-निकिता पाटील (समुपदेशक)
सतत नाकावर राग. लहानसहान कारणावरून मुलांना राग येतो. लहानशी मुलं बालवाडीपासून अगदी पाचवी-सहावीची, टीनएजरचे मूड स्विंग्ज हा तर दुसराच प्रश्न. राग लवकर येतो. घरकाम सांगितलं तर आवडत नाही. घरातली लहानसहान कामं करायचीच नसतात. उलट उत्तरं देतात.
-पालकांच्या अशा कितीतरी तक्रारी. त्यात सगळे पालकांनाच बदला म्हणतात पण म्हणजे नक्की करायचं काय?
पालकांनी करायचं तरी काय?
१. नाही विचारपूर्वक म्हणायचं. सतत लहानसहान गोष्टींना नाही म्हणत राहिलं तर नकाराची किंमत कमी होते. आणि एकदा नाही म्हटलं की, परत हो म्हणायचं नाही. कारण आपण हट्टीपणा केला, चिडलो तर आईबाबा ऐकतात ही ट्रिक कळली की मुलं नाहीचं हो करून घ्यायला शिकतात.
२. एकदाच काय ते छोटं काम नेमून द्यायचं. त्याची परत आठवण फारतर एकदा करायची सतत लकडा लावायचा नाही. मूल ते काम करेल याची वाट पाहायची.
३. बडबड-त्रागा करून कामं आईनेच करून घेतली की मुलांना वाटतं बोलते नुसती पण आपलं काम चुकतं. तसं न करता काम त्यांना त्यांच्या कलाने करू द्यायचं.
(Image :google)
४. कामाची जबाबदारी पण द्यायची. मानानं द्यायची. केलेल्या कामाचं कौतुक करायचं.
५. हातातले फोन आणि अटेंशन स्पॅन यांचे काही प्रश्न आहेत का ते पाहायचं, जमल्यास तज्ज्ञांची मदत घ्यायची.
६. मुलं पुरेसा व्यायाम, योग्य आहार घेतात ना, मित्रांसोबत खेळतात ना याकडेही लक्ष द्यायला हवं.
७. सुटीत घरोघरी चिडचिड वाढते, त्यावर शांतपणेच तोडगा काढायला हवा.