मूल ३ वर्षाचे झाले की त्याला शाळेत प्रवेश घेण्याची लगबग सुरू होते. मग विविध शाळांचे फॉर्म भरणे तिथे मुलाखतीला जाणे आणि मग भली मोठी फी भरुन शाळेत प्रवेश घेणे ही प्रक्रिया होते. मूल एकदा शाळेत जायला लागले की ते लगेच अभ्यासाला लागेल अशी काही पालकांची अपेक्षा असते. पण पहिले १ ते २ वर्ष साधारण गाणी, गोष्टी, अक्षरं ओळखणे, शब्द शिकणे, अंक ओळख अशा गोष्टी शाळेत खेळांच्या माध्यमातून घेतल्या जातात. मजा करता करता मुलं नकळत अनेक गोष्टी कधी शिकतात हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. ३ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांकडून शिक्षकांनी आणि पालकांनीही जास्त प्रमाणात अपेक्षा ठेवायला नकोत असे शिक्षणतज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येते (What to do If child is showing resistance to writing as an activity).
मात्र जसजशी मुलं मोठी होतात आणि पहिली, दुसरीत जातात तसे त्यांना लिहीणे शिकवण्यास सुरुवात होते. वर्गात शिकवलेल्या गोष्टी घरीही सरावासाठी दिल्या जातात. अनेकदा मुलं शाळेत शिक्षकांसमोर लिहीतात पण घरी लिहीण्याचा कंटाळा करतात. मोठे होतात तसा अभ्यास वाढत जातो आणि लिखाण कामही वाढायला लागते. पण एकदा लिखाणाचा कंटाळा असेल तर मुलं कायमच लिहायचा कंटाळा करतात आणि सगळं येत असूनही अभ्यासात मागे पडतात. बरेच पालक मुलांबाबत ही तक्रार कायम करताना दिसतात. अशावेळी नेमकं काय करावं याबाबत प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. मुलांनी लिहायला हवे यासाठी काय करायचे ते पाहूया...
३ वर्षाच्या आतली मुलं लिहीत नसतील तर...
१. मुलं ३ वर्ष किंवा त्यापेक्षा लहान असतील तर पालकांनी त्यांना लिहीण्यासाठी अजिबातच आग्रह करायला नको. ते नुसते गिरगोट्या मारत असतील, रेघा काढत असतील तर ते ठिक आहे. पण त्यांना मुद्दामहून काहीतरी लिहीण्यास सांगू नये. काही शाळांमधूनही मुलांना ३ वर्षे वयाच्या आतच लिहीण्यास शिकवले जाते मात्र ते योग्य नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.
२. मुलांच्या आजुबाजूचे सामाजिक वातावरण, त्यांच्या शारीरिक हालचाली, भावनिक कौशल्या यांचा विकास होणे या वयात अपेक्षित असते. तसेच मोटर स्कील्स म्हणजे त्यांच्या हातांची आणि बोटांची हालचाल, त्यात ताकद येण्यासाठी विविध अॅक्टीव्हीटीज घ्यायला हव्यात. त्यांचे संवाद कौशल्य, बोलण्याची पद्धत, भाषा, कल्पकता या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवे.
मूल मोठे असूनही लिहीत नसेल तर...
१. मुलांना लिहीण्याबाबत अडचण आहे की ते लिहायला कंटाळा करतात या २ गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. मुलांना आग्रहपूर्वक लिहायला लावले जात असेल तर ते लिहीणार नाहीत. त्यामुळे लिहीताच येत नाही की त्यांना ते आवडत नाही हे पालकांनी तपासायला हवे.
२. मुलांच्या हातातील आणि शरीरातील ताकद योग्य आहे ना याची तपासणी करायला हवी. मुलांच्या स्नायूंचा योग्य पद्धतीने विकास झालेला नसेल तर लिहीताना त्यांच्या हातावर आणि खांदे, पाठ, मणका या भागावर ताण येईल आणि लिहीण्याची क्रिया करण्यास त्यांना अडचणी निर्माण होतील हे लक्षात घ्यायला हवे. ही अडचण जर मुलं शब्दात सांगू शकत नसतील तर ते लिहीण्यास नकार देतात हे पालकांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवे.