Join us  

मरुन जावं पण परीक्षा नको, इतकं टेन्शन मुलांना का येतं? कसा ओळखायचा पुढचा धोका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 2:13 PM

परीक्षेच्या काळात मुलांवरचा ताण वाढतो, काहीजण आत्महत्येच्या टोकावर पोहचतात, ते टाळण्यासाठी काय करायचं ?

- डाॅ. ऋचा सुळे - खोत

‘ अरे, परीक्षा म्हटली की टेंशन तर येणारच, एवढं घाबरु नकोस परीक्षेला. सारखं पुस्तक वाचत बसलास तर कंटाळून जाशील, जरा खोलीच्या बाहेर ये, आमच्याबरोबर जेवायला बस !-बाबांनी प्रणवला सांगितले. प्रणव- वय वर्ष १८. इयत्ता बारावी सायन्सचा एक हुशार विद्यार्थी. ‘नीट’ च्या परीक्षेची तयारी करता करता, बारावीला बसणाऱ्या हजारो मुलांपैकी एक. पण प्रणवला परीक्षेच्या निकालाबरोबर अनेक गोष्टींचे टेंशन होते. गर्व्हमेंट काॅलेजमध्ये ॲडमिशन मिळाली पाहिजे, नाहीतर प्रायव्हेट काॅलेजच्या फी मुळे वडिलांवर आर्थिक संकट येईल. मोठ्या - नवीन शहरात आता आपण एकटे जाऊन राहणार, ते आपल्याला जमेल का ? इंग्रजीमधली एवढी मोठमोठी पुस्तक आपल्याला वाचून समजतील का? आणि एवढं सगळं करुन मी डाॅक्टर झालो तर पुढच्या सेंटलमेंटचं काय ? दवाखाना टाकावा गावी की शहरात नोकरी करावी ? आजोबांच्या हयातीत मी डाॅक्टर बनेन नं?- इतके गुंतागुंतीचे विचार मनात असल्याने प्रणव अगदी बेजार झाला होता. त्याच्या मनात ही ‘ नीट’ ची परीक्षा म्हणजे एक मापदंड होता स्वत: ला जगासमोर सिद्ध करण्याचा. परीक्षा झाली, पण मार्क अपेक्षेपेक्षा कमी पडले होते. प्रायव्हेट काॅलेजला सहज सीट मिळाली असती. आई बाबा खुश होते. ऑफिस मधून घरी आले तर सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. आपल्याच मनात प्रणव अपयशी ठरला होता आणि त्याने 'I Quit' म्हणून जगाचा निरोप घेतला होता.हल्लीच्या काळात आपण अशा अनेक घटना वृत्तपत्रात वाचतो. आसपास पाहतो. परीक्षेच्या काळात मुलांमधील आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्याचे कारण अर्थातच परीक्षेचा ताणतणाव व निकालाच्या बाबतीतली अनिश्चितता हे असते. आत्महत्या करण्यास भाग पाडणारी कारणं जरी गुंतागुंतीची असली तरी देखील परीक्षेतील अपयश हे एक महत्त्वाचे कारण ठरु शकते.कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या करण्याची / आत्महत्येचे विचार मनात येण्याची जास्त शक्यता असते?अभ्यासामध्ये कोणता विद्यार्थी कसा आहे, यावर हे विचार फारसे अवलंबून नसतात. ते कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात येऊ शकतात. जास्त प्रभाव या गोष्टीचा पडतो की विद्यार्थ्यावर अपेक्षांचे ओझे किती आहे ? त्या अपेक्षा स्वत: च्या स्वत: कडून असतात, शिक्षकांच्या आणि आई-वडिलांच्याही अपेक्षाही किती असतात ? घरात जर मुलांनी नुकत्याच कुठल्या दुर्दैवी परिस्थितीला तोंड दिले असेल तरीही त्यांच्या मनात आत्महत्या संबंधित विचार येण्याची शक्यता जास्त असते.मुलांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे अवघड आहे. मुलांच्या विचारांचा प्रौढांसारखा विकास झालेला नसतो. त्यामुळे एखाद्या मुलाच्या डोक्यात आत्महत्येचे विचार सुरु असले तर त्याची लक्षणं मोठ्या माणसांपेक्षा फार वेगळी असू शकतात.

(Image : Google)

धोक्याची लक्षणं कोणती ?

१) सतत मृत्यूविषयी बोलणे किंवा आपल्यानंतर काय होईल यावर चर्चा करणे.२) अचानक फार शांत होणे. एकट्यात फार वेळ घालवणे.३) आहारामध्ये बदल होणे. बाहेरचे खायला मागणे किंवा फारच कमी खायला लागणे.४) विनाकारण चिडचिड व भावनांचा उद्रेक होणे. आई-वडिलांना दोष देणे.५) हट्टीपणा वाढणे.६) आपल्या आवडत्या वस्तू वाटून टाकणे.७) नातेवाइकांना किंवा मित्रांना भेटून अखेरच्या निरोपाची भाषा करणे.

(Image : google)

पालक काय करु शकतात?

१. सतर्क रहा. मुलांशी बोला.२. आत्महत्या विषयी बोलल्याने आपण व्यक्तीला ते कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करतो, हा गैरसमज आहे. जर मुलांच्या मनात असे विचार आले असतील तर त्याबद्दल सखोल जाणून घ्या.३. घाबरुन जाऊ नका. अथवा मुलाला रागवू नका. शांतपणे, त्यांचे म्हणणे एकून घ्या. तातडीनं तज्ज्ञांची मदत घ्या.

‘तसे’ विचार येत असतील तर मुलांनी काय करावं?

१. हे लक्षात घ्या की मनात आत्महत्येचे विचार येत असले तरी त्या विचारांची तीव्रता कमीजास्त होत असते. विचारांची तीव्रता कमी होईल आपले मन दुसरीकडे गुंतविण्यात प्रयत्न करा.२. त्या क्षणी फार लांबचा, भविष्याचा विचार करण्यापेक्षा पुढच्या ५ मिनिटांचा विचार करा.३. कुणाशी तरी बोला.४. आपलं समजून घेणारंच कुणी नाही असं वाटत असेल तर हेल्पलाइन’ला फोन करा. त्यांच्याशी बोला.५. जर मनात आत्महत्येचे विचार वारंवार येत असतील तर असे विचार मनात येऊ लागले तर मी बाकी काय काय गोष्यक्ष त्यावेळी करीन याचा विचार आधी करुन ठेवून, मनात विचार छळू लागले की त्या सकारात्मक गोष्टी करा.६. आपल्या विचारांचं नियमन करायला शिका. आत्महत्येचे विचार आपल्या मनात कुठल्या परिस्थितीत येतात हे समजून घ्या. पर्याय शोधा.७. स्वत: ला दोष देणं टाळा.८. आय क्विटच्या आधी आय विल ट्राय हा पर्याय कायम असतो असे म्हणा, आणि जगण्याला क्विट म्हणून नका.

(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

iphmindlabnashik@gmail.com 

टॅग्स :पालकत्वपरीक्षा