Join us  

पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2021 7:12 PM

पालक चुकले तर त्यांना कोण बोलणार? असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये चिमुकलीने विचारलेला प्रश्न पालकांना खरोखरंच निरूत्तर करणारा आहे.

ठळक मुद्देमुलं तेच करतात, जे त्यांच्या पालकांचं बघतात. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर वागताना काही गोष्टींचं बंधन नक्कीच पाळलं पाहिजे.

मुलं कधी चुकले, त्यांच्या हातून काही चूक झाली, तर ती चूक हेरण्यासाठी, त्या चुकीबद्दल त्यांना शिक्षा देण्यासाठी पालक तयार असतात. मुलांकडून चूक झाल्यास पालकांनी त्यांना शिक्षा देणं किंवा मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणं अगदी स्वाभाविक आहे. खरंतर ते पालकांचं कामच आहे. पण एखादी चूक जर पालकांच्या हातून झाली, तर मग या चुकीसाठी कोण जबाबदार? पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा?

 

हा प्रश्न सध्या जे पालक आहेत, त्यांनाही त्यांच्या लहानपणी नक्कीच पडलेला असतो आणि आताही जे मुलं आहेत, त्यांना पडतो. एखादा काचेचा कप मुलांच्या हातून फुटला तर पालक त्यांना रागवायला तयार असतात. पण तोच कप जर आई किंवा बाबांच्या हातून फुटला तर त्याबाबत अवाक्षरही बोललं जात नाही, हे मुलांनाही कळतं, जाणवतं. अशाच आशयाचा एक अतिशय छान आणि खूपच मोठा संदेश देणारा व्हिडियो गुजरात पोलिसांकडून बनविण्यात आला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून हा व्हिडियो पाहणारे पालक निश्चितच अंतर्मुख होतात.

नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळावेत म्हणून पोलीस किंवा प्रशासन हर तऱ्हेने प्रयत्न करत असतात. प्रत्येक नागरिकाकडे तर पोलिस वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिकही बेफिकीर राहतात आणि त्यामुळेच तर अपघातासारख्या गंभीर घटना घडतात. जर नागरिकांनी स्वत:च स्वत:ची शिस्त पाळली आणि आपल्या हातून वाहतूकीचे नियम मोडले जाणार नाहीत, याची काळजी घेतली, तर निश्चितच अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात. हेच समजून सांगण्यासाठी हा व्हिडियो तयार करण्यात आला आहे. 

 

या व्हिडियोमध्ये एक चिमुकली आणि तिचे बाबा दाखविण्यात आले आहेत. बाबा चारचाकी चालवत आहेत आणि चिमुकली नाराज होऊन मागे बसलेली आहे. मुलीने कसला तरी नियम मोडला आहे. त्यामुळे तिचे बाबा तिच्यावर खूप नाराज झाले असून ते तिला रागवत आहेत. मुलीला नियम तोडला म्हणून ओरडणारे बाबा मात्र ट्रॅफिकचा नियम स्वत:च तोडत आहेत आणि लवकर पोहोचावं म्हणून चुकीच्या मार्गाने गाडी नेत आहेत. हे पाहून मुलगी बाबांना म्हणते, आता तुम्ही देखील नियम मोडला आहे, मग तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा कोण देणार? मुलीचा हा प्रश्न वडिलांना पुर्णपणे निरूत्तर करून टाकतो.

 

मुलं तेच करतात, जे त्यांच्या पालकांचं बघतात. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर वागताना काही गोष्टींचं बंधन नक्कीच पाळलं पाहिजे. मुलांसमोर दुसऱ्या व्यक्तीशी सर्रास खोटं बोलणं, दुसऱ्यांची कायम निंदा करणं, कामचुकारी करण्याचा प्रयत्न करणं, दुसऱ्यांना फसवणं असं जर पालक मुलांसमोर करत असतील, तर बालकांची नजर या गोष्टी अचूकपणे हेरते. जर पालक असं करतात, तर आपण का नाही, असा प्रश्न त्यांच्या मनात डोकावतो आणि मग ते अशा चूका करण्यासाठी निर्ढावतात. म्हणूनच पालकांनो मुलांसमोर वागताना, त्यांच्याशी बोलताना जरा जपून. कारण तुमचंच अनुकरण मुलं करत असतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 

 

टॅग्स :पालकत्ववाहतूक कोंडीवाहतूक पोलीसगुजरात