Join us  

मुलं धडेच्या धडे ऑप्शनला टाकतात, अभ्यास करत नाहीत? अशावेळी पालकांनी काय करायला हवे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2024 8:00 AM

अभ्यास तर मुलांनी करायला हवा पण ते ऑप्शनला टाकतात धडे, पालक चिडतात, या प्रश्नाचं उत्तर काय?

ठळक मुद्देऑप्शनला काही सिलॅबस टाकावा की नाही?

डाॅ. श्रुती पानसेज्या वेळेला परीक्षा अगदी तोंडावर येते आणि अभ्यास पुरेसा झालेला नसतो त्या वेळेला त्यातून सुटका करण्याचा एक मार्ग म्हणजे काही धडे ऑप्शनला टाकणं आणि उरलेल्या सोप्या धड्यांचा अभ्यास करणं असं अनेक मुलांना वाटतं. पालकांना हा मुद्दा अजिबात पटत नाही. ऑप्शनला काही टाकू नये असं त्यांना वाटतं. त्यावरुन घरी भांडणंही होतात. या विषयाकडे मग कसं पहायला हवं? ऑप्शनला काही सिलॅबस टाकावा की नाही?

ऑप्शनला काय पर्याय?

१. जे शिक्षक परीक्षेचा पेपर काढतात, ते शिक्षक वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित आणि सर्वच धडयांचा संपूर्णपणे विचार करूनच पेपर काढतात. त्यांनी धडे ऑप्शनला टाकलेले नसतात. ते सर्व धड्यांवर काही ना काही प्रश्न नक्कीच तयार करतात. २. जर अभ्यास करताना मुलांनी संपूर्ण धडे ऑप्शनला टाकले आणि त्यातलंच समजा काही पेपरमध्ये आलं, तर मग त्या प्रश्नाचे मार्क कसे काय मिळणार?

 

(Image :google)

३. मात्र समजा मुलांना अजिबात वेळ नाही किंवा काही वेगळ्या कारणांमुळे, घरगुती समस्यांमुळे किंवा तब्येतीच्या कारणांमुळे जर पुरेसा अभ्यास झालेला नसेल आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता असेल तर संपूर्ण धडे ऑप्शनला टाकण्यापेक्षा प्रत्येक धडा वाचून त्यातला महत्त्वाचा भाग वाचून ठेवावा. त्यामुळे सगळं मागे पडत नाही.४. कोणत्याही धड्यामध्ये जे महत्वाचं असेल त्या संदर्भातले प्रश्न धड्याखाली घेतलेले असतात. जर अभ्यास करण्यासाठी अजिबातच वेळ नसेल तर संपूर्ण धडा वाचण्यापेक्षा केवळ धड्याखालचे प्रश्न वाचावे. आणि मनात त्यांची उत्तरं द्यावी (शक्य असेल तर लिहावी.) यामुळे सर्व धड्यांची उजळणी होईल. कोणताही मुद्दा सुटून जाणार नाही. प्रत्येक धडा नजरेखालून गेलेला असेल.

५. अभ्यासाला वेळ नसेल तर संपूर्ण धडे वाचण्यापेक्षा अभ्यासाची वही वाचावी. लेखन केलं नाही तरी चालेल. मात्र सर्वच धड्यातला मजकूर वाचला जाईल. जे ऑप्शनला टाकलं आहे तेच पेपर मध्ये आलं, तर नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच अभ्यास करणं हे योग्य आहे.

(लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :परीक्षाशिक्षणलहान मुलंपालकत्व