Join us  

मुलांची उंची वाढत नाही म्हणून टेंशन घेणाऱ्या आईबाबांनी काय करायचं? उंची खरंच वाढवता येते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 4:55 PM

बाकीच्या मुलांची उंची टराटरा वाढते मग माझीच का वाढत नाही असं विचारणाऱ्या मुलांना काय सांगाल?

रोहन ग्राउण्डवरुन खेळून घरी आल्यावर ' आला का माझा टिंग्या!' म्हणत आईने रोहनला जवळ घेतलं. एरवी आईने जवळ घेतल्यावर तिला आणखी बिलगणारा रोहन आईवर चिडलाच. ' ए आई मला टिंग्या म्हणायचं नाही सांगून ठेवतो..' असं म्हणत फणकाऱ्यानं स्वत:च्या खोलीत निघून गेला. रोहन असा चिडून निघूनगेल्यावर मनिषाला म्हणजे रोहनच्या आईलाही आपलंच काहीतरी चुकल्याची दुखरी जाणीव झाली. आज ग्राउण्डवर नक्कीच रोहनला कोणीतरी उंचीवरुन चिडवलेलं असणार, आपणही त्याला टिंग्या म्हणायला नको खरंतर. पण लाडाने तेच तोंडात येतं तर करायचं काय? असा प्रश्न मनीषाला पडला होता.

रोहनची उंची हा घरातला खूपच गहन प्रश्न झाला होता. रोहनच्या दादाची उंची चांगली होती. रोहनचे शाळेतल्या काॅलनीतल्या सर्व मित्र -मैत्रिणींची उंची चांगली वाढली होती. रोहनच त्या सगळ्यांमध्ये उंचीने लहान राहिला होता. उंची कमी म्हणून रोहनला शाळेतल्या बास्केटबाॅलच्या ग्रूपमधूनही बाहेर जावं लागलं होतं. या सगळ्यामुळे रोहनला खूप 'काॅम्पलेक्स' आला होता. त्यात मुलांच्या गंमतीने का होईना पण चिडवण्याने त्याला वैताग यायचा. 

(Image : google)

'आई माझी उंची कमी का? दादा उंच आहे तर मी बुटका कसा? असे प्रश्न रोहन सारखे विचारायचा. पण या प्रश्नावर मनीषाला रोहनला काय उत्तर द्यावं हेच कळायचं नाही. रोहनची उंची न वाढण्यामागचं कारण काय? हे मनीषालाच माहित नसल्याने ती रोहनचे हे प्रश्न टाळायची. पण स्वत:च्या उंचीमुळे न्यूनगंड बाळगू लागलेल्या आपल्या मुलाविषयी मनीषाच्या पोटात तुटत होतं.उंची न वाढणे ही रोहनसारखी समस्या अनेक मुलामुलींची असते. यामागे विशिष्ट कारणंही असतात. ती कारणं काय हे समजून घेवून उंची वाढण्यासाठी थोडे तरी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोगतज्ज्ञ डाॅ. वैशाली देशमुख सांगतात...

१. आपली जनुकं, ठेवण, आहार, व्यायाम, वातावरण, या सगळ्यांचा सहभाग उंची वाढण्यामध्ये असतो. २. जनुकांचा भाग आपल्या हातात नसला तरी चांगलं पौष्टिक खाणं, भरपूर खेळणं, जंक फूड कमी खाणं हे तर आपल्या हातात आहे. ३. आपली उंची वाढवायची तर आपली हाडं, स्नायू अशा सगळ्या पेशी वाढायला हव्यात. त्यासाठी भरपूर प्रथिनं, कॅल्शियमसारखे क्षार, ड जीवनसत्त्वं, कॅलरीज यामधून कच्चा माल मिळायला हवा. तो खेळातून, व्यायामातून नीट वापरला जायला हवा.

४. आपल्या मुलांच्या उंची बाबत काळजी करणारे पालक उंची वाढण्यातल्या या महत्त्वाच्या घटकांचा गांभीर्याने विचार करतात का?५. मुलांच्या उंचीच्या एक चतुर्थांश, म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के उंची किशोरवयात वाढते. ग्रोथ हॉर्मोन, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही संप्रेरकं त्यासाठी मदत करतात.६. मुलींची उंची पाळी सुरू होण्यापर्यंतच वाढते. मुलांची वाढ मात्र अठरा-एकोणीस वर्षांपर्यंत चालू राहते.

उंची बाबतचे समज- गैरसमजापलिकडचे 'फॅक्टस' याविषयी अधिक वाचा..https://urjaa.online/why-hasnt-my-height-increased-growth-problem-of-teen-parents-need-to-give-attention/ 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्य