णय घ्यावाच लागतो. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी यांनी आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी थेट वय सांगितले नसून जगभरातील अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे आपल्याला या विषयाबाबतचा निर्णय घेणे काही प्रमाणात सोपे जाईल....
जगभरातील परिस्थिती काय सांगते?
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाऊंडर बिल गेटस यांनी आपल्या मुलांना १४ वर्षाच्या आत मोबाइल दिला नव्हता. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ११ वर्षाच्या आपल्या मुलाला मोबाइल दिला नव्हता असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. स्नॅपचॅट कंपनीचे सीईओ असलेल्या व्यक्तीने आपल्या मुलांच्या मोबाइलला आठवड्यातून १.५ तासाचा वापर करण्याचे लिमिट सेट केले आहे. सिलिकॉन व्हॅली हे तंत्रज्ञानाचे हब असून याठिकाणच्या असंख्य शाळा अशा आहेत ज्याठिकाणी शालेय गोष्टी शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा कमीत कमी प्रमाणात वापर करण्यात येतो. याठिकाणी कोडींग न शिकवता मुलांची कल्पकता वाढवणाऱ्या गोष्टींना जास्त प्रमाणात महत्त्व देण्यात येते.
आपला निर्णय आपण कसा घ्यावा
आपल्या मुलांना खरंच मोबाइलची इतकी आवश्यकता आहे का याचा प्रामुख्याने विचार करायला हवा. त्यानंतर मुलांना जबाबदारीची जाणीव कितपत आहे, त्यांना त्यांचे लिमिटस माहित व्हायला हवेत. तसेच मोबाइल हवाच असेल तर पालकांपैकी एक जण मुलासोबत असताना ते ठराविक काळ मोबाइल पाहतील असे पाहायला हवे. साधारणपणे मुलं शालेय शिक्षण घेऊन बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्यांना स्वतंत्र मोबाइल असण्याची गरज नसते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करुन पालकांनी मुलांना मोबाइल कोणत्या वयात द्यायचा याबाबत निर्णय घ्यायला हवा.